सिंधुदुर्ग
पंचतत्व ग्लोबल मीडिया एलएलपी (नियोजित) व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ (रजि) यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली येथील साळगांवकर मंगल कार्यालय येथे नाट्यसम्राट कै. मच्छीन्द्र कांबळी व दशावतारी नटसम्राट लोकराजा कै. सुधीर कलिंगण या दिग्गज कलाकारांना “भावपूर्ण श्रद्धांजली” अर्पित करून, कोकणातील दशावतार या लोककलेचा प्राधान्याने विकास व्हावा व उदयोन्मुख दशावतार कलावंतांना या लोककलेच्या माध्यमातून स्पर्धात्मक दृष्टीकोनातून आपला अभिनय रसिकांपर्यंत पोहोचवता यावा त्याचप्रमाणे कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने दिनांक ७ व ८ मे २०२२ रोजी “पारंपरिक दशावतार नाट्य स्पर्धा २०२२” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
आयोजन समितीने सदर दशावतार नाट्य कलाकारांना सादरीकरण करण्याची वेळ ही २५ मिनिटं देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील काही कलाकारांनी व मंडळांनी आयोजन समितीची भेट घेवून दशावतार नाट्य सादर करण्यास २५ मिनिटं ही वेळ खूपच कमी असल्याने ती वेळ वाढवून ४० मिनिटं करावी अशी विनंती केली होती.*
दशावतार कलाकारांनी केलेल्या या विनंतीस मान देवून आयोजन समितीने या दशावतार नाट्य स्पर्धेतील नाट्य सादरीकरणाची वेळ आता ४० मिनिटं करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नाट्य प्रयोगाची वेळ वाढवून दिल्याने स्पर्धेतील वेळेचं व्यवस्थापन पाहता, सदर कार्यक्रम हा दिनांक ७ व ८ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो कलाकारांनी व मंडळांनी मान्य केला आहे.
जेणेकरून आता दशावतार नाट्य स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना आपली कला सुनियोजित वेळेत सादर करण्याची संधी मिळेल व दशावतार नाट्य रसिकांना त्याचा आनंद घेता येईल असे आयोजन समितीच्या वतीने राजन रेडकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे “पारंपारिक दशावतार नाट्य स्पर्धा २०२२” स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व दशावतारी कलाकारांना व मंडळांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.