वृत्तसंस्था..
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन गरजूंना केलेल्या मदतीमुळे विशेष चर्चेत आहे. लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने देवदूत बनून हजारो प्रवासी कामगारांना आपल्या घरी जाण्यास मदत केली. याशिवाय अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास देखील मदत केली. त्याच्या या कार्यासाठी केवळ देशातच नाही तर जगभरातून त्याचे कौतुक होत आहे.
त्याच्या याच कार्यासाठी आता त्याला संयुक्त राष्ट्राकडून प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोनू सूदला संयुक्त राष्ट्राच्या SDG Special Humanitarian Action Award ने सन्मानित करण्यात आले आहे. काल एका ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात सोनूला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोनू सूदच्या आधी अँजेलिना जोली, डेव्हिड बेकहम, लियोनार्डा डिकॅप्रियो, एमा वॉटसन यांना देखील हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार प्राप्त करताना सोनू सूद म्हणाला की, मी आपल्या देशवासियांसाठी जे काही केले आणि करत आहे, तो खूपच लहान भाग आहे.
दरम्यान, सोनू सूद सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या प्रत्येकाला मदत करत आहे. शिक्षणापासून ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सोनू सूद मदत करत आहे.