कोकणवासीयांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 ते 14 मे या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यांत निवडक 10 मराठी चित्रपट दाखवण्यात येतील. प्रथम तीन क्रमांकाच्या चित्रपटांना मानांकन देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असून सर्वेत्कृष्ट कलाकार, तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे.
सांस्कृतिक आणि चित्रपटसृष्टीत भरीव कामगिरी केलेल्या कोकणातील सिंधुरत्नांचा यावेळी गौरव केला जाईल. स्पर्धेसाठी 2019 ते 2021 या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल. चित्रपट निर्मिती संस्थांनी kokanchitrapatmahotsav.com या वेबसाइटवर अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी 1 एप्रिलपासून प्रवेशअर्ज करता येतील. महोत्सवासाठी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, निशा परुळेकर, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे यांनी पुढाकार घेतला आहे.