माजी सरपंच श्रीपाद तवटे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
दि. ११ मार्च २०२२ रोजी पावशी ग्रामपंचायतचा उद्घाटन सोहळा पावशी ग्रामविकास अधिकारी उमेश खोबरेकर यांनी आयोजित केला होता. सदर उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका स्वतः ग्रामविकास अधिकाऱ्यांनी काढली होती. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या जमिनीवर शिवसेना पक्षाचे झेंडे तसेच बॅनर लावले.
उद्घाटन सोहळ्यावेळी ग्रा. पं. च्या व्यासपिठावर शिवसेना ग्रामपंचायत पावशी असा बॅनर लावून उद्घाटन सोहळा साजरा केला. ग्रामपंचायत अधिनियमानुसार एखादा प्रशासकीय कार्यक्रम करायचा असल्यास त्यास वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्यायची असते. तसेच असा कार्यक्रम कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली घेता येत नाही. परंतु पावशी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पावशी माजी सरपंच व ग्रा. पं. सदस्य श्रीपाद पुंडलिक तवटे आणि आणि वृणाल झिलू कुंभार यांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पावशी ग्रामविकास अधिकाऱ्यांची ही कृती जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम १९६४ चा भंग करणारी आहे. हे उघड उघड शिवसेना या राजकीय पक्षाचा प्रचार केल्यासारखे आहे. शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी मदत केलेली आहे, हे सिध्द होते. त्यामुळे ग्रा. वि. अ. यांनी नियम भंग केल्यामुळे त्यांचविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करुन त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी श्रीपाद तवटे व वृणाल कुंभार यांनी सीईओ कडे केली आहे.