इचलकरंजी शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात कोल्हापूरच्या
स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी मोहन मुंडे याच्यासह अमोल हेळबाळकर ,राजेश साठे ,बाबा गायकवाड या संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने कोंडिग्रे फाटा परिसरातील हाॅटेल काॅर्नर येथे सापळा रचून ताब्यात घेवून अटक केली.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन असा सुमारे ८ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
इचलकरंजी शहरातील जानकीनगर परिसरात मागील महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी
डॉ.सत्यनारायण वड्डीन यांच्या घराच्या बंद दरवाजाचे कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला.तसेच घरातील कपाटाचे कुलूप उचकटून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १५ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.यानंतर या घटनेचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्यासह कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सुरु ठेवला होता.याच दरम्यान , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकास सदर घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे बुधवार दिनांक १६ मार्च रोजी
कोल्हापूर – सांगली महामार्गावरील कोंडीग्रे फाटा परिसरातील हाॅटेल काॅर्नर येथे येणार असल्याची माहिती खब-यामार्फत मिळाली होती.या माहितीच्या आधारे सदर तपास पथकाने सापळा रचून घरफोडी गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी मोहन मुंडे याच्यासह अमोल हेळबाळकर ,राजेश साठे ,बाबा गायकवाड या संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने कोंडिग्रे फाटा परिसरातील हाॅटेल काॅर्नर येथे सापळा रचून ताब्यात घेवून अटक केली.तसेच त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन असा सुमारे ८ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार , कर्मचारी रणजित पाटील ,प्रशांत कांबळे ,संजय इंगवले , महेश खोत आदींनी केली.दरम्यान , घरफोडीतील संशयित आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.