कुडाळ
गोव्याहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गुजरात येथील पर्यटकांच्या कार गाडीची जोरदार धडक महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसून झालेल्या अपघातात कार मधील तिघे जण जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर चा अपघात गुढीपूर येथील महामार्गावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.
गोव्याहून गुजरातच्या दिशेने चार युवक गुजरातला जात होते. सांयकांळी 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार गाडी कुडाळ गुढीपूर येथील महामार्गावर आली असता तेथुन महामार्ग ओलांडून दुस-या बाजुला पायी चालत जाणा-या व्यक्ती समोर दिसली व त्याला बाजु देण्याच्या प्रयत्नात त्यांची कारगाडी लॉक झाली. त्यामुळे कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारची जोरदार धडक महामार्गाच्या डाव्या बाजूच्या कडेला उभ्या असलेल्या असलेल्या डंपर ला बसली व अपघात घडला.
कारची धडक इतकी जोरदार होती की, डंपरची डिझेल टाकी तुटून रस्त्यावर पडली व फुटली. त्यामुळे महामार्गाच्या एका बाजूला पूर्ण डिझेलचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत होता तर कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.
गाडीतील सुरक्षा बलून उघडल्याने आत मध्ये बसलेले चारही जणांना मोठ्या स्वरूपाची दुखापत झाली नसली तरीही तिघांना काही प्रमाणात दुखापत झाली असून त्यांना तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदरच्या या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
महामार्गाच्या कडेला काही ठिकाणी डंपर, ट्रक तसेच इतर काही वाहने मोठ्या प्रमाणात दिवसभर उभी करून ठेवली जातात. तसेच छोटे मोठे अपघात यामुळे ही होतात त्यामुळे या अवैद्य पार्किंग बाबतही महामार्ग प्रशासन काय भुमिका अशी चर्चा घटनास्थळी केली जात होती.