*सत्यनारायण पूजेचे मखर कार सदा चुरी यांनी साकारलेले वटवृक्ष रूपी मखर विशेष आकर्षण*
मालवण :
गुढीपाडव्या निमित्त मालवण बाजारपेठ येथील प्रसिद्ध असलेल्या रामेश्वर मांड येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री सत्यनारायणाच्या पूजेचे बनविण्यात आलेले वटवृक्षरुपी मखर आणि त्यासोबत असलेली अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची मूर्ती साऱ्यांची लक्ष वेधून घेणारी ठरली. मालवणचे सुप्रसिद्ध मखरकार श्री. सदा चुरी यांनी कल्पकतेने बनविलेल्या वटवृक्षाची साऱ्यांनी वाहवा केली.
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी मालवण बाजारपेठ येथील प्रसिद्ध रामेश्वर मांड मित्रमंडळाच्यावतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या मंडळाच्यावतीने बाजारपेठेत आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सभामंडप आणि सत्यनारायण पूजेसाठी नवनवीन सजावट देखावे आणि मखर बांधण्यात येतात. यावर्षी या मंडळाने भव्य वटवृक्षाची प्रतिकृती साकारून जिवंतपणा दाखविला आहे. वडाच्या खाली प्रसिद्ध नेपथ्यकार श्री अंकुश कांबळी आणि बंधू यांच्या हस्ते बनविण्यात आलेली श्री स्वामी समर्थ यांची रेखीव अशी मूर्ती ठेवण्यात आली होती , तर सत्यनारायणाची पूजा वडाच्या बुंध्यात बांधण्यात आली आहे. वडाच्या पारंब्या आणि प्रतिकृती संपूर्ण शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. तसेच सभामंडपातील विद्युत रोषणाई, सभामंडपाची उभारणी यांची भव्यदिव्यता पाहून आनंद व्यक्त केला जात आहे. या सर्व गोष्टींसाठी रामेश्वर मांड मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते गेले पंधरा दिवस मेहनत घेताना दिसून येत होते.