You are currently viewing मालवण ग्रामीण रुग्णालय येथे २१ रोजी आरोग्य शिबीर

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे २१ रोजी आरोग्य शिबीर

मालवण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत प्रत्येक तालुक्यात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असून या अंतर्गत दि. २१ एप्रिल रोजी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य शिबीर होणार आहे.

यात विविध प्रकारच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य निदान व प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत, तसेच आयुषमान भारत योजने अंतर्गत रुग्णांना मोफत हेल्थ कार्ड देखील काढून देण्यात येणार आहे, अशी माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली सर्व आरोग्य यंत्रणा सहभागी होणार आहे.

या मेळाव्याचे नोडल ऑफिसर हे जिल्हा शल्य चिकित्सक असणार आहेत. शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे, विविध संसर्ग जन्य व असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व आरोग्य शिक्षण देणे आदी या आरोग्य मेळाव्याची उद्दिष्टे आहेत. मालवणात ग्रामीण रुग्णालय येथे २१ रोजी आरोग्य शिबीर होणार असून यावेळी दंत समस्या, स्त्रीरोग, कॅन्सर, त्वचारोग, दृष्टी दोष, एड्स, अस्थमा यासह विविध आजारांचे निदान व प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत. तसेच निदानासाठी स्क्रिनिंग, फॅमिली प्लॅनिंग मार्गदर्शन, होमिओपॅथी, ऍलिओपॅथी रक्त तपासणी, ईसीजी, आयुर्वेदिक, औषधे आदी आरोग्य सुविधा यावेळी उपलब्ध असणार आहेत.

या शिबिरात आरोग्य व आजारांविषयक विविध ३६ विभागातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. या शिबिरात आयुषमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि PM- JAY योजना तसेच उपस्थित रुग्णांसाठी ABDM अंतर्गत युनिक हेल्थ आयडी कार्ड तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. पात्र नागरिकांना मोफत आयुषमान भारत कार्ड मिळवून देण्यात येणार आहे, या कार्ड चा उपयोग रुग्णांना पुढील उपचारासाठी होऊ शकतो, असेही डॉ. पाटील म्हणाले. या मेळाव्याच्या नियोजन कमिटी मध्ये गटविकास अधिकारी, महिला बालविकास अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, तसेच वैद्यकीय अधीक्षक, मालवण तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. या आरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. बालाजी पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा