नामात आहे नमन, मनन आणि मौन
*भगवन्नाम ही संतांनी समाजाला दिलेली एक दिव्य अशी देणगी आहे. त्याचप्रमाणे नमन, मनन आणि मौन या त्रयीला परमार्थात फार महत्त्व आहे. किंबहुना या त्रयीशिवाय परमार्थ होऊच शकत नाही आणि म्हणूनच परमार्थात शिरलेले साधक या त्रयींचा कटाक्षाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु नामस्मरण या साधनेचे असे माहात्म्य आहे की, नामधारकाला या त्रयींचा वेगवेगळा अभ्यासच करावा लागत नाही. कारण नामस्मरणात नमन, मनन आणि मौन आपोआप घडते. हे कसे घडते ते आपण थोडक्यात पाहू.
🎯 *नमन*: *नाम हे नामीशी म्हणजे भंगवतांशी अगदी संलग्न आहे,किंबहुना नामनामी एकरूप आहेत.
*तुका म्हणे नाम | चैतन्य निजधाम ||
*त्यामुळे प्रामाणिकपणे नित्य नामस्मरण करीत असता नामाच्या द्वारे भंगवतांशी संग घडतो. जसजसा हा संग भगवंताशी वाढू लागतो तसतसा श्रीरंग आपल्या जीवनात कसा रंग भरून राहिलेला आहे. याची प्रचिती हळूहळू येऊ लागते.
*देव रंगारी रंगारी |त्रिभुवनाचा रंग करी ||
*कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व अंतरेंद्रीये या सर्व इंद्रियांतून वृत्तीचे व कर्मांचे जे रंग उसळतात त्यांच्या पाठीमागे असणारा हा रंगारी म्हणजे साक्षात् श्रीरंग आहेव, अशी साक्ष मनाला नामस्मरण करता करता पटू लागते.
*चाले हे शरीर कोणाचियें सत्तें।
*कोण बोलविते हरीविण।।*
*देखवी ऐकवी एक नारायण।*
*तयाचे भजन चुको नका।।
*माणसाची देव चालवी अहंता।*
*मीचि एक कर्ता म्हणोनिया।।*
*वृक्षाचेंहि पान हाले त्याची सत्ता।* *राहिली अहंता मग कोठे।।*
*हि प्रभुसत्ता मनोमन ओळखूनच नामधारक भगवंताशी अंत्यंत लीन होऊन राहतो व अशा रीतीने त्याच्या नामस्मरणातून नमन भक्तीच प्रगट होत असते.
*ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामि। वर्म हे जाणोनि शरण आलो।
🎯 *मनन*: *नामस्मरण करणाऱ्या नामधारकाच्या अंत:करणात नाम घेताना एकच भाव असतो व तो म्हणजे. ‘मी देवाचा, देव माझा’ हा होय. ‘मी देह नसून देवाचे रूप आहे व सच्चिदानंद परमात्मा हे माझे स्वरूप आहे.’ या बोधाचे मनन किंवा चिंतन साधक नाम घेताना कळत-नकळत करीतच असतो. किंबहुना नामस्मरण याचा अर्थ असा आहे कि, भगवंताचे स्मरण करीत करीत नाम घेणे. या स्मरणाचे स्वरूप काय असते किंवा काय असावयास पाहिजे याचे थोडक्यात दिग्दर्शन वर केलेच आहे.अशा तऱ्हेने केलेल्या नामस्मरणात ‘ मनन ‘ अंतर्भूत असते.
🎯 *मौन*: *प्रपंचात व परमार्थात मौनाचा आश्रय केल्यास जीवनात निर्माण होणाऱ्या कित्येक समस्या मूळातच उद्भभणार नाहीत. प्रामाणिकपणे व निष्ठेने नामस्मरण करणाऱ्या साधकाला मौन आपोआप घडते. कारण ज्या जिव्हेने वाचाळता व बडबड करायची तीच जिव्हा नाम घेऊ लागली म्हणजे मौन आपोआप होते. हे वाचेचे मौन झाले. त्यानंतर मनाचे मौन घडले पाहिजे. मन हे अंत्यंत चंचल आहे व त्यात हजारो विचारांचे काहूर उठलेले असते. त्यामुळे माणसाला मन:शांती मिळत नाही. अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने मन नामाच्या ठिकाणी स्थिर होऊ लागते.
*मन रंगले रंगले। तुझें चरणी स्थिरावले।
*नामात मन जसेजसे रमू व रंगू लागते तसे तसे बोलण्याकडे साधकाची प्रवृत्ती कमी कमी होऊ लागते. त्याचप्रमाणे ज्या मनात विचारतरंग ते मनच नामात मुरल्यामुळे विचारांचे सहजच मौन होते.
*सकलां इंद्रिया मन हे प्रधान। तेंहि करी ध्यान विठोबाचे।
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏