You are currently viewing “लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती”

“लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल प्राविण्य, गझल मंथन समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे यांचा पुस्तक दिनाच्या निमित्ताने लिहिलेला लेख*

 

*”लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती”*

 

वाचाल तर वाचाल, हे माझे बाबा सांगायचे. माझे आई बाबा वाचनाचे मोठे भोक्ते होते व त्याचमुळे लहानपणापासून आम्हाला ही वाचनाची गोडी लागली. अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीची पुस्तके घालून वाचत होतो व त्या करता ओरडा ही खाल्ला होता. चांदोबा, गोड गोड गोष्टी, परी कथा, श्यामचीआई, दिवाळी अंक, कांदबऱ्या इत्यादी गुपचूप शाळेत असताना वाचत होतो. इंग्रजी शाळेत होतो, घरी कोंकणी बोलत होतो. मराठी थोडी मोडकी तोडकी येत होती. पण एक मात्र नक्की की मराठी भाषे बद्द्ल आपुलकी वाटत होती. मातृभाषा म्हणून मराठी लावत होतो ना, त्यामुळे असेल.

लहानपणी मैत्रिणींकडे पुस्तकांची देवाण घेवाण करत होतो, आताही करतो. माझी आवड माझ्या दोन्ही मुलींनी ही घेतली. एखाद्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘चि. …….यांस, वाढदिवसा निमित्त सप्रेम भेट व पुढे लिहिलेली तारीख हे वाचायला किती छान वाटत होतं. खूप वर्षांनी ते पुस्तक हाती आलं की, ते दिलेली ती व्यक्ती व तिच्या साऱ्या आठवणी गोळा व्हायच्या. खरंच किती सुखद काळ! अशा पुस्तकांचा साठा आमच्याकडे खूप आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे माझी दोन्ही नातवंड पुस्तके आवडीने वाचतात. वाढदिवसाला मिळालेल्या गिफ्ट मधून पुस्तक असेल तर ते अगोदर उघडून चाळतात नंतर बाकीच्या वस्तू पाहतात. कुठलं पुस्तक हवं याची मागणी ही करतात. हं, इंग्रजीत जरी पुस्तक वाचत असले तरी मुळ सारांश आपल्याच संस्कृतीचा. आमच्याकडे वाचनाचे संस्कार असल्याने नातवंडांनाही वाचनाची गोडी लागली.

पण असे दृष्य सगळीकडे दिसत नाही. आजच्या युवा पिढीमध्ये वाचनाची गोडी दिसत नाही. वर्तमान पत्रे तर रोज खूप विकत मागवतात पण फक्त वरवर चाळतात आणि नंतर रद्दीत टाकतात. बहुतेक वेळा त्या वर्तमान पत्राची घडी सुध्दा उघडलेली नसते आणि ते थेट रद्दीत जमा होत. वेळंच मिळत नाही ही सबब सांगितली जाते. मग टि.व्ही, मोबाईल, लॅपटॉप कामा व्यतिरिक्त तासनतास हातात घेऊन बसतात. त्यावरचे सिरीयलस, सिनेमा व खेळ खेळत असतात. मग अशा वातावरणात घरातली मुले काय करणार? अर्थात, मोठ्यांचेच अनुकरण. त्याना ही मोबाईलवर गेम्स, कार्टून्स बघायचं असतं. माझा अभ्यास झाला, आता मला मोबाईल हवा असा त्यांचा हट्ट असतो आणि त्यांची मागणी पालक नाकारू शकत नाहीत. नाही म्हटलं तर लगेच ती विचारतात, मग तुम्ही का घेता? आम्ही पण थोडाच वेळ घेतो ना? मग बोला, काय करणार?

दुसरी अत्यंत महत्तवाची बाब म्हणजे आजची आपली शिक्षण पध्द्त. आज सरसकट सगळी मुले मराठी भाषा सोडून इंग्रजी माध्यमाकडे वळलेली आहेत. आई बाप अशिक्षित असले तरी त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात आणि पोटाला चिमटा काढून त्यांना खासगी शिकवण्या लावतात. त्यामुळे आज खूपच प्रमाणात मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मातृभाषेतुन सुरूवातिला शिकलात तर नीट समजेल व ट्युशन ची गरज भासणार नाही. त्यापुढे जगातल्या सगळ्या भाषा जाणून घ्यायला काही अवघड होत नाही.

आपली भारतीय संस्कृती फार प्राचीन आहे. ही संस्कृती आपल्याला प्राचीन ग्रंथांपासूनच लाभलेली आहे (चार वेद, रामायण, महाभारत) नंतर संत वाङमय, त्या नंतर आपले थोर साहित्यिक ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, दांडेकर, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे इत्यादी. असे अफाट भरलेले आपले साहित्य. परदेशी लोकांनी सुध्दा हे ग्रंथ आपल्या भाषेत अनुवादीत केलेले आहेत. आपण भारतीय असल्याने थोडं तरी ते जाणून घ्यायला हवं असं मला वाटतं.

आता सुध्दा बऱ्यापैकी लहान मुले व वयस्कर लोक वाचनाकडे वळलेले आहेत पण जेवढी पुस्तकांची मागणी व्हायला हवी तेवढी होत नाही.

आजची तरूण पिढी सरसकट एकाच गोष्टीच्या मागे लागलेली आहे. ‘कमवा व जमवा’. दिवसातले जास्तीत जास्त तास ते लॅपटॉपवर असतात. नंतर टी.वी. व वर्तमान पत्रावर धावती नजर टाकतात व पेपर सुध्दा धड वाचत नाहीत (अपवाद). तसेच आजची युवा पिढी हातात पुस्तक घरून वाचणारी कमीच दिसते. त्याच प्रमाणे आजच्या युवती ही आपल्या कामात व्यस्त असतात. घर काम, ऑफिस, किटी पार्टी, ब्युटी पार्लर आणि सतत मोबाईल हाती असतो. आताचे पालक असे, मग त्यांची मुले कशी असतील बरे?

एकतर मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. त्यामुळे मराठी शाळा बहुतेक बंद पडल्यात. काय ह्या इंग्रजांनी भाषेचे प्रभुत्व भारतीय लोकावर लादलय कळत नाही! सरसकट गरिबातला गरीब ही स्वतःच्या मुलांना महागड्या इंग्रजी माघ्यमात घालतो. आज काल तर वेगवेगळे बोर्ड असल्याने पैसै आणि बुध्दीची कुवत नसली तरी पालक त्या उच्च श्रेणीत मुलांना घालतात. मराठी भाषा बोलायला लाज वाटते.

आपला चार चौघात तोरा, छाप पडावी म्हणून पार्टीत चार इंग्रजी शब्द फेकतात आणि आपल्याच मातृभाषेचा अपमान करतात. मराठी भाषीक असूनही ह्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात मराठी भाषेच्या पेपरात पास होण्या इतपतही गुण मिळू नये ही किती लज्जास्पद गोष्ट आहे? येथे त्यांच्या मुलांचा दोष अजिबात नाही. मुलांच्या कानावरच जर शुध्द मराठी पडलीच नाही तर त्यांचा काय दोष. अभ्यासक्रमातलं पुस्तक त्यांना धड वाचता ही येत नाही तर आणखी वेगळी पुस्तकें ही मुले कशी वाचणार? त्यांना मराठी पुस्तकांची गोडी कशी लागेल? मुलं नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात. घरातच मराठी भाषेला धुतकारले, तर मराठी वाचन संस्कृती कशी टिकेल?

आपली मराठी भाषा असूनही घरी भाषेचे कॉकटेल करतात. घरात जाणते आजी आजोबा ही बऱ्याच ठिकाणी नातवंडां बरोबर नसतात. आम्हाला लहानपणी सवय लागली होती की गोष्टी ऐकत झोपी जायचे. आजची मुले सर्वां बरोबर टी.वी.सिरीयल नाहीतर सिनेमा पाहतात असतात. (अपवाद सोडून) आपल्या घरात पुस्तक वाचणारे असेल तर त्याचे अनुकरण मुले सहज करतात.

मी शाळेत मुलांना सांगायचे की पुस्तक वाचायचे तर डॉक्टर आंबेडकरांसारखे वाचा. त्यांचे वाचन व स्मरण शक्ती अफाट होती. एखादा शब्द कुठल्या पाठात, कुठल्या पानावर व कुठल्या परिच्छेदात व पानाच्या कुठल्या बाजूला आहे हे ते अचूक सांगत. त्यांना अभिमान होता. हजारो पुस्तके त्याच्याकडे होती. ती सगळी त्यांनी डोक्यात ही ठेवली होती. पूर्वी सगळे लोक पुस्तके विकत घेत, स्वतः वाचत व दुसऱ्यांना ही देत. एका लहान मुलासारखी पुस्तकांची जपणूक करत. कधी कधी एक एका पुस्तकां करता वेगवेगळ्या ग्रंथालयात जाऊन कसंही करून ते मिळवत आणि ते वाचे पर्यंत जीवाला स्वस्थता लाभत नव्हती. जशी आता मोबाईलची चटक लागली तशी. मी मान्य करते. त्याकाळी दुरदर्शन नव्हते, मोबाईल नव्हते. करमणूकीची साधने कमी होती. पण जे चांगल ते आपण सर्वांनी स्वीकारायला हवे.

पुस्तक आपले गुरू आहेत. त्यांच्या वाचनाने आपण घडतो. त्यातले आचार, विचार, संस्कार आपल्या मनात खोलवर रुजतात. आंबेडकर एवढे महान बनले ते फक्त ग्रंथ वाचनानेच. ते स्वतः ही तेच सांगत आणि ते खरेच आहे. पुस्तक हातात धरून वाचल्याने ते लक्षात चांगलं राहतं. कुणा कुणाला सवंय ही असते, त्यातलं वाक्य किंवा परिच्छेद अधोरेखीत करण्याचा. तसे केल्याने पुस्तक खराब होते पण ते वाचलेले कायम लक्षात राहतं. पण आज त्याची जागा मोबाईलने घेतलेली आहे.

मोबाईलवर वाचणारे व लिहिणारे खूप आहेत. पण ते वाचलेले पुस्तकासारखे होत नाही. ते लक्षात ठेवणं कठीण होतं. ही मोबाईलरुपी पुस्तकं आपण कुणाला भेट म्हणून देऊ शकत नाही. पुर्वी अशा पुस्तकांच्या भेटी खूप मिळायच्या. त्या सर्वांचे जतन व्हायचे. अदलून बदलून दुसऱ्यांना वाचायला ही देत होतो व घेत ही होतो. आताही काही प्रमाणात पुस्तकांची देवाण घेवाण आहे. पण कुठे? ज्या घरात पुस्तकांचे वाचन होत आहे तेथे.

पुस्तक प्रेमी, वाचन प्रेमी असतो तो मिळेल त्यावेळेत पुस्तक वाचून संपवतो. काही पुस्तकेही एवढी प्रभावी असतात की ते पूर्ण होई पर्यंत हातातून सोडवत नाहीत.

आपल्याला पुस्तक प्रेमी किंवा वाचन प्रेमी सहज ओळखता येतो. त्याच्या हाती जे लिखाण येत असतं ते तो वेळात वेळ काढून वाचत असतो. प्रवासात, बस, ट्रेन, हॉटेल, जेथे जाईल तेथे मोकळा वेळ मिळाला तर असाच वाया घालवणार नाही. आपण बघत असतो की वडा पाव वा भेळीचा कागद ही त्यांच्या नजरेतून सुटत नाही. त्यात एखादी नाटकाची जाहिरात वा विनोद असेल पण तो प्रेमी ते वाचेलच. पण आजची पिढी ह्या गोष्टीकडे दुर्लक्षीत झालेली आहे.

आपलं घर हे संस्कारांचे भांडार आहे. इथले जर संस्कार चांगले असले तर मुलांवर त्यांचा प्रभाव पडतो व तिही ते संस्कार जोपासतात. घरात जर मोठी माणसे ग्रंथ,पुस्तके वाचत असतील तर मुले त्याचे अनुकरण करतील. आज आपण बघतो की मुले आपल्या शाळेची पाठ्य पुस्तके सुध्दा नीट सांभाळत नाहीत. एक एक वर्षाला ह्यांना दोन तीन कोरी पाठ्य पुस्तके लागतात. अगोदर एकच पाठ्य पुस्तक पाच सात भावंडे, चुलत भावंडे किंवा मामे भावंडे एका साखळी सारखी म्हणून वापरत होतो.

येथे आता पूर्ण दोष मुलांना देऊन उपयोग नाही कारण आजच्या पुस्तकांची छपाई व बाईंडिंग एवढे तकलादू असते की थोड्या कालावधीतच त्यांची पाने वेगळी होतात व मग मुलांकडून काही दिवसांनी ती पाने हरवतात. ती चिकटवून किंवा शिऊन देण्याची वृत्ती बहुतेक पालकांकडे नसते. शिवाय आज त्यांच्याकडे पैसाही भरपूर असतो. अगोदर वापरलेली पुस्तके वापरणे कमीपणाचे वाटते. मला मिळाले नव्हते, आता माझ्या मुलांना मी सर्व देईन, ही वृत्ती चांगली पण ह्याने त्यांची मुले बिघडतात हे त्यांच्या लक्षात येत नाही.

दिवसेन दिवस ग्रंथालयात वाचकांची संख्या कमी होत चाललीय. पुस्तक विकत घेणारे ही कमी व ते वाचणारे ही कमीच. मग ह्यावर काही तरी उपाय करायलाच हवा. आपली लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती वाचवायलाच हवी. आपण जरी मुलांना इंग्रजी शाळेत घातले तरी मातृभाषेला दुय्यम लेखू नाका. शुध्द भाषा वापरा. घरी विनाकारण आपली स्टाईल म्हणून भेसळ न करता फक्त मराठीच बोला, मग मुले ही बोलू लागतील. घरातील मोठ्या माणसांनी हातात पुस्तके धरून वाचावी, ते पाहून मुले ही त्याचे अनुकरण करतील. माझ्या अनुभवातील गोष्ट. एक वर्षाचा माझा नातू एक एक पान पलटून पुस्तकातील चित्रे पाहत होता. आम्हाला वाटत होते तो चित्र पहात असावा. कोण जाणे, मोठी माणसे थोड्या थोड्या वेळाने पाने उलटतात ते पाहून तो पण ते करत असावा. लहान मुलांचं निरीक्षण फार असतं व ते ती लगेच आत्मसात करतात. आपण पुस्तके वाचतो ते पाहून मुलांना ही वाचण्याची गोडी लागेल. त्यांना मॉल मध्ये फक्त खेळायला खायला नको तर तिथल्या पुस्तकांच्या दुकानात ही न्या. त्यांच्या करता पुस्तके विकत घ्या. एखाद्या वाचनालयाची सदस्यता घ्या. अभ्यासा व्यतिरिक्त आणखी पुस्तके वाचून ज्ञानात भर घालायला शिकवा. त्यांच्या आवडीची पुस्तके दिली की त्यांना वाचनाची गोडी लागेल. आपणच जर टी. वी., मोबाईल ह्यावर नियंत्रण ठेवलं तर मुलं ही तेवढी आहारी जाणार नाहीत.

 

दुसरी गोष्ट, पुस्तकांचा दर्जा ही बदलायला हवा. पूर्वी सारखं दर्जेदार साहित्य आज फार दुर्मीळ झालं आहे. शुध्द भाषा, चटकदार शैली, पुस्तक हातात घेतलं की वाचकाला खिळवून ठेवणारं साहित्य लेखक लेखिकांनी लिहायला पाहिजे. पुस्तकांचे मुखपुष्ठ ही आकर्षक असावे, जेणे करून दिसता क्षणीच ते हातात घ्यावे से वाटावे व त्याच्या लेखकाच्या लेखन शैलीने मोहीत होऊन तत्काल ते विकत घेण्यास भाग पडावा.

 

मी माझे विचार मांडले .आपण सर्वांनी असे केले तरी लोप होत असलेली आपली पुस्तक वाचन संस्कृती आपण थोडी तरी थोपवूं शकू आणि पुस्तक वाचनाची गोडी वाढवू शकू.

पुस्तक वाचन संस्कृतीचा रस वाढवा.

*समाप्त*

 

शोभा वागळे.

मुंबई

8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा