*जन्माला आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाला आपला संसार सुखाचा व्हावा, संसारात शांती, समाधान, आनंद यांचा लाभ व्हावा असे मनापासून वाटत असते.* हे साध्य साधण्यासाठी काय केले पाहिजे याची जाणीव मात्र सामान्य माणसाला नसते. *ज्याप्रमाणे पक्ष्याला आकाशात उडण्यासाठी दोन पंखांची गरज आहे,त्याप्रमाणे जीवनाच्या गगनात सुखाने विहार करण्यासाठी माणसाला पैशाची कमाई व पुण्याईची कमाई अशा दोन पंखांची नितांत गरज आहे.* संसारात पैसा अत्यंत आवश्यक आहे,याची जाणीव सामान्य माणसाला असते. परंतु संसारात पुण्याईची ठेव तितकीच आवश्यक आहे याची मात्र त्याला जाणीव नसते.याचा परिणाम असा होतो की, माणूस फक्त एकाच पंखाने उडण्याचा प्रयत्न करतो व या प्रयत्नात त्याला यश येत नाही, उलट एकाच पंखाने उडण्याच्या प्रयत्नात पक्ष्याला आपटी खावी लागते.
त्याप्रमाणे नुसत्या पैशाच्या बळावर जगण्याच्या प्रयत्नात माणसाला अपयश पत्करावे लागते.पैशाचे महत्त्व वादातीत आहे.पैशाशिवाय जीवन जगणे अशक्य आहे याचाही माणसाला अनुभव आहे. म्हणून “पैसा मिळवा” असा उपदेश करण्याची पाळी कधीच येत नाही. परंतु पुण्याची गोष्ट मात्र तशी नाही. याचे कारण *पैसा हा दृश्य, व्यक्त, सगुण व साकार आहे, तर याच्या उलट पुण्य आहे अदृष्य, अव्यक्त, निर्गुण व निराकार. म्हणूनच Out of sight is out of mind या म्हणीप्रमाणे पुण्याईच्या कमाईकडे सामान्य माणसाचे लक्षच जात नाही.* व्यवहारात पैसा नसेल तर पावलोपावली अडेल पण गांठी पुण्य नाही म्हणून काही अडले असा अनुभव वरपांगी तरी येत नाही. बसमध्ये बसलात तर कंडक्टर तुमच्याजवळ तिकीट घेण्यासाठी आवश्यक तो पैसा आहे का याची विचारणा करील, पण तुमच्याजवळ पुण्य आहे का याची फिकीर तो जरासुद्धा करणार नाही. तो जसा
फिकीर करीत नाही त्याप्रमाणे आपणही फिकीर करीत नाही.
याचा परिणाम असा होतो की,
*सुख पहाता जवा पाडे। दु:ख पर्वताएवढे।।*
असा अनुभव मरेपर्यंत माणसाला येत रहातो.
*संसाराच्या तापे तापलो मी देवा।*
*करीतां या सेवा कुटुंबाची।।*
*असा भयंकर ताप त्याला जीवनभर होत असतो. एक पुती रडे, सातपुती रडे व नापुती तीही रडतेच. त्याप्रमाणे पैसा नाही ते तर रडतातच पण ज्यांच्याजवळ पैसा आहे तेही रडतात. गरिबांची सुख-दु:खे वेगळी व श्रीमंतांची सुख-दुःखे वेगळी इतकाच काय तो फरक, परंतु रड आणि डर सर्वांना सारखीच डसलेली आहे.*
“ *पाप तेथे ताप व पुण्य तेथे समाधान* ” असा निसर्गाचा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे.
हा सिद्धांत अंधश्रद्धेवर अधिष्ठित नसून *Action and reaction are equal and opposite* या सायन्सच्या Universal Law सिद्धांतावर अधिष्ठित आहे. *भाव तसा देव म्हणजेच क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम आहे व खऱ्या अर्थाने हा नियम म्हणजे यम आहे, चित्रगुप्त आहे. आपण जी कर्मे करतो ती सर्व कर्मे गुप्त रीतीने आपल्या अंतर्मनावर चित्रित करण्याची चित्रगुप्ताची-नियतीची योजना आहे. ही गुप्त रीतीने चित्रित केली गेलेली आपली कर्मेच कालांतराने परिपक्व होऊन दैव, प्रारब्ध किंवा नशीब या रूपाने आपल्या जीवनात प्रगट होतात.* *पापात्मक कर्मे जीवनात ताप निर्माण करतात तर पुण्यात्मक कर्मे जीवनात सुख निर्माण करतात त्याचप्रमाणे पाप-पुण्य मिश्रित कर्मे जीवनात सुख-दुःख निर्माण करतात.*
*As you sow so you reap,* *”पेरावे तसे उगवावे’ हा निसर्गाचा अचूक सिद्धांत आहे.*
म्हणून जीवन जगताना अशा कौशल्याने जगले पाहिजे की, शक्यतो पाप टाळून पुण्याची जोड व्हावी.
*You are the architect of your own destiny, आपल्या भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत* ‘ *ही गोष्ट खरीच आहे. म्हणूनच जीवनात अधिकाधिक सत्कर्मे करणे आवश्यक आहे.*
*दानधर्म करणे, लोकांना नोकऱ्या देणे, ज्ञानदान करून लोकांना सन्मार्गाला लावणे वगैरे सत्कर्मे करून पुण्याईची कमाई करता येते.* परंतु सामान्य माणसाला हे करणे शक्य होत नाही. दानधर्म करावयास त्याच्याजवळ पैसा नसतो, लोकांना नोकऱ्या देण्यासाठी त्याच्याजवळ सत्ता नसते व दुसऱ्यांना ज्ञान देऊन सन्मार्गाला लावण्यासाठी त्याच्याजवळ ज्ञानही नसते किंवा इतरांना ज्ञान देण्याची त्याच्याजवळ कुवत नसते. अशा परिस्थितीत सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी खोल विचार करून उत्कृष्ट असा मार्ग शोधून काढला.
*संत एकांती बैसले। सर्वही सिद्धांत शोधिले।।*
*ज्ञानदृष्टी अवलोकिले। सार काढिले निवडोनि।।*
*ते हे श्रीहरीचे नाम। सर्व पातकां करी भस्म।।*
*अधिकारी उत्तम वा अधम। चारी वर्ण नर नारी।।*
*सर्व पूर्व पापांचे भस्म करणारे,अगणित पुण्याची कमाई करून देणारे, कष्ट रहित व खर्च रहित, चारी वर्णांच्या लोकांना व स्त्रियांना सहज घेण्यास सोपे असे सुंदर सारभूत साधन म्हणजे भगवन्नाम संतांनी शोधून काढले व सर्व जनतेला उदार अंत:करणाने बहाल केले.*
*हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।*
*पुण्याची गणना कोण करी।।*
अशी गर्जना योगियांचे मेरूमणी,ज्ञानियांचे शिरोमणी व भक्तांचे मुगुटमणी अशा थोर पूज्यपाद ज्ञानेश्वर महाराजांनी केली. तर तुकाराम महाराजांनी हांकारून सांगितले,
१) *अलभ्य ते लाभ होतील अपार।*
*नाम निरंतर म्हणतां वाचे।।*
२) *बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त।*
*तया सुखा अंत पार नाही।।*
*रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी।*
*मंत्र हा उच्चारी वेळोवेळां।।*
समर्थ रामदास स्वामी हेच सांगतात,
*पुण्य कर्म ते ईश्वर स्मरण। पाप कर्म ते विस्मरण।।*
म्हणून हे लक्षात ठेवले पाहिजे की,
*सर्वात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा सर्व सत्कर्मांचा राजा आहे. असे हे नामस्मरण करणे म्हणजे अक्षरश: अगणित पुण्याईची कमाई करणे होय. असे हे नामस्मरण करण्यास कुठल्याही उपकरणांची किंवा उपचारांची गरज नाही. दिसायला छोटे व फळ देण्यास मोठे, अत्यंत उत्कृष्ट व उपाधी रहित असे हे पुण्यप्रद साधन आहे. आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या हरिनामांत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र हे हरिनाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते. याचे प्रमुख पहिले कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही. “नाम घेऊन काय होणार” असा अजागळ प्रश्न ते विचारीत रहातील पण “नाम घेऊन काय घडते” हे मात्र अनुभवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न त्यांचेकडून घडत नाही. दुसरे महत्त्वाचे कारण असे की, माणसाचे मन हे मुळातच अतीव चंचल असल्यामुळे अशा चंचल मनांत हरिनामाची धारणा होत नाही. त्यासाठी संत संगतीत राहून अट्टाहासाने हरिनाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असा अभ्यास केल्याने हरिनाम खोल अंतर्मनात पोहोचते व तेच नाम परिपक्व होवून राम रूपाने आपल्या जीवनात प्रगट होते.*
*मग राम नामी उपजे आवडी।*
*सुख घडोघडी वाढो लागे।।*
*कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे।*
*हृदयी प्रगटे राम रूप।।*
*अशा रीतीने संसार त्याग न करितां,उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास, ताप, उपद्रव किंवा दुःख न देता व नित्य नामस्मरण करून पुण्याईची कमाई करणे हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग होय.*
म्हणूनच संत एकनाथ महाराज सांगतात,
*सुखे संसार हा करि।*
*वाचे उच्चारावा हरि।।*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏