महिला दिनाचे औचित्य साधत जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तर्फे घेण्यात आलेल्या अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धेचा निकाल झाला जाहीर
महिला दिनाचे औचित्य साधून जागतिक साकव्य समूहातर्फे “तिच्या स्त्रीत्वाची कहाणी” या विषया वर अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजक साकव्य प्रमुख श्री.पांडुरंग कुलकर्णी, समन्वयक पदी ज्येष्ठ कवयित्री नीलांबरी गानू, ग्राफिक्सकार शरयू खाचणे, संकलक राजेश नागुलवार उर्फ राजमन यांनी जबाबदारी उचलली होती. तर स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ लेखक कवी माननीय श्री.अरविंदजी ढवळीकर यांनी केले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्रमांक अमेरिका येथील लेखिका कवयित्री तनुजा प्रधान यांच्या अष्टाक्षरी काव्य रचनेला देण्यात आला, त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्रमांक विभागून देण्यात आला यात कवयित्री हेमा जाधव व कवयित्री स्वाती कोरे यांच्या काव्यरचनेची निवड झाली. प्रथम क्रमांक देखील विभागून कवी श्री.विजय सातपुते व कवयित्री वर्षा भट यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक कवयित्री राधा गर्दे व कवयित्री रूपा धोंगडे यांना विभागून दिला. तृतीय क्रमांक कवयित्री संपदा देशपांडे व कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांना मिळाला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक एकूण सहा जणांना देण्यात आला त्यात अनुक्रमे हेमंत कुलकर्णी, अरुणा दूदलवार, प्रेरणा वाडी, भाग्यश्री कुलकर्णी, चंद्रशेखर धर्माधिकारी, एकनाथ गायकवाड यांचा समावेश आहे.
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी त्या विषयावरील स्पर्धेचा निकाल जाहीर करताना परीक्षक श्री.अरविंद ढवळीकर यांनी आपले मनोगत मांडताना असे सांगितले की, “अष्टाक्षरी काव्य रचना यांचा निष्कर्ष आज आपणास सादर करताना मन संमिश्र भावनांनी भरून गेले आहे”. परीक्षक म्हणून भूमिकेला न्याय देताना नियमात न बसणाऱ्या 23 कविता स्पर्धेबाहेर ठेवावे लागल्या परंतु ज्यांनी नियम काटेकोरपणे पाळले त्या सर्वांचे परीक्षेत अरविंद ढवळीकर यांनी अभिनंदन केले परीक्षण करताना समीक्षण आणि परीक्षण या दोन्हीच्या व्याख्या स्पष्ट करणे आवश्यक समजून समीक्षण म्हणजे गुणदोषांचे मूल्यमापन करून केलेले रोख् ठोक भाष्य, असे सांगत मराठीमध्ये त्याला टीका म्हणतात हे देखील आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे परीक्षण म्हणजे अभिप्राय रसग्रहण, कवी ने काय काय भाव सूचित केले व त्यासाठीचे केलेले प्रयास कितपत साध्य झाले? थोडक्यात म्हणजे फुलांचे विच्छेदन न करता त्यातील मधुरस शोषून घेणे. कवीच्या मनात कविता स्फुरताना कवीला जसा आनंद झाला असेल त्या आनंदाची अनुभूती घेणे, रसिकांना करून देणे म्हणजे रसग्रहण, असे सांगत परीक्षण किंवा समीक्षण न करता रसग्रहणातून मधुरस निष्कर्षा द्वारे आपणापर्यंत पोचवीतो. या स्पर्धेचा विषय “तिच्या स्त्रीत्वाची कहाणी” तसा अवघड होता. त्याची व्याप्ती केवळ तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडणे, चूल व मूल ही मर्यादा, सीता द्रौपदी प्रमाणे अति अगतिकता, अशी न घेता… मुळात स्त्रीत्व याच्या अर्थाशी निगडित असावे. स्त्रीत्व म्हणजे शालीनता, सौम्यता, सहानुभूती, नम्रता व संवेदनशीलता तर आहेच तसेच तिची भूमिका “जल की तरह ढल जाना” अशीच राहिली आहे… म्हणून तिला समजावताना
*येता विकासाच्या आड, बोचरी जोडण्याची तारा*
*तिलाच दे वळण, मानू नकोस तू हार* असेच सांगावे वाटते.
स्त्री बद्दल पुढे सांगताना श्री अरविंद ढवळीकर असे म्हणतात की, स्त्री ही दुसर्या घरची झाली तरी स्त्रीच्या मनातून बालपण अजून झुलतं असतं. मुखवट्या शिवाय राहणारं, निव्वळ गप्पा तरंगणे,आठवणीच्या जगात विहारण हे तीच करू जाणे. एकूणच स्त्रीच्या भावविश्वाचा आढावा घेताना एकच जाणवतं ते म्हणजे स्त्री म्हणजे आपणच कुलूप आणि आपणच दार. असे सांगत परीक्षक अरुण अरविंद ढवळीकर यांनी स्त्रीच्या मनाचे स्वभावाचे अंतरंगाचे विविध पैलू उलगडून दाखवले. स्त्रीत्व म्हणजे लक्ष्मी, पार्वती व सरस्वतीचा अद्भुत संयोग आहे, असे मनोगत मांडून परीक्षक अरविंद ढवळीकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन व सहभागी कवींना शुभेच्छा दिल्या. समुहाच्या अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धेला जवळपास ६१ कवींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतलेले नागुलवार सर, खाचणे मॅडम, डॉक्टर निलांबरी मॅडम, आयोजक श्री.पांडुरंग कुलकर्णी आणि प्रायोजक अमृता गानू केळकर यांचे परीक्षक श्री.अरविंद ढवळीकर यांनी विशेष आभार मानले. या स्पर्धेसाठी अमृता गानू केळकर यांनी विजेत्यांना रोख पारितोषिक जाहीर केले होते. निकालानंतर सर्व विजेत्यांना जागतिक साकव्य समूहातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.