*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या,नेशन बिल्डर सावित्रीच्या लेकी,आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त लेखिका कवयित्री सुजाता पुरी यांचा अप्रतिम लेख*
*माळावरच्या रानवेली…*
*तो प्रचंड वटवृक्ष*
*कसा उन्मळून पडला*
*म्हणे त्याला बीलगलेला*
*सायलीचा वेल कुणीतरी खुडला*
याप्रमाणे वरून खंबीर दिसणारी, पुरुषाच्या पाठीशी प्रत्येक संकटात साथ देणारी एक वेलरुपी स्री असते. गावाकडच्या या रानवेली अगदी चिवट होऊन आपल्या फाटक्या संसाराला सांधण्याचे काम मनापासून करत असतात. कितीही एकर शेती असू दे पण ती यांच्या नावावर कधीच नसते. यांच्या नावावर असतात त्या शेतीचे कष्ट. शहरातल्या मातीत या वेली कधीच प्रफुल्लित राहत नाही. त्यांना हवी असते गावाकडच्या शिवाराची आपली माती. यांच्या आयुष्यात निवांतपणा नसला तरी वखवख ही नसते. पहाटेपासून रुंजी घालणाऱ्या या जणू ग्रामीण ओव्याचं म्हणाव्या लागतील. आयुष्यभर कष्टच वाट्याला आलेले आणि रोजचे उन्हातले काम.फोटोजेनिक असा यांचा चेहरा कधीच नसतो. आयुष्यातील दुःखाचे काळे डाग यांच्या चेहऱ्यावर जागा मिळवतात, पण फेस क्रिम कशी असते ही यांना ठाऊक नसते. म्हणूनच छान दिसावंच असा काही यांचा हट्ट नसतो. उन्हात राहून काळपट झालेला रंग, पण तरतरीत नाक,चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि डोळ्यात कितीतरी न मोजता येणारे भाव. हेच यांचं साधं सुंदर रूप.कपाळावर रुपयाच्या आकाराचे ठसठशीत कुंकू आणि ते लावायचं ते ही किती मनापासून. त्यासाठी घरीच बनवलेला मेन. रानात धरलेल्या मोहळाच्या पोळ्यापासून स्वतः मन लावून मेन बनवून छोट्या डबीत भरून ठेवणार.
आणि साज शृंगाराची ती छोटी लाकडी पेटी असून असून असणार तरी काय त्यात, एक जाड दाताची फनी, छानसा कुंकवाचा करंडा आणि मेनाची डबी. केसांची गाठ बांधून घातलेला अंबाडा . चेहऱ्यावर ही केसाला लावलेल्या तेलाचा हात फिरवला कि झाला यांचा मेकअप. बोटावर मेन घेऊन बऱ्याच वेळ एका दिशेने ते बोट कपाळावर गोल फिरवायचं. एकदा बेस् सेट झाला कि मग त्यावर कुंकू बोटाने पसरवायचं.ना कोणत्या भूमितीचा अभ्यास तरी ही अगदी अचूक गोल कुंकवाने कपाळावर रेखाटणार.
नाजूक काठ असलेलं सुती लुगडं, असं कि लुगडं फाटेल पण काठ तरीही सुंदरच दिसतील. कधी कधी दोन लुगडयांना मध्येच जोडून म्हणजे दंड घालून केलेले लुगडं घालणं ही चैन नसायची तर गरज असायची. ज्याप्रमाणे दोन लुगडयांच्या तुकड्याला सांधून नवीन वस्त्र तयार व्हायचे तसेच त्यांना संसारात ही वेळोवेळी अनेक गोष्टी सांधायचे काम करावे लागायचे.अंगात छान अशी चोळी,ती ही खऱ्या खणाची. कमरेला सूती कापडापासून शिवलेली पिशवी अशी कि आजच्या भारीतल्या भारी पर्सला ही लाजवेल. तिच्यावर रिबनची छानशी झालर .त्या पिशवीत तीन चार कप्पे असणार आणि त्यातल्या कोणत्या कप्प्यात काय ठेवले याची अचूक माहिती त्या पिशवीच्या मालकिणीला असायची.सुट्टी नाणी,एखादा बिबा,आणि तपकिरीची डबी ही त्या पिशवीत असणारी धन दौलत.काळया मण्यातल्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे तर यांचा जीव कि प्राण. झुपकेदार नथीची भारी हौस यांना .पण ती असावीच असा हट्ट मात्र अजिबात नाही.पायात मात्र वजनदार जोडवी घालणार. जोडा सुरक्षित राहावा ही त्या मागची भावना. हातात दोन दोन डझन बांगड्या.त्याचं यांना कधीच ओझं वाटत नाही.
आपली स्वप्ने आणि इच्छा मनात दाबून हसऱ्या चेहऱ्याने वावरणाऱ्या या रानवेली खळखळून हसणार त्या पाण्याच्या आडावर अथवा नदीकाठी आल्यावर. या जागा म्हणजे त्यांचे मन मोकळे करायच्या हक्काच्या जागा. घरातल्या सगळ्यांच्या आधी त्यांचा दिवस सुरू होत असतो आणि संपणार मात्र सगळ्यांच्या नंतर. पहाटे उठून जात्यावर धान्य दळणे आणि ते ही आनंदाने ओव्या गात.
*माझी माहेरची वाट, कशी सवान ग वाटे*
*सासरच्या वाटेतले किती वेचावे ग काटे*
अशा ओव्यांमधून त्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असत. जात्यावरील दळणामुळे कधीच त्यांना मेंटेन राहण्यासाठी झुम्बा डान्स करण्याची गरज वाटली नाही.बाळंतपणही अगदी नॉर्मल आणि घरीच होणार. दळणकांडण करताना त्यांचा व्यायाम होत असे.यांच्या घरात कधीच हुंडाबळी होणार नाही.जे काही आहे ते पुरेस आहे या समग्र भावनेनेच त्या जगणार. म्हणूनच आपली सून आता आपली जागा घेणार म्हणून त्या त्रागा करणार नाहीत कि आकांड-तांडव करणार नाहीत.
नातू आणि अंगणात बांधलेली गुरं ढोरं या दोघांवरही सारखं प्रेम करणार . ते ही कृतीतून. फक्त शब्दातून नाही.सगळे शिवार आणि घरदार आपलं मानणार आणि त्यासाठी राबराब राबणार. एखादा अनोळखी वाटसरू जरी आला तरी हजारो प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडण्यापेक्षा अगोदर त्याचे आदरातिथ्य करणार. अनोळखी माणसाला चोर समजणारी आपली शहरी संस्कृती तर चोरात ही माणूस पाहणारी अशी ही ग्रामीण संस्कृती. माणसांचा किती ही राबता असला तरी यांना थकण्याचा अधिकार नसतो. घरात कधीही आदळ आपट न करता सोशिकतेची परिसीमा यांच्यात नेहमी पाहायला मिळते. कष्ट आणि दुःख हे जणू यांच्या पाचवीला पुजलेले असले तरी ही चेहऱ्यावर मात्र ते त्या कधीच जाणवू देणार नाहीत.
*भाकरीचा पापडा करपत जावा*
*तशी करपत गेलीस माळरानात*
याच प्रमाणे सण, समारंभ, चालीरीती, रूढी परंपरा ,नातेसंबंध, व्यसनाधिनता ,अंधश्रद्धा अशा अनेक घटकातून या गावाकडच्या रानवेलीच्या वाट्याला दुःख येत असलं तरी ही येणाऱ्या प्रत्येक दुःखाला पायाखाली घेत नव्या उमेदीने ती संसाराचा गाडा ओढत असते.तिच्या तळहातावरच कृषी संस्कृतीची इमारत उभी असते आणि तिच्या श्रमाने शेत-शिवार हिरवे होते. मुले, माणसे आनंदी होतात.
*एका गावाच्या मातीत जनमलेल्या या रानवेली विवाहाच्या रूपात पुन्हा दुसऱ्या गावात रुजतात,संसारात झिझतात,आणि झिजता झिजता गावाच्या मातीतच विझतात.*
शहराचे वारे यांना मानवत नाही,ना तिथली संस्कृती(सॉरी फॅशन).यांना शहरी भाषेत अडाणी म्हणून दुर्लक्षित केले असेल तरी खऱ्या अर्थाने यांच्यात एक ग्रंथ लपलेला असतो.जे तो वाचू शकत नाहीत ते खरी अडाणी.
वटवृक्षाच्या आधाराने वाढणाऱ्या या रानवेली वृक्षांना खंबीरपणे साथ देतात.माणुसकीचं नातं निभावतात आणि गावाकडच्या घरांना घरपण देतात.
———————
*✒️सुजाता नवनाथ पुरी*
*अहमदनगर*
8421426337