कणकवली
शहरात मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या शहरातील एका महिलेचा मोबाईल दोन तरुणांकडून खेचून घेण्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावर घडला. आरडाओरड होताच ते दोन्ही तरुण पसार झाले.
त्या महिलेचे उड्डाणपुलालगत असलेल्या एका बिल्डिंगमध्ये घर आहे. तिने मोबाईल थेट ब्रिज वरून खाली टाकला. मात्र उड्डाणपूलावरून वरून टाकून देखील हा मोबाईल सहीसलामत राहील्याची माहिती त्या महिलेने दिली. कणकवलीत उड्डाणपूलावर रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेकांची गर्दी असते. आज शुक्रवारी सकाळी ती महिला ब्रिजवरून चालत असताना तिच्या मागाहून ॲक्टिवा दुचाकीने आलेल्या दोन तरुणांनी तिच्याजवळ जात गाडी थांबवून काकी माझा मोबाईल बंद पडला आहे. फोन लावायचा आहे तुमचा मोबाईल द्या अशी मागणी केली. मात्र त्या महिलेने नकार देताच त्या दोघातील एका तरुणाने तिच्या सोबत कोणी नाही तिचा मोबाईल खेचून घे असे सोबतच्या दुसऱ्या तरुणाला सांगितले. अशी माहिती त्या महिलेने दिली. या दोघांतील एक हेल्मेटधारी एक विना हेल्मेट परिधान केलेला होता. दरम्यान त्या महिलेने माझे घर इथे खालीच आहे. मोबाईल खेचला तर मी खाली ओरडून सांगेन असे सांगतात त्या दोघातील एक तरूण त्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्यास पुढे सरसावला. मात्र मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्या महिलेने चलाखी दाखवत चक्क मोबाईल उड्डाणपूलावरून खाली टाकला व खाली सर्व्हिस रोडवर असलेल्या एकाला मी या समोरच्या बिल्डींग मध्ये राहते माझा मोबाईल खाली पडला आहे तो घ्या असे सांगितले. यादरम्यान सदर महिलेच्या घराकडून कुणी आले तर आपण पकडले जाऊ या भीतीने हे दोन्ही तरुण महामार्गावरून जानवली च्या दिशेने वेगाने पळून गेल्याची माहिती त्या महिलेने दिली. ही बाब पुलावर चालणाऱ्या अन्य नागरिकांना समजतात या सर्वांमध्ये घबराट पसरली.
कणकवली शहरात सकाळीच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकाराची अद्याप पोलिसात नोंद नाही.