You are currently viewing शिदोरी

शिदोरी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख

बालकाला मात्यापित्यांचा आधार,
विद्यार्थ्याला शिक्षकाचा आधार,आंधळ्याला काठीचा आधार,प्रेमात पडलेल्याला मित्राचा आधार,अन्यायाला न्यायदानाचा आधार,प्रजेला राजाचा आधार,निवडणुकीत
उमेदवाराला जनतेचा आधार,वाट चुकलेल्या गलबताला दीपस्तंभाचा आधार,
बळीराजाला पर्जन्याचा आधार,प्रवासात
सहप्रवाशाचा आधार,वेलीला वृक्षाचा आधार,बुडत्याला काडीचा आधार,वगैरे
वगैरे.थोडक्यात काय?जीवनात ठायीठायी
जन्मापासून मृत्युपर्यंत ,कळत नकळत
आधाराची गरज असते.कुणीही म्हणू नये ,
“मला कुणाची गरज नाही”गरज असते.
कधी पैशाची,प्रेमाची,सहानुभूतीची,
सोबतीची,
मोडून पडला संसार
तरीही मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा.
आयुष्यात येणार्‍या अनेक वादळप्रसंगी जर
कुणाचा विश्वस्त हात पाठीवर असेल तर
वादळाशी लढायला सामर्थ्य मिळते.
“भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.”
हे मोजकेच शब्द जीवनप्रवासात किती आधारभूत ठरतात!!
अशोकवनात असहाय जानकीला
रावणापासून संरक्षण मिळविण्यास एक
गवताची काडी शस्त्र ठरली.साक्षात् रामाला
रावणाचा वध करण्यासाठी वानरसेनेचा
आधार घ्यावा लागला.कुरुक्षेत्रावर संभ्रमित
झालेल्या धनुर्धर अर्जुनाला केशवाने आधार
दिला.त्याच्या क्षात्रधर्माचे कर्तव्य त्याला उलगडून दाखवले.म्हणूनच लढण्याचं
मानसिक बळ त्याला मिळालं.
आर्थिक,शारिरिक,मानसिक,
आधारापलिकडे,काल्पनिक आधारातही
मोठी शक्ती दडलेली असते.
एका मातेने ,आपल्या तरुण मुलाला
तिचे बँकेचे पासबुक दिले आणि सांगितले ,
“जेव्हां तुला गरज लागेल,कुठला पर्यायच
ऊरणार नाही तेव्हांच तू ते ऊघडून बघ.”
आईने तिचे चेकबुकही सही करुन दिले.
युवकाने अपार कष्ट केले.ध्येय गाठले.
कित्येक अडचणी आल्या.वाटलेही,
उघडूया पासबुक.पण नको. हे संकट लहान आहे.त्यापेक्षा मोठे संकट आले तर पाहूया.
असे करत करत तो शिखरावर पोहचलाही.आता
त्याच्याजवळ सगळं काही होतं.आता तो घेणारा नव्हता.देणारा झाला होता.आणि
एक दिवस ,त्याने सहज गंमत म्हणून,आईने दिलेले ते पासबुक उघडले.त्याला आश्चर्याचा
धक्काच बसला. ते कोरे होते.शिलकीच्या सदरात लिहिले होते,अॅव्हलेबल बॅलन्स
आईचे आशिर्वाद!!
त्याच्या डोळ्यातून अश्रु टपकले.
श्रद्धा हा ही एक मोठा आधार असतो.
मात्र श्रद्धा ही विवेकी असावी.अंधानुकरण
नसावे.श्रद्धा एखाद्या व्यक्तीवर असावी.
निसर्गावर असावी.ईश्वरावर असावी.आपण
करतो त्या कामावर असावी. श्रद्धा ही उर्जादायक असते.सकारात्मक,दिशा
दाखवणारी असते.निस्सीम श्रद्धा ही खूप
आधारभूत असते.ती लहरी निर्माण करते.
तरंग ऊठवते. शक्ती देते.मार्ग दाखवते.
आज समाजात गुन्हेगारी वाढली आहे.
तरुण पीढीत कमालीचे मानसिक औदासिन्य आहे.मनोविकार आहेत.
आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.लग्न संस्था ,कुटुंबसंस्था मोडकळीस आल्या आहेत.याचं कारण संवाद तुटलेत.एका सुसंवादानेही हे सावट दूर होऊ शकेल.
परस्परातील स्नेह,नाती,संस्कार याच
मानवी जीवनाच्या भक्कम आधार भिंती आहेत.
आधार घ्या.आधार द्या.
।शिदोरी संस्कारांची
आधारवाट जीवनाची।

राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा