मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उप-परिसर,समाजकार्य विभाग सावंतवाडी आणि नशाबंदी मंडळ मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी, सावंतवाडी यांच्या वतीने ‘होळी रे होळी, चला करू व्यसनांची होळी’ हा होळी उत्सवाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
उत्सव आला की व्यसन आले. वाढत्या व्यसनांना कारणीभूत उत्सव साजरे करण्याची पद्धत ठरत आहे. ही पद्धत बदलली पाहिजे, असा विचार नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी यावेळी मांडला. या अनोख्या उपक्रमात विद्यापीठाचे प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे, प्रा. पुनम गायकवाड तसेच समाजकार्य विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्यातील वाईट गोष्टी तसेच समाजातील व्यसनांचे या होळीमध्ये दहन करून अनोख्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा करण्याचा रिवाज या होळी सणानिमित्त सुरू करण्यात आला. या उपक्रमात निरामय केंद्राच्या संचालिका वंदना करंबेळकर, अर्चना वझे यांनी अशा अनोख्या उपक्रमाचे कौतुक करून असे उत्सव समाजात सगळीकडे साजरे केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. या उत्सवाची सांगता पेटत्या होळीच्या साक्षीने व्यसनमुक्तीची शपथ घेऊन झाली. या कार्यक्रमाला उपपरिसर सिंधुदुर्गचे प्रभारी संचालक श्री.श्रीपाद वेलिंग यांचे मार्गदर्शन लाभले.