कोरोना रुग्ण संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट शासनाने जिल्हा आरोग्य प्रशासनाला दिले आहे का?
वैभववाडी
वैभववाडी तांबेवाडी येथील तो पॉझिटिव्ह मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करून जिल्हा आरोग्य प्रशासनाने काय साध्य केले. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट संबंधित प्रशासनाला राज्य शासनाने दिले आहे का ? असा खोचक सवाल व वाभवे – वैभववाडीचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.
वैभववाडी तालुक्यात नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवली आहे. पुढील काळात ती वाढल्यास याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन राहील असेही तांबे यांनी पत्रकात म्हटले आहे.
वैभववाडी तांबेवाडी येथील वामन तांबे यांचा कोरोनामुळे बुधवारी ओरोस रुग्णालयात मृत्यू झाला. खना नारळाने ओटी भरल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने चार कोरोना कीट व रुग्णवाहिका उपलब्ध करून देत तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. व मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेत नातेवाईकांना बसवून पाठवणी केली.
या घटनेचा आम्ही निषेध करतो. खरंतर या मृतदेहाचे अंत्यसंस्कार प्रशासनाने करणे अपेक्षित होते. माणुसकीचा धर्म या नात्याने वाडीतील चौघांनी कोरोना कीट घालून अंत्यसंस्कार केले. परंतु संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना झाल्यास व रुग्ण संख्या वाढल्यास त्याला जबाबदार कोण? याची जबाबदारी शासन घेणार आहे का? असा सवालही तांबे यांनी उपस्थित केला आहे.