You are currently viewing जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी..

जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी..

मानसिक अपंगता..

 

*हातपाय नसलेली माणसे किंवा मुकी,बहिरी,पांगळी व अंध अशी शरीरांनी अपंग झालेली माणसे आपण पहातो तेव्हां आपल्या मनात त्यांच्याबद्दल कमालीची कणव निर्माण होते.अशा अपंग असणाऱ्या लोकांना सहाय्य करण्यासाठी व त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात.अशा संस्थांना भरघोस आर्थिक मदत देण्यासाठी अनेक माणसे पुढे येतात.कुष्ठ रोगाने पछाडलेली माणसे व अती वृद्धत्वाकडे झुकलेली माणसे ही सुद्धां अपंग ह्या सदराखालीच येतात व त्यांच्यासाठी सुद्धां अनेक सामाजिक संस्था कार्यप्रवण असतात.शासनाकडून सुद्धा अशा संस्थाना आर्थिक साहाय्य केले जाते.त्याचप्रमाणे अपंगांसाठी केलेले कार्य व ते कार्य करणारे कार्यकर्ते यांचा समाजात मोठा गौरव होत असतो.अपंगांसाठी होत असलेले कार्य व ते करणारे कार्यकर्ते हे खरोखरीच फार मोठी समाजसेवा करीत असतात व त्यांचे कौतुक कितीही केले तरी थोडेच. परंतु या संदर्भात खेदाची गोष्ट अशी की,शारीरिक अपंग माणसांबद्दल लोक जेवढा विचार करतात तितका विचार जे मनाने अपंग असतात त्यांच्याबद्दल करीत नाहीत.वास्तविक सर्व राजकीय, सामाजिक,आर्थिक व धार्मिक समस्यांचे मूळ या मानसिक अपंगतेत आहे,याची जाणीवच लोकांना झालेली दिसत नाही.या वस्तुस्थितीची जाणीव नसणे ही आजच्या काळाची गोष्ट नसून ती युगानुयुगे चालत आलेली आहे. मानसिक अपंगत्व हे मानवाच्या सर्व समस्यांचे मूळ आहे,ह्याची स्पष्ट जाणीव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारच्या सुधारणा या उथळ स्वरुपाच्याच ठरणार.शरीराने अपंग असलेली माणसे ही समाजाला किंवा जगाला धोकादायक नसतात,परंतु मनाने अपंग असणारी माणसे समाजाला व जगाला धोकादायक ठरतात. कनक,कांता,कीर्ती आणि सत्ता यांच्या पाठीमागे पिसाट होऊन सुसाट धावणारी माणसे फार मोठ्या प्रमाणावर मनाने अपंग असतात,ह्याची स्पष्ट जाणीव असणे आवश्यक आहे.अशी ही मनाने अपंग झालेली माणसे लाखो लोकांना दुःखाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत ठरतात. वाटेल त्या स्थरावर जाऊन पैसा-संपत्ती मिळविणारी माणसे व सत्ता संपादन करण्यासाठी सर्व प्रकारची दुष्कृत्ये करणारी माणसे समाजाला व जगाला अक्षरशः दुःखाच्या खाईंत ढकलत असतात. शरीराने पूर्ण अव्यंग असणाऱ्या माणसांना पूर्ण अपंग करण्याचे क्रौर्य हे अपंग मनाचे सत्ताधीश व कोट्याधीश करीत असतात. चंगीझखान,स्टॅलिन,हिटलर हे महत्वाकांक्षी लोक होते असे आपण मानतो.पण प्रत्यक्षात ते मनाने अपंग असलेले मनोरुग्ण होते.वेडाच्या भरात कांही माणसे वाटेल ती भयानक दुष्कृत्ये करतात, त्याचप्रमाणे महत्वाकांक्षेच्या गोंडस नावाखाली मनाने अपंग असलेले हे मनोरुग्ण युद्धे व महायुद्धे करून लाखो अव्यंग माणसांना अपंग करून टाकतात.पैसा,संपत्तीसाठी पिसाट झालेली माणसे पैशासाठी सर्व प्रकारची दुष्कुत्ये करून लोकांना अपंग करीत असतात. शरीराने अपंग असणाऱ्या माणसांसाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य होते,त्याच्या एक सहस्त्रांश सुद्धां कार्य मनाने अपंग असणाऱ्या मनोरुग्णांसाठी होत नाही,ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक,वास्तवता अशी आहे की,जगात बहुतेक सर्व लोक मनाने अपंगच असतात.धर्म वेड, पैसा-संपत्तीचे वेड,सत्तेचे व कीर्तीचे वेड,अशा एक प्रकारच्या किंवा सर्व प्रकारच्या वेडांनी झपाटलेली माणसे सर्वत्र असतात.हे वेड आहे किंवा मनाची अपंगता आहे हे लोकांच्या लक्षात तर येत नाहीच, उलट महत्वाकांक्षा किंवा पराक्रम किंवा धर्माभिमान या गोंडस नांवाखाली या वेडेपणाची पद्धतशीर रीतीने जोपासना करण्यात येते.या सर्व मनोरुग्णांचे मूळ केवळ अज्ञानात असते,हे कोणाच्याच लक्षात येत नाही.“सर्व प्रकारची सुखे मला प्राप्त व्हावीत, यश,कीर्ती,संपत्ती,सत्ता मला प्राप्त व्हावी,इतर खड्डयात गेले तरी चालतील,”अशी विशिष्ट धारणा बहुतेक माणसांच्या ठिकाणी वास करीत असते.या विकृत धारणेतून त्यांच्या स्वतःच्या जीवनात व सामाजिक जीवनात दुःखाच्या दाहक ठिणग्या उडू लागतात.ही विकृत धारणा नष्ट करून त्याच्या जागी सुसंस्कृत धारणा प्रस्थापित करणे आवश्यक आहे.त्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण व शिकवण पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दिले गेले पाहिजे.*

🎯 *Man is a social animal,*

*म्हणजे माणूस हा समाजात राहाणारा प्राणी आहे.समाजाच्या सुखात व्यक्तीचे सुख असते तर समाजाच्या दुःखात व्यक्तीचे दुःख असते,ही स्पष्ट जाणीव वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व लोकांमध्ये निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.हे शिक्षण शाळा-कॉलेजांतून मिळत नाही.म्हणून या प्रकारचे शिक्षण व शिकवण सर्वांना मिळवण्यासाठी आवश्यक ती वेगळी व्यवस्था करणे जरुरीचे आहे.हे कार्य सामाजिक संस्था, शिक्षण संस्था व राज्य शासन या सर्वांनी युद्ध पातळीवर करणे,ही काळाची गरज आहे,असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.*

 

*🙏श्री सद्गुरु वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा