मालवण
मालवण शहरातील मेढा भागातील तालुका स्कुल समोरील विद्युत ट्रान्सफॉर्मरचा डीपी बॉक्समध्ये बिघाड झाल्याने मेढा भागात गेल्या काही दिवसात विजेचा दाब कमी जास्त होऊन काही घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याने याबाबत नागरिकांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे लक्ष वेधले.
आचरेकर यांनी याबाबत वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर वीज कंपनीकडून हा नादुरुस्त डीपी बॉक्स बदलण्यात आला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मालवण मेढा भागात रघुनाथ देसाई तालुका स्कुल समोर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा डीपी बॉक्स नादुरुस्त बनल्याने या ट्रान्सफॉर्मर वरून होणारा वीज पुरवठा अनेक वेळा खंडित होऊन अधून मधून कमी व जास्त दाबाचा वीज पुरवठा होत होता. खंडित वीज पुरवठा व जास्त दाबाचा वीज पुरवठा यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरून वीज जोडणी असणारे नागरिक त्रस्त बनले होते.
अचानक होणाऱ्या जास्त दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे काही घरात शॉर्ट सर्किट होऊन टीव्ही, सेट टॉप बॉक्स, फ्रीज आदी विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांनी या भागाचे माजी नगरसेवक सुदेश आचरेकर यांचे लक्ष वेधले होते. याबाबत सुदेश आचरेकर यांनी तात्काळ वीज कंपनीचे अभियंता भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करत ट्रान्सफॉर्मर ची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली. याबाबत वीज कंपनीने दखल घेत या ट्रान्सफॉर्मरचा नादुरुस्त डीपी बॉक्स बदलून दुसरा बॉक्स बसविण्याची कार्यवाही आज शनिवारी पूर्ण केली. यावेळी सुदेश आचरेकर यांच्यासह आपा मोरजकर, संतोष पराडकर, यशवंत मेतर, मिलिंद कदम, राजू वाघ, दीपक आढाव आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.