आपण आपल्या एका प्रवचनात सुविचाराचे सुदर्शनचक्र माणसाला कल्याणकारक ठरते असे विधान केले होते,त्या संदर्भात आपण अधिक खुलासा कराल का?*
*”Man is a thinking animal” म्हणजे माणूस हा विचार- प्रधान प्राणी आहे,असा तर्कशास्त्राचा सिद्धांत आहे. याचा भावार्थ असा की,माणूस सदैव कसला ना कसला तरी विचार करण्यात गर्क झालेला असतो.तो विचार करण्यात गर्क असला तरी या विचार करण्यात तर्क संगती असते,असे मात्र नाही.विचार करण्यात तर्क संगती तर नसतेच पण विसंगती मात्र फार मोठ्या प्रमाणात असते.विचार करताना विचारांचे रंग क्षणोक्षणी पालटत असतात.एका क्षणात माणसाच्या मनात हजारो विचार येऊन जातात.विचार करण्याची सवय माणसाला इतकी जडून गेलेली आहे की,हजारो विचार त्याच्या मनात येऊन गेले तरी त्याला त्याचा पत्ताच नसतो.निराशाजनक व विनाशकारक अशा स्वरूपाचे विचार सामान्य माणसाच्या मनात सामान्यपणे सातत्याने घोळत असतात.अशा त-हेची विचार करण्याची पद्धती हा जणू माणसाचा स्वभावच होऊन बसलेला आहे.माणूस वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या स्वभावाला अनुसरून वाईट,विनाशकारक,दुःखकारक,क्लेशकारक,द्वेषमूलक असे विचार सतत करीत राहून सुद्धा आपण अशा त-हेचे विचार करीत आहोत याची त्याला कल्पना सुद्धा नसते.याचा परिणाम असा होतो की,या प्रकारचे अनिष्टकारक विचार चक्र माणसाच्या भोवती सतत फिरू लागून तो त्या चक्रात सापडतो व अक्षरश:चक्रम बनतो.As you think, so you become म्हणजे “जसे विचार त्या प्रमाणे माणसाच्या जीवनाला आकार” ह्या जीवनविद्येच्या सिद्धांतापमाणे अनिष्टकारक विचारचक्रातून अनिष्ट परिस्थिती माणसाच्या वाट्याला येणे अपरिहार्य ठरते.या परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग एकच आहे व तो म्हणजे जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे माणसाने प्रथम आपली जुनी सवय मोडून नवी सवय स्वीकारली पाहिजे.विचारचक्रात गुरफटून जाण्याची जुनी सवय मोडून,विचारचक्राचे अलिप्तपणे दर्शन घेण्याची सवय जडवून घेतली पाहिजे.अलिप्तपणे विचार चक्राचे दर्शन घेता घेता,माणसाला त्या दर्शनातून हितकारक व अनिष्टकारक अशा विचारांची छाननी करता येते.अशा त-हेची छाननी करता करता अनिष्टकारक विचारांचा त्याग करणे व हितकारक विचारांची जोपासना करणे त्याला शक्य होते.अशा त-हेने एकदा का माणसाला हितकारक व सुखकारक सुविचारांचे सु-दर्शन घेण्याची सवय जडली की,त्या सु-दर्शनातून सुविचारांचे कल्याणकारक सुदर्शन चक्र साकार होऊन ते त्या माणसाच्या भोवती फिरू लागते.या सुदर्शन चक्राचा विलक्षण प्रभाव असा की,माणसाच्या जीवनातून अनिष्टकारक व दु:खकारक गोष्टी दूर फेकल्या जातात व हितकारक,कल्याणकारक व सुखकारक अशा सर्व गोष्टी त्याच्याकडे आकर्षित होतात. थोडक्यात,“घातक व विनाशकारक विचारचक्र निर्माण करून आपण आपला नाश करून घ्यावयाचा की,हितकारक व सुखकारक सुदर्शनचक्र निर्माण करून आपण आपले कल्याण साधावयाचे’ हे ठरविणे केवळ माणसाच्याच हातांत आहे;आणि म्हणूनच जीवनविद्या आवर्जून सांगते…”तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏