सद्गुरू,परमार्थात पडलेले लोक तीर्थयात्रेला फार महत्त्व देतात तर या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टीकोन काय आहे?
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने परमार्थात पडलेले अनेक लोक निरनिराळ्या प्रकृतीचे असतात. प्रत्येकाची आवड,बुद्धी,पात्रता,संस्कार वेगवेगळ्या स्तरावरचे असतात.
शाळेतील एकाच वर्गात काही मुले अतिशय हुशार असतात,तर काही मुले कमी हुशार असतात व दुसरी काही मुले अतिशय निर्बुद्ध असतात. त्याचप्रमाणे परमार्थात पडलेले साधक काही अति सूक्ष्म बुद्धीचे,तर काही सूक्ष्म बुद्धीचे,तर दुसरे काही स्थूल बुद्धीचे असतात.म्हणूनच संतांनी निरनिराळ्या साधकांसाठी वेगवेगळा उपदेश केलेला आहे.या संदर्भात खालील सुभाषित चिंतनीय आहे.
*उत्तम:सहजावस्था। मध्यमो ध्यान धारणा।*
*कनिष्ठ प्रतिमा पूजा। तीर्थाटन अधमाधमा।।*
वरील श्लोकावरून असे दिसून येईल की,समाजातील साधकांचे स्थूल मानाने चार वर्ग कल्पिले असून या चार वर्गांसाठी चार वेगवेगळ्या साधना सांगितल्या आहेत.स्थूल बुद्धीच्या साधकांना तीर्थयात्रा करण्यास सांगितले असून,त्यांच्यापेक्षा वरच्या स्तरावरच्या साधकांना प्रतिमा पूजा,ध्यान धारणा व सहजावस्था या साधना अनुक्रमे सांगितलेल्या आहेत. संत वाङ्मयामध्ये सुद्धा संतांनी अशाच त-हेने उपदेश केलेला आढळून येतो.
म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात-
*अधिकार तैसा करू उपदेश।*
*साहे ओझे त्यास तैसे देऊ।।*
🎯दुसरा मुद्दा असा की,
तीर्थयात्रा करणाऱ्या साधकांनी तसे करीत असताना आपली पात्रता वाढवून वरच्या वर्गात जावे,अशी अपेक्षा असते.त्याच एकाच वर्गात कायम बसणे शहाणपणाचे लक्षण नव्हे. त्याचप्रमाणे प्रतिमा पूजा करणाऱ्या साधकांनी त्याच्या वरच्या वर्गात बसण्याची पात्रता मिळवावी आणि अशा रीतीने प्रगती साधत साधत आत्म-साक्षात्कारापर्यंत मजल मारावी.
🎯तिसरा मुद्दा असा की,
तीर्थयात्रा करण्याचा मूळ उद्देश लक्षात घेणे आवश्यक आहे.सर्व संतांचा नामस्मरणावर अतिशय भर असतो. संसारात गुंतलेल्या प्रापंचिक लोकांना काही काळ वेगळ्या वातावरणात जाऊन तेथे त्यांना नामस्मरण करण्याची भरपूर संधी मिळावी,असा तीर्थयात्रेचा मूळ उद्देश असतो.परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार झालेला दिसून येतो. नामस्मरण,वाचन,संत-सद्गुरू चिंतन,आत्मचर्चा वगैरे मंगल गोष्टी करण्याऐवजी तीर्थयात्रेला गेलेले लोक संसारातील सुख-दुःखासंबंधीच गप्पागोष्टी करताना आढळतात. इतकेच नव्हे तर तीर्थयात्रा करणारे साधक दुसऱ्यांची निंदा-नालस्ती,चेष्टा-कुचेष्टा करण्यात किंवा अश्लिल विनोद करण्यात रममाण झालेले दिसून येतात.अशा प्रकारची तीर्थयात्रा करण्यात वेळेचा अपव्यय,निष्कारण खर्च आणि कष्ट पदरात पडून तीर्थयात्रेचा मूळ उद्देश सफल होत नाही म्हणून नामस्मरण,वाचन,श्रवण व संतांच्या उपदेशांचे चिंतन करीत करीत तीर्थयात्रा करणे आवश्यक आहे.
असा जीवनविद्येचा दृष्टीकोन आहे.
🎯चौथा मुद्दा असा की,भगवन्नाम हा सर्व तीर्थांचा राजा आहे आणि म्हणून नामस्मरण करणाऱ्याचे शरीर हेच सर्व तीर्थांचे माहेर असते.
तुकाराम महाराज हेच सांगतात-
*नाम म्हणे वाट चाली। यज्ञ पाऊला पाऊली।*
*धन्य धन्य ते शरीर। तीर्थव्रतांचे माहेर।।*
म्हणून नामस्मरणाचा छंद घेतलेल्या साधकांना तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही असा जीवनविद्येचा दृष्टीकोन आहे.
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏