You are currently viewing कणकवली आचरेकर प्रतिष्ठान येथे रानफुले छायाचित्र व पुस्तक प्रदर्शन

कणकवली आचरेकर प्रतिष्ठान येथे रानफुले छायाचित्र व पुस्तक प्रदर्शन

आ.वैभव नाईक, प्रा. बाळकृष्ण गावडे यांच्या हस्ते उदघाटन

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा- आ.वैभव नाईक

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीच्या वतीने वामन पंडित यांचे १४ वे रानफुले छायाचित्र प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. आज सायंकाळी आमदार वैभव नाईक, कणकवली कॉलजेचे प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. २२ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन असणार आहे. यावेळी १०० झुडूपफुले या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, जैवविविधतेने समृद्ध असेलल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली फुले, वनस्पती याची माहिती आपल्याला रानफुले छायाचित्र प्रदर्शनातून मिळत आहे. हि कौतुकास्पद संकल्पना आहे. हे प्रदर्शन कुडाळ मालवण मधील मोठ्या शाळांमध्ये राबवून मुलांना वनस्पतींची माहिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न यापुढील काळात करूया. त्याचबरोबर विविध फुलांची माहिती असलेले १०० झुडूपफुले हे पुस्तक प्रा.डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक लोकांपर्यत पोहचविण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. प्रा.डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी अशी अनेक पुस्तके प्रकाशित करावीत. अशा शुभेच्छा आ. वैभव नाईक यांनी दिल्या. गेली काहीवर्षे वातावरणात बदल घडत आहेत. त्यामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

प्रा.डॉ. बाळकृष्ण गावडे म्हणाले, महाराष्ट्र व गोवा राज्यात वामन पंडित यांची रानफुले छायाचित्र प्रदर्शन झाली असून १४ वे रानफुले छायाचित्र प्रदर्शन कणकवलीत भरविण्यात आले आहे. ५५० वनस्पतींचे फोटोसहित माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.वृक्ष, वेली, झुडूपे,वर्षायू रोपटे, विविध प्रकरची फुले, वेगवेगळ्या वनस्पती, गवत अशा वनस्पतींचा समावेश प्रदर्शनात आहे. त्याचबरोबरच १०० झुडूपफुले हे पुस्तक प्रकशित केले आहे. यामध्ये देखील याची सचित्र माहिती वाचकांसाठी सादर केली आहे. त्यामध्ये वनस्पतीचे स्थानिक नाव, शास्त्रीय नाव, कुळ, संक्षिप्त शास्त्रीय वर्णन दिले आहे. हे पुस्तक वनस्पती अभ्यासकांना, निसर्गप्रेमींना, शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. त्यातुन वाचकांच्या ज्ञानात भर पडेल. अशी माहिती त्यांनी देत सर्वांनी हे पुस्तक वाचण्याचे आवाहन डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पंडित, व आभार प्रदर्शन उदय पंडित यांनी केले.
याप्रसंगी मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष झिरगे, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड. नानू देसाई, कार्यकारिणी सदस्य प्रसन्न देसाई, विना काळसेकर, सीमा कोरगावकर, विश्वस्त दामोदर खानोलकर, डॉ. नवरे,श्री. मुरकर, श्री. घोरपडे, श्री. फराकटे, निलेश कोदे, आदी निसर्ग प्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा