महिन्याभरापूर्वी मळगाव येथील महिला गीतांजली मळगावकर (वय ५२) सावंतवाडी शहरातून गायब झाली होती. सावंतवाडीत घरकाम करण्यास येणारी ही महिला रोज रात्री मळगावला जाताना ठरलेल्या प्रायव्हेट रिक्षाने जात असायची. परंतु ३१ ऑगस्ट रोजी ती मळगावला गेलीच नाही. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती.
आंबोली घाटात मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांसमोर त्याची ओळख पटविण्याचे आव्हान होते. परंतु ओळख न पटल्याने पोलिसांकरवी व्हिसेरा तपासणीसाठी पाठवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु खरे आव्हान तर पुढे होते ते तो मृतदेह कोणाचा? आणि खून झालाय तर कोणी खून केला? याचा तपास करण्याचा. खुनी सुद्धा काहीच न झाल्याच्या अविर्भावात वावरत असल्याने पोलिसांनी संशयितांवर करडी नजर ठेवली होती. परंतु सुतावरून स्वर्ग गाठतात तसंच झालं. मृत महिलेचे कॉल डिटेल्स तपासताना गरड, माजगाव येथील योगेश कांबळे नामक युवकाच्या मोबाईल वर फोन गेल्याचे दिसून आले आणि तिथेच संशयाची पाल चुकचुकली. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवत अखेर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याच्या वयाचा विचार करत समुपदेशन करत त्याच्याकडून माहिती मिळवत इतर तिघांना गजाआड केलं.
चौघाही आरोपींसोबत ही महिला आंबोली येथे फिरायला गेली होती. परंतु नाजूक संबंधातून सदरचा घातपात झाल्याचा संशय आहे. आंबोली येथे महिलेचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह आंबोली घाटात सध्याच्या स्थितीत कमी असलेल्या वर्दळीचा फायदा घेत दरीत फेकून दिला होता. या घटनेनंतर संशयित आरोपी आपले दैनंदिन व्यवहार नेहमीसारखेच करत होते. परंतु निर्ढावलेले हे आरोपी एवढे चलाख आणि बिनधास्त होते त्याचे कारण म्हणजे त्यांचे दारूच्या अवैद्य धंद्याशी असलेले कनेक्शन…!
सावंतवाडीत कित्येक तरुण लॉकडाऊन च्या काळात बक्कळ पैशांच्या आशेने दारूच्या अवैद्य वाहतुकीकडे वळले आहेत. तर काही तरुण गेली काही वर्षे दारूच्या अवैध्य वाहतूक, विक्रीत गुरफटल्याने त्यातून त्यांनी बक्कळ पैसा कमावून ते गलेलठ्ठ झाले आहेत. कमी वयात मिळालेला बक्कळ पैसा त्यांना व्यसनाधीन तर बनवतोच परंतु गुन्हेगारीच्या चिखलात पार बुडवून टाकतो. मिळालेल्या गलेलठ्ठ पैशांमुळे व्यसनाधीन झालेली अशी मुले एखादं सावज हेरून पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक करतात. आणि दारूच्या नशेत अनैतिक कृत्य करून शेवटी खुनासारखे क्रूर हत्यार उपसतात आणि दुसऱ्याबरोबरच स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकतात.
दारूच्या अवैद्य धंद्यात गुंतलेले असे तरुण गुन्हा घडल्यावर बिनधास्त वागतात कारण दारूच्या धंद्यातील त्यांचे मुख्य सूत्रधार त्यांना पैशांच्या जीवावर सोडवून आणतील याची त्यांना खात्री असते. अशा काही तरुणांचे पालकही आपला पोरगा बक्कळ पैसे आणतो म्हणून त्याच्या धंद्यांवर दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच गुन्हेगार जन्म घेतो.
तरुण मुलांच्या पालकांनी पैशांपोटी आपल्या मुलांना आयुष्यातून बरबाद होण्यापासून रोखले पाहिजे, अन्यथा भविष्यातील तरुण पिढी जीवनाचा खरा आनंद उपभोगण्यापासून वंचित राहील.
आंबोली घाटात मिळालेला हा मृतदेह ही सुद्धा व्यसनाधीन आणि अवैद्य दारू धंद्यातून मिळत असलेल्या गलेलठ्ठ पैशांचीच करामत आहे. अशा फुक्याच्या कामातील पैशांमुळेच तरुण पिढी दारू व्यावसायिकांच्या आलिशान गाड्यांचा वापर करत अनैतिक कृत्य करतात. असेच अनैतिक कृत्य करताना सदर महिला त्यांची शिकार झाली. परंतु सदरची महिला या युवकांसोबत आंबोली फिरायला गेली असता तिचा खून का करण्यात आला हा मुख्य प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.
क्रमशः