You are currently viewing “मला वाटते”

“मला वाटते”

*कवयित्री प्रा.सुमती पवार यांची “मला वाटते” ही कविता सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट*

 

नाशिक येथील निवृत्त प्राध्यापिका लेखिका, कवयित्री सौ.सुमती पवार यांची “मला वाटते” ही कविता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. निसर्गाचे आपल्या जीवनातील योगदान ही संकल्पना घेऊन प्राध्यापिका सौ.सुमती पवार यांनी ही कविता लिहिलेली आहे. पर्यावरणातील सर्वच घटक मनुष्याची निस्वार्थ सेवा अनंत काळापासून करीत आहेत. सूर्य, चंद्र, वर्षा, वायू यांनी आपले सर्वस्व देऊन मनुष्याचे जीवन समृद्ध, सुंदर बनविले आहे. त्याप्रमाणेच जीवन जगणाऱ्या एका बालक/बालिकेच्या मनोरथाना कवयित्रीने शब्दबद्ध केले आहे. सृष्टीतील सर्वच निर्मितीही मानवाच्या कल्याणासाठी आहे. सृष्टीच्या तत्वांसारखेच मानवाने सुद्धा परोपकारासाठी जीवन व्यथीत करावे, असा संदेश कवयित्रीने या कवितेतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 

*कधी कधी वाटते मला मी*

*धूलिकण व्हावे*

*जित्या जागत्यांच्या स्पर्शाने*

*जीवन पावन व्हावे*

 

अशा पंक्तीतून कवयित्रीला “आपण धूलिकण व्हावे आणि जित्या जागत्यांच्या स्पर्शाने आपले जीवन पावन व्हावे” असे या कवितेतून सुचित करावयाचे आहे. बाल साहित्यामध्ये आपल्या रचनांनी अग्रगण्य स्थान प्राप्त करणाऱ्या प्राध्यापिका सौ सुमती पवार यांची साहित्य निर्मिती अतिशय समृद्ध आहे. बाल व किशोरवयीन मुला-मुलींच्या स्वप्नांना त्यांनी सुरम्या असे शब्द पंख दिले आहेत. मोरपिसारा, इंद्रधनुष्य, सृजन इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे लोकप्रिय आहेत. शासकीय तसेच इतर अनेक संस्थांकडून त्यांना त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी गौरविण्यात आलेले आहे.

सीबीएसई म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, 13 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापन झाले. या बोर्डाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण संस्था शाळा आणि कॉलेज यांना अधिक प्रभावशाली दृष्टिकोनातून फायदा करून देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शक्तीचा विकास करणे. हे बोर्ड भारतातील सर्व सार्वजनिक आणि खासगी शाळांची संबंधित आहे. प्रा.सौ.सुमती पवार यांच्या साहित्याचा गौरव करताना बोर्डाने त्यांची कविता “मला वाटते” ही इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा