शैक्षणिक वर्ष 1969-70 च्या गोविंदराव हायस्कूलच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा म्हणजे सत्तरीला पोहोचलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना फुटलेली नवी पालवी आणि आंब्याच्या मोसमात आलेला गंधभरीत मोहोर ! कोरोनामुळे लांबलेला हा मेळावा गोविंदराव हायस्कूलचा निरोप घेतल्यानंतर तब्बल 52 वर्षांनी दि.27 व 28 मार्च, 2022 रोजी महाबळेश्वरच्या हॉटेल क्लाऊड मिस्टमध्ये अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
ज्येष्ठ नागरीक संज्ञेस पात्र झालेल्या जोधपुरपासून बेंगलोरपर्यंत उत्साहाचे उधाण घेऊन आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे सुवर्ण क्षण टिपताना हॉटेल क्लाऊड मिस्टच्या अंगावर देखील रोमांच उभे राहिले असतील. याप्रसंगी प्रकाशित करण्यात आलेली सुवर्णगंध ही स्मरणिका या सुवर्णमहोत्सवी स्नेह मेळाव्याची संस्मरणीय भेट तर होतीच, पण उत्तरायणाकडे झुकलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मर्मबंधातली ठेव ठरली. शाळेचा धावता इतिहास, स्थापनेपासूनचे मुख्याध्यापक , या बॅचला ज्ञानदान केलेले शिक्षक तसेच दिवंगत सहाध्यायांच्या छायाचित्रांनी शाळेच्या जुन्या आठवणी जागवल्या. याशिवाय शाळेच्या परिसरातील ऐतिहासिक वस्तू-वास्तूंनी सजलेल्या या स्मरणिकेन विद्यार्थ्यांच्या बोटाला धरून थेट पन्नास वर्षांपूर्वीच्या भूतकाळात नेले.
आटोपता औपचारिक कार्यक्रम घेवून वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी चाललेली प्रत्येकाची घालमेल आणि विविध पदार्थांनी सज्ज असलेल्या
भोजनाबरोबरच मने भरून घेण्याची प्रत्येकाची धडपड खरोखर पाहण्यासारखी होती. मनाचा वेध घेणारा कॅमेरा नाही, अन्यथा सत्तरीतील या बालकांची निरागसता आणि उडाणपणा पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली असती. भाषण-मनोगत आणि परिचयाची कुंपणे पार करून विविध गुणदर्शन कार्यक्रमात व्यक्त होण्यासाठी आसुसलेले हे सहाध्यायी अनामिक आंतरिक शक्तीने भारलेले होते.
मध्यरात्री बारापर्यंत रात्र जागवूनही लवकर उठून पोहण्यासाठी आणि आल्हाददायक हवेची झुळूक अंगावर घेत समोरचा निसर्ग डोळे भरून पाहत चहा घेणारी पात्रे एखाद्या नाटक मंडळीतून तर इकडे आली नाहीत ना, असे वाटत होते. आदल्या दिवशीचे जागरण , नृत्य-गीतांची धमाल आणि कराओकेतील भूमिका वठवून नव्या उत्साहाने महाबळेश्वर दर्शनासाठी सकाळी 9 वाजता सिद्ध झालेली मंडळी पाहून त्यांच्या सुप्त उर्जेचा हेवा वाटत होता. डोक्यावर रंगीत कॅप्स, चंदेरी बटा किंवा विस्तृत भालप्रदेश, चेहर्यापेक्षा मोठे लावलेले गॉगल्स, वयाला न जुमानणारा रंगीबेरंगी फॅशनचा पेहराव, हँड बॅग, पर्स सांभाळत लगबग करणारे हे एकेकाळचे वर्गमित्र महाबळेश्वरातील पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत होते.
सायंकाळी बस इचलकरंजीत परतताना वेण्णा लेककडे डोळे भरून पाहणार्या या मंडळींना नकळत डोंगरामागे अस्ताला जाणारा सूर्यही अचंब्याने पाहत होता. बसमध्ये अंताक्षरीचा चाललेला कलकलाट आणि वाटेतील उपहारगृहात माफक क्षुधा शांती करून घरी परतणारे ,हे पक्षी या जगातील नव्हतेच की काय अशी शंका वाटत होती.