कणकवली महाविद्यालयात दीक्षांत समारंभ उत्साहात
कणकवली
“महाविद्यालये ही व्यक्तिमत्व विकासाचे आणि सुसंस्काराचे केंद्रे असतात. येथे मिळालेल्या माहिती व ज्ञानाचा व्यवहारात योग्य उपयोग करायला शिकले पाहिजे. आजकालच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नये. कठोर अभ्यास आणि प्रयत्नात सातत्य असेल तर जीवनातील कोणतेही उच्च ध्येय आपण सहज गाठू शकतो. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्व आपले व्यक्तिमत्त्व अधिक सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येकाने तेजस्वीता, तपस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे तीन गुण लक्षात घ्यायला हवेत” असे प्रतिपादन कणकवली येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांनी व्यक्त केले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र प्रदान- दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सौ.वैशाली राजमाने बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत होते.यावेळी कणकवली तहसीलदार आर.जे.पवार,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त डॉ. राजश्री साळुंखे, आप्पासाहेब साबळे,सतीश नाईक, डॉ.संदीप साळुंखे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले आदी उपस्थित होते. या प्रसंगी कला,वाणिज्य, विज्ञान विभागातील पदवीधर व एम.ए.,एम.कॉम. पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना तहसीलदार आर.जे. पवार म्हणाले की, शिक्षणाचा उपयोग केवळ आपल्या चरितार्थासाठीच होऊ नये तर आपल्याला मिळालेल्या पदवीचा उपयोग सामाजिक सेवेसाठी केला पाहिजे. आपण आजन्म विद्यार्थी असतो याचे चे भान ठेवून अधिकाधिक उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आजच्या विद्यार्थ्यांनी बाळगायला हवी. या कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांनीही मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील उच्च शिक्षणाच्या सुविधा व ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून घेऊन अधिकारी पदाची स्वप्ने साकार केली पाहिजेत. महाविद्यालयाच्या आणि आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी धडपड करावी. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त डॉ.राजश्री साळुंखे यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. ‘शिकेल तो टिकेल’ हे ब्रीद प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेऊन ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञानाची ही कास धरली पाहिजे.
आपल्या विचारांच्या कक्षा वाढवण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण यांची योग्य सांगड घालणे ही काळाची गरज आहे.कै.केशवराव राणे यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कणकवली महाविद्यालयाचा लौकिक कारण ठेवावे. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य आप्पासाहेब सापळे, डॉ. संदीप साळुंखे, विद्यार्थी प्रतिनिधी सुनील बाक्रे यांचीही समयोचित भाषणे झाली. अप्पासाहेब सापळे यांनी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना महत्त्व द्यावे असे आवाहन यावेळी केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले. “आमचा विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न होता तो ज्ञानोपासक हवा यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रयत्न असून विद्यार्थ्यांची वैचारिक प्रगल्भता वाढावी यासाठी कणकवली महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात.शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून चांगला माणूस घडण्यासाठी असते याचे भान ठेवून आमचे महाविद्यालय आघाडीवर कार्यरत असल्याचे डॉ.चौगुले यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.युवराज महालिंगे यांनी मानले.यावेळी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.