*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री तनुजा प्रधान यांची अष्टाक्षरी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नामांकन मिळालेली काव्यरचना*
*तिच्या स्त्रीत्वाची कहाणी*
*शीर्षक : गगन भरारी*
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी
अशी कशी बदलली
कधी शिखरावरून
खोल दरीत पडली
गार्गी मैत्रेयी विदूषी
कैद जाहली घरात
भावनांची होळी झाली
दाह झाला संसारात
जिद्द फिनिक्स पक्ष्याची
पुन्हा उभी राखेतून
नवे रंग आयुष्यात
नवा कुंचला घेऊन
जणू अमृत निघाले
झाले समुद्र मंथन
विषावर मात केली
केले स्वतः उत्थापन
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी
तिने नव्याने लिहिली
दुर्गा लक्ष्मी सरस्वती
तिने कष्टाने बाणिली
अष्टभुजा गुणखाणी
स्वतः प्रभाव पाडूनी
नाती तरी सांभाळते
हृदयात वसवूनी
पंचतत्त्व विजिगीषा
ध्येय तिचे आता असे
जाणे शिखराच्या वर
श्वास तिचा झाला जसे
©तनुजा प्रधान
अमेरिका