जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना
कशी नेत्रांना सुखावी
गुलमोहराची लाली
भर पेटल्या उन्हात
त्याची सांगते खुशाली
म्हणे उन्हाच्या झळांना
सांगा कशाला भ्यायचे
परिस्थितीशी झुंजत
जगा सामोरे जायचे
सूर्य आग ओके तरी
जिणे जगतो मस्तीत
मार्ग आपला शोधावा
काळ जरी विपरीत
असे जगताना सुद्धा
कधी कधी येते नशा
झुंजताना सोसताना
जाते संपून निराशा
घडी भराचे आयुष्य
त्याचा आनंद भोगावा
स्वये भोगता भोगता
साऱ्या जगाला वाटावा
जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक