जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी यांची वृत्तबद्ध काव्य रचना
(पादाकुलक वृत्त 8/8 )
सांजवेळ
आठवते मज सांजवेळ ती
त्या दिवसाची नयनमनोहर
तू येता त्या एकांता वर
जाणवलेली किंचित थरथर
नभांगणीचे धुंद चांदणे
होते केवळ गंध भारले
नाजुक तुझिया पायरवाने
बावरला तो चंद्रच क्षणभर
काय वर्णू मी तुझ्या रूपाला
शब्द इथे बघ केविलवाणे
तू रंभा तू जणू उर्वशी
नव्हे नव्हे तू त्याहुन सुंदर
चाल तुझी गं मोहक लाडिक
पैंजण पायी रुणझुणणारे
तुला स्पर्शिण्या ओला वारा
झाला होता अगदी आतुर
तुला पाहता सौख्यच अवघे
ओघळले या पूर्ण मनावर
आज पासुनी झालो आहे
दास तुझा म्हण किंवा किंकर
जयश्री जिवाजी कुलकर्णी नाशिक