You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

वैभववाडी महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक व इतिहास विभागाच्यावतीने दिनांक १४ एप्रिल, २०२२ रोजी क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.


यावेळी या जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयातील स्पंदन विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या भीत्तीपत्रकाचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. एम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा फुले व डॉ.आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर, थोर क्रांतिकारक समाजसुधारक म.फुले व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.आंबेडकर यांचे पुरोगामी विचार आत्मसात केले पाहिजेत. म.फुले यांनी अज्ञान आणि अविद्या यामुळे समाजाची झालेली हानी दूर करण्यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व कृतीशील कार्यातून दाखवून दिले.
सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून धार्मिकक्रांती घडवून आणली. म.फुले हे १९ व्या शतकातील एक कर्ते सुधारक होते असे इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस. एन. पाटील यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतीय इतिहासातील महान व्यक्तीमत्व नाही तर जागतिक पातळीवरील महामानव कसे आहेत हे अनेक उदाहरणांसह मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.श्री. आर. एम. गुलदे सांगितले. डॉ.आंबेडकर यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊन ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कसे होते याबाबत प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एन. आर. हेदुळकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ.आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा समाजाला केलेला उपदेश आजही कसा खूप महत्त्वाचा आहे हे ग्रंथपाल श्री.किशोर वाघमारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
सर्वच महापुरुषांचे विचार आदर्शवादी असतात. या जयंतीच्या निमित्ताने थोरांचे विचार आत्मसात करून वाटचाल केल्यास स्वतःबरोबरच राष्ट्राचा विकास होण्यास मदत होईल असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सी.एस. काकडे यांनी सांगितले. या संयुक्त जयंती कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राहुल भोसले यांनी केले तर आभार डॉ.विजय पैठणे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनेश बेटकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा