You are currently viewing कुलगुरू डॉ अरुण पाटील यांनी साधला बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांशी संवाद

कुलगुरू डॉ अरुण पाटील यांनी साधला बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांशी संवाद

*स्वीकारलेले काम एन्जॉय करा; त्यातील आनंद घ्या : (वर्तमानकालीन चालेंज स्वीकारण्याची मानसिकता आपणाला यशस्वी बनवते) : डॉ अरुण पाटील*

 

कुडाळ :

“कामातील आनंदासाठी स्वीकारलेले काम एन्जॉय करा. त्यातून मोठा आनंद मिळेल; त्यासाठी वर्तमानकालीन चालेंज स्वीकारण्याची मानसिकता ठेवा. चालेंज पुर्ततेतून मिळणारा आनंद मोठा असतो, असे उद्गार संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अरुण पाटील यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “स्वीकारले काम जेव्हा हृदया पासून करता तेव्हा त्याचा पाया भक्कम होतो. शुद्ध हेतू ने काम करता तेव्हा त्याची योग्य ठिकाणी योग्य दखल घेतली जाते; मात्र कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. कामाच्या वेळी मजा कराल तर नंतर कष्टमय जीवनाला सामोरे जावे लागेल. अनेक संधी आपणांस खुणावत असतात याचा शोध घ्या. नावीन्याचा शोध घ्या. त्याचा नक्कीच सन्मान होईल. शिक्षणात रस निर्माण करण्यासाठी पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करा. विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षण देण्यात ऐवजी रसपूर्ण प्रोजेक्ट बेस अध्यापन पद्धतीचा वापर करा. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी आपले ज्ञान अपडेट करावे असे सांगत फिजिओथेरपी चे विद्यार्थी, सी बी एस ई चे विद्यार्थी व अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांशी शिक्षण व शिक्षकां समोरील आव्हानांचा ऊहापोह करत त्यांनी विविध विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती ऑस्ट्रेलिया सारख्या देशात आपल्या बुद्धीमत्तेने इतरांना प्रभावित करू शकते. एवढेच नव्हे तर नावलौकिक प्राप्त संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू होऊ शकते हा आपला जीवन वृत्तांत उपस्थितांसमोर कथन करत आपणही असे यश स्वकष्टाने संपादन करु शकता. हे सांगत या युगात रिसर्चला प्राधान्य द्या. जेणेकरून त्याचा समाजाला आणि पर्यायाने देशाला उपयोग होईल. नवीन पिढीकडे प्रचंड क्षमता आहे त्या क्षमता कशा कुठे वापरायचं याचं भान ठेवून काम केल्यास यशस्वी होता येते”, असे सांगत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने कुडाळ सारख्या छोट्या शहरात जे शैक्षणिक , सामाजिक कार्य हाती घेतलेले आहे. त्याची त्यांनी मुक्तकंठाने स्तुती करत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या धडपड्या व नावीन्याची आस असलेल्या शैक्षणिक सामाजिक बांधिलीकीची जोपासना या गुणाबद्दल गौरवोउद्गार काढले. भविष्यात शैक्षणिक कार्यामध्ये काही मदत लागल्यास आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर कोकण न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक विजय शेट्टी, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, सेंटर स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे व मुंबईतील फिजिओ थेरेपी चे प्राध्यापक डॉ.सतीश पिंपळे उपस्थित होते.

दीप प्रज्वलन करून व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर संस्थेच्या वतीने उमेश गाळवणकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व संविधानाची प्रत भेट देऊन डाॅ.अरुण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विजय शेट्टी यांनीसुद्धा डॉ. अरुण पाटील यांच्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून देत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग येथील शिक्षण संस्थांना व्हावा या उद्देशाने आपण त्यांना सिंधुदुर्गात आमंत्रित केले. हे सांगत त्यांच्यातील ज्ञानवंत, गुणवंत, प्रतिभावंत, प्रज्ञावंत अशा सहार्यशील व्यक्तिमत्त्वाचा येथे उपयोग करून घ्यावा, असे सांगत डॉ. अरुण पाटील व बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारीवृंद महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या एच आर ओ पियुषा प्रभूतेंडोलकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा अरुण मर्गज यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा