नेपाळी तरुणाच्या आत्महत्यांमुळे वेंगुर्ले पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
आत्महत्येचे गूढ काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याचा सीझन सुरू झाल्यावर आंब्याच्या बागांमध्ये शक्यतो नेपाळी किंवा बिहारी असेच परप्रांतीय जोडपे रखवालीचे काम करतात. जिल्ह्यातील स्थानिक जोडपे आंबा बागांमध्ये रात्रीच्या वेळी राहण्याचे टाळतात परंतु कामाची गरज आणि पैशापोटी नेपाळ, बिहार आदी ठिकाणची जोडपी जिल्ह्यातील आंबा बागांमध्ये रखवालीचे काम करतात. वेंगुर्ला तालुक्यातील अनेक भागांमध्ये नेपाळी जोडपी कामाला आहेत. या आंब्याच्या बागेत नेपाळी जोडपे कामाला होते. परंतु वेतोरे येथील या आंबा बागेतील रखवालीचे काम करणाऱ्या नेपाळी तरुणाने पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 22 मार्च रोजी रात्री 11 ते 23 मार्च पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान या तरुणाने आत्महत्या केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
वेतोरे येथील आंबा बागेत रखवाली करणारा तरुण कुणाच्या बागेत कामाला होता? कधीपासून कामाला होता? त्याच्यासोबत त्याची पत्नी सुद्धा होती का? आदी बाबींची योग्य ती चौकशी होणे अत्यावश्यक आहे. येथील आंबा बागेत आत्महत्या करणारा तरुण हा परप्रांतीय असल्याने त्याच्या मृत्यूचे म्हणावे तेवढे गांभीर्य कुणालाही नसणार, परंतु या तरुणाने आंबा बागेतील पडवीत गळफास लावून आत्महत्या का केली? किंवा त्याला आत्महत्या करायला कोणी भाग पाडले का? असे अनेक प्रश्न पोटापाण्यासाठी हजारो मैल दूरवरून येणाऱ्या गोरगरीब कामगारांने आत्महत्या केल्याने उपस्थित होत आहे.
आंबा बागेत काम करणाऱ्या तरुणासोबत त्याची पत्नी होती का? काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले होते का? त्यामुळे वैफल्यग्रस्त होत या तरुणाने आत्महत्या केली का? याबाबतही खोलवर विचार होणे आवश्यक आहे.
वीस वर्षांपूर्वी अशाच प्रकारे व्याजाने पैसे देणाऱ्या आड्यावरच्या इंद्राच्या बागेत घाटमाथ्यावरील जोडपे कामाला होते, त्यावेळी महिलेने आत्महत्या केली होती. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेच्या पतीला पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला पाठवून महिलेवर अत्याचार केले गेले होते. पण त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आंबा बागेत काम करत असलेल्या घाटमाथ्यावरील जोडप्यातील महिलेने आत्महत्या केली होती. ते प्रकरण त्यावेळी मिटविण्यात आले होते. अशी चर्चा आहे, ज्ञात असलेल्या जुन्या प्रकरणावरून नव्याने आत्महत्या झालेल्या नेपाळी तरुणाच्या आत्महत्या बाबत अशीच घटना घडली नसेल ना? असा संशय येत आहे.
परप्रांतीय कामगार असल्याने त्याची आत्महत्या दडपण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. परंतु सदरचा युवक हा परप्रांतीय असला तरी तो सुद्धा एक माणूस होता, त्यामुळे हे परप्रांतीय जोडपे कोणाच्या बागेत कामाला होते? त्याने नक्की आत्महत्या कशासाठी केली? त्याने आत्महत्या केली की त्याला आत्महत्या साठी कोणी प्रवृत्त केले? असे एक ना अनेक प्रश्न नेपाळी तरुणाची आत्महत्या झाल्यानंतर उपस्थित होत आहेत. त्यामुळे नेपाळी तरुणाच्या आत्महत्येच्या तपासाचे वेंगुर्ला पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.