सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग यांची मागणी
सिंधुदुर्गनगरी
महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व चर्मकार, अनुसूचित जाती समाजातील समस्त जनांचा अपमान करणारा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्या अज्ञात इसमावर कडक कारवाई करा व गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केली आहे.
२८ सप्टेंबर २०२० रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला.व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचे नाव,गाव,पत्ता अज्ञात आहे. परंतु सदर व्हिडीओ देशभरातील सोशल मीडियावर प्रसारित झाला. सदर व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात आले की, सदर व्यक्तीने महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाबद्दल अपमानकारक टिपणी केली आहे. तसेच सदर व्यक्तीने चर्मकार व अनुसूचित जाती समाजाबद्दलही अवमानकारक वक्तव्य केले आहे. सदर अज्ञात इसमाने या व्हिडिओमध्ये इतर समाज घटकांना चेतवण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न पाहता देशात अशांतता माजावी, तसेच चर्मकार व महार समाजाचे इतर समाजाशी दंगे, मारामारी व्हाव्यात या हेतूने सदर व्हिडिओत प्रयत्न झाल्याचे दिसते. वास्तविक असा व्हिडीओ कायद्याने प्रसारित करता येणारा नाही. परंतु सदर इसमाने खुलेआम त्या व्हिडिओत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच चर्मकार व अनुसूचित जाती समाजाची बदनामी केली आहे.
भारतासह राज्य सद्या कोरोना महामारीविरुद्ध लढा देत असताना अशा प्रकारचा नराधम देशात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करीत आहे.तरी त्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करून अनुसूचित जाती-जमातीचे कायदे कलम ३(१०),तसेच सदरचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्यामुळे सायबर कायद्याखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली तसेच बदनामी केली म्हणून भारतीय दंडविधान कायद्याखाली त्याचप्रमाणे देशात, समाजात अशांतता निर्माण करून भडकवण्याचा व देशद्रोह करण्याच्या उद्देशाने सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. त्यामुळे सदर व्यक्ती कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध वरील कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर व्यक्ती विरोधात जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात यावा.अशीही मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण समाजाला रस्त्यावर उतरून नाविलाजाने आंदोलन छेडावे लागेल.असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार, माजी जिल्हा सरचिटणीस श्रीराम चव्हाण, माजी कोषाध्यक्ष राजन वालावलकर, मंगेश आरेकर, बाळकृष्ण ओटवणेकर, युवा चेतना संघटनेचे सचिन तांबे आदी उपस्थित होते.