You are currently viewing डॉ. राधाकृष्णन् हे एक महान ,विद्वान व्यक्तीमत्व!

डॉ. राधाकृष्णन् हे एक महान ,विद्वान व्यक्तीमत्व!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांचा सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन् यांचा स्मृती दिन! निमीत्ताने लिहिलेला अप्रतिम लेख..*

 

 

डॉ. राधाकृष्णन् हे एक महान, विद्वान व्यक्तीमत्व! शालेय जीवनात, ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतानाच या महान व्यक्तीमत्वाची, शैक्षणिक पुरस्कर्ता, शिक्षकांचे समाजातील योगदान मौल्यवान मानणारे म्हणून ओळख झाली. प्रचंड आदराची भावना त्यावेळीही होती आणि आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात ती आहेच.

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामीळनाडूत तिरुमणी या छोट्याशा, गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील, सर्वपल्ली विरस्वामी हे गरीब असले तरी विद्वान होते. आपल्या मुलानेही पंडीत व्हावे ही त्यांची इच्छा होती. राधाकृष्णन हे अतिशय हुशार विद्यार्थी होते. आयुष्यभर त्यांनी शिक्षणक्षेत्रातल्या अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या.

१९०६ मध्ये त्यांनी तत्वज्ञान (philosophy) या विषयात एम ए केले आणि त्यांची मद्रास रेसीडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे, लंडन आॉक्सफर्ड विद्यापीठात भारतीय तत्वज्ञानाचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. बनारस विद्यापीठाचे कुलगुरु असताना, त्यांनीत त्वज्ञानावर अनेक पुस्तके लिहीली.

डाॅ. राधाकृष्णन् विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले आदर्श मानतात. लेख आणि भाषणाद्वारे त्यांनी भारतीय तत्वज्ञान संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बहुआयामी व्यक्तीमत्व होते त्यांचे. भारतीय प्रतिभा आणि संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते.

१९४७ साली देश स्वतंत्र झाला. पंडीत नेहरु पंतप्रधान झाले. त्यावेळी नेहरूंनी त्यांना सोव्हीएत युनीअन बरोबर खास राजदूत म्हणून मुत्सद्देपणाची कामगिरी करण्यासाठी आवाहन केले. अशा रितीने ते राजकारणात आले. स्वातत्र्यानंतर दहा वर्षांनी आपल्या देशाच्या घटनेत उपराष्ट्रपतीचे पद नेमले गेले. आणि भारताचे पहिले ऊपराष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक झाली.

१९५८ साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. १९६२ ते १९६७ दरम्यान त्यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून हे पद भूषविले. या दरम्यान भारतीय राजकारणात बरेच चढऊतार झाले. दोन पंतप्रधानांच्या मृत्युसमवेत भारत चीनच्या भयंकर युद्धातल्या पराभवाचा सामना त्यांना कणखरपणे करावा लागला. जर्मन आॅर्डर पौल ले मेरीट फाॅर आर्ट्स अँड सायन्स पुरस्कार, शांतता पुरस्कार, ब्रिटीश आॅर्डर आॅफ मेरीट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली. शिक्षण आणि शांततेसाठी मिळणार्‍या नोबेल पारितोषिकासाठी त्यांना १६ वेळा नामांकित केले गेले.

विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन. तो वैशिष्ट्यपूर्ण साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली. डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी खूप आदर होता. नव्या पीढीचे शिल्पकार म्हणून ते त्यांना मान देत. म्हणून राधाकृष्णन यांनी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे विद्यार्थ्यांना सुचवले. आणि तेव्हांपासून शाळांमधून ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून धूमधामपणे साजरा होतो. या दिवशी विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका पार पाडतात.

१९६७ साली डाॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले आणि मद्रासला येउन स्थायिक झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे शिवकामु या त्यांच्या नात्यातल्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना पाच मुलगे आणि एक मुलगी होती. मात्र त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन विस्कटले.

अखेरच्या दिवसात त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. १७ एप्रील १९७५ साली वयाच्या ८६ व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.

भारतीयांसाठी अत्यंत भूषणीय बहुआयामी व्यक्तीत्व!

। झाले बहु होतील बहु आहेत बहु । परि यासम हाच।।

त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना ही आदरांजली वाहूया..

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा