*भावना व्यक्त करणारा माणूस नाटक जगत असतो: सचिन धोपेश्वरकर*
भावना व्यक्त करणारा माणूस नाटक जगत असतो.दैनंदिन जीवनात आपण नेहमी नाटकं करत असतो.मात्र नाटक ही अशी कला आहे की त्यातून व्यक्तिमत्व विकास होतो.यासाठी जमीनीवर राहून सतत शिकत रहा. असे उद्गार सचिन धोपेश्वर कर यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ सेंट्रल स्कूल येथील बाल नाट्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये ” कलावंताने सततत निरीक्षण केलं पाहिजे. चांगल्या गोष्टी डोळसपणे बघितल्या पाहिजे. जीवनातील अनेक कलांचे उपयोजन नाटकांमध्ये होत असते.कला ही माणसाला का जगायचं याचे सूचन करून जाते. यासाठी कोणत्यातरी कलेची दोस्ती करा त्यामध्ये सदैव सजीवंत ठेवणारी एक उत्तम कला म्हणजे नाटक होय. असे सांगून त्यांनी नाटक करताना कायिक अभिनय, वाचिक अभिनय यासंदर्भात मार्गदर्शन केले.पुढील शिबिरा कालावधीत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दीप प्रज्ज्वलन करून व नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सदर शिबिराचे सचिन धोपेश्वरकर, संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर,प्रा. अरुण मर्गज, शुभांगी लोकरे, डॉ. सुरज शुक्ला यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना उमेश गाळवणकर यांनी “जीवनाच्या अंतापर्यंत आपण अनेक भूमिका पार पाडत असतो. व्यक्तीला अपेक्षित असे कृत्रिम ते सत्य वाटावे अशा प्रकारे अभिनय सादर करत असतो ;त्याचं प्रेक्षकांसाठी सादरीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा आपण नाट्य कलावंत होतो. नाट्य कलावंत होताना प्रथमता नाटक समजून घ्या. भूमिका जगा मग आपोआपच नाटक जगता येतं आणि ज्याला नाटक कला जगता येतो तो आनंदाने जीवन जगू शकतो यासाठी नाटक कलेशी दोस्ती करा. आपल्यातील झाकलेला कलावंत प्रशिक्षणातून पुढे येऊ द्या. परीक्षा झाल्यानंतर च्या सुट्टीत आयोजित केलेल्या या नाट्य शिबिराचा योग्य उपयोग करून घ्या.”असे सांगत विद्यार्थ्यांना- शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. विभा वझे, ऋचा कशाळकर यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अरुण मर्गज यांनी केले. सूत्रसंचालन विभा वझे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ऋचा कशाळेकर हिने मानले. यावेळी विद्यार्थीवर्ग, पालक, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.