You are currently viewing मानाचा मुजरा

मानाचा मुजरा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना

घरच्या खुराड्यात कोंडून
आई तू डोईवर दही ,.दूधाची
टोपली घेऊन जातांना
वाटेत काटे, दगड सारे
तुझ्या पायाशी बोलायचे
ठेच लागताच
रक्त बंबाळ व्हायचा अंगठा,
तळवा,टोपलीतलं दूध, दही
सांडायचे,
तरीही तू चालायचीस,
उन्हंबी हसायचं, चटका देत.
*आमची इवली पोट
भरावीत म्हणून*
डोईवरचा पदर कधी
फाटलेला असायचा.
त्यातून तुझं करपलेले
केस हळूच बाहेर यायचे,
तुला कशाची पर्वा नसायची,
शेजारच्या गावातलं
एक एक घर तुझ्या
वाटेकडे डोळे लावून असायचे,
त्यांची चिलीपिली
मिठक्या मारीत दूध प्यायची ,
तवा तुला आमची आठवण
यायची,त्या पोरात अाम्हीच
दिसायचो,
गावकुसात तुझा
प्रामाणिकपणाचा,कष्टाचा,
सुगंध दरवळायचा,
चार गावाची रपेट करुन
तू दमायची नाहीस,
आमच्या चोचीत अन्नाचा कण
घालतांना डोळ्यातली गंगा
यमुना तू दडवायचीस,
तुझे सुजलेले,रक्ताळलेले पाय
आम्हाला कधीच दिसले नाहीत,
कोठे दडवून ठेवत होतीस
हुंदका,मुसमुसलेल्या वेदना ?
पायाची जोडवी,मासोळी,पैंजण
रडायचे गं रात्रभर तुझ्यासवे.
आम्हाला झोपवतांना
तू अंगाई म्हणायचीस,
हुमणे घालायचीस,
लग्नातील नावे घ्यायचीस,
सरस्वतीच बोलायची
तुझ्या मुखातून.
मी अभिमानाने फुलून जायचो.
कोणाची हिम्मत नसायची
आमच्याकडे डोळे वटारून
बघायची.
इतकी सात्विक प्रेममय
पाखरण असायची
आमच्यावर.
मी कधी कधी
त्या पडक्या वाड्यापुढं
उभा राहतो.
मला सारं सारं दिसतं
चित्रपटासारखं.
तुझी कामातली उरकं,
अंगणातला सडा शिंपण,
तुळस पुजन.
तुळशीला फे-यामारतांना
आमच्यासाठी पदराचा टोक
हाती धरून दान मागायचीस.
तुळस वा-यानं हलून
हुंकार, कौल द्यायची.
गोट्यातलं जनावर
तुझ्याशी बोलायची,
तू त्यांच्याशी बोलायची.
चारापाणीसाठी तू
त्याच्याबरोबर माळभर
हिंडायचीस.
त्यांना दावणीला बांधून
तुझा संसार डोईवरच्या
टोपलीतून चार गाव फिरायचा.
डोक्यावरच्या ओझ्यानं
नसा नसा चेपल्या कधी
कळालचं नाही.
डोकं,मन,बधीर व्हायचे,
संवेदना उध्वस्त व्हायच्या.
मग तू एका ठिकाणी
गप्प बसून राहायचीस.
आम्ही तुझ्या भोवती पिंगा
घालायचो,
तू हळूच म्हणायचीस
*हे ही दिवस जातील,
सुख येईल पालखीत
बसून.*
आज तुझे थरथरणारे हात
हाती घेताच सगळं आठवतं.
ऊर भरून येतं,
डोळ्यातील आसू
चारी धाम करुन येतात
तुझ्या मांडीवर झोपून
खूप रडावं वाटतं,
तुझा खरबरीत हात
अंगभर फिरतांना
तू देवकीचं वाटतेचं
मी कृष्ण होतो.
मला कळत नाही
आमच्या हट्टाचा तुला राग यायचा
नाही.
तू हसतचं आमचं लाड पुरवायचीस.
आज “*जागतिक महिला दिन*”
या दिनी तू शिवबाची जीजा
होतीस, शिवबांची हिरकणीच
वाटते मला.
श्यामच्या आईसारखी
सात्विकतेच्या मांगल्याने तू
साक्षात लक्ष्मीचं होतीस
तुझ्या लख्ख प्रकाशाने
आम्हीही सूर्यप्रकाश होतो.
* तुला मानाचा मुजरा*
तुझाचं अप्पा!

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा