जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख
आठवतंय् का? नटसम्राट मधील डॅा.श्रीराम लागू यांचे
स्वगत … टू बी ॲार नॅाट टू बी .. जगावं की मरावं…
की झोकून द्यावे हे शरीर जाणिवेच्या अज्ञात प्रदेशात ..
कायमचे… पण तिथे ही त्याला जगण्याचे घुमारे फुटू
लागले तर …
जाणिवेच्या पलिकडील प्रदेश .. जिथे जाणिव संपते तिथे
हा सुरू होतो .. तो अज्ञात असतो.जाणिवेच्या पलीकडे
अज्ञात गुहेत काय आहे हे माणसाला माहित नसते, म्हणून
तिथे जो शोध लागतो तो नवा असतो. केशवसुत म्हणतात ,
या अज्ञात प्रदेशात कविता रूपी रत्ने असतात, तिथून ती
शोधायची नि त्याला शब्दरूप द्यायचे..अज्ञाताच्या गुहेतून
त्यांना शोधून काढायचे .
लहानपणी “चांदोबा” तील ती वेडी वाकडी महाकाय झाडे
पाहिली की मला ही ती अद् भूत अनाकलनीय वाटत असत.
किंबहुना ती काल्पनिक असावित असे वाटे, इतकी ती विचित्र
असत कारण मी पाहिलेल्या जाणलेल्या अनुभवा पलिकडील
ती होती , जाणिवेच्या पलिकडची…
पण बघा..२००८ साली इंग्लंड मध्ये सहा महिन्याच्या वास्तव्यात स्कॅाटलंडला आम्ही नऊ दिवस भाड्याने बंगले
घेऊन राहिलो नि भटकलो तेव्हा लहानपणी जाणिवेच्या पलीकडे असलेली ही त्याच आकारविस्ताराची झाडे जेव्हा
मॅकडोनॅाल्ड इस्टेट मध्ये मी प्रत्यक्ष पाहिली तेव्हा जाणिवेच्या
पल्याड असलेल्या गोष्टी ही अस्तिवात असल्याचा साक्षात्कार
होऊन मी विस्फारलेल्या नेत्रांनी त्यांच्याकडे पहात राहून त्यांच्या जाणिवेचा साक्षात्कार मला प्रत्यक्ष घडला.
कधी कधी एकांतात विचार करत असतांना समजा मोगऱ्याचा
नुसता मनात यायचा अवकाश की, साक्षात त्याचा सुगंध
खरोखरच आपल्याला जाणवतो. खूप वेळा आपण विचार
करतो आता हिवाळा संपला, आता पळस पांगारा फुलेल,
गुलमोहोर डवरतील, नुसतेच फुलांचे गुच्छ हसतील,
हा विचार करत असतांना फुललेला लालबुंद पळस,त्याची
ती अग्नीशिखा, रस्तोरस्ती अजुनही न फुललेला पण फुलांनी
गच्च गुलमोहराची झाडे डोळ्यांसमोरून सरकू लागतात ते काय
असते .. ? ते असते जाणिवेच्या पलीकडील दृश्य व त्याचा
वर्तमानात आलेला साक्षात अनुभवच नाही का?
अंध व्यक्ती ह्या जाणिवेपलीकडील गोष्टींचा अनुभव नेत्र मिटूनच घेत असतात , अगदी पावलोपावली ते हे अनुभव
जगत असतात . इ .नववित असतांना वडिलांनी आमच्या
घरी प्रथम रेडिओ आणला तेव्हा “मेरा साया” नावाचा सिनेमा
जोरात चालू होता. त्यातले “ झुमका गिरा रे” हे गाणे मला
फार आवडत असे. सिनेमा पाहण्याचा प्रश्नच नव्हता. पण
कल्पनेने ते दृश्य नजरे समोर साकार होत असे ही जाणिवे
पलीकडीलच गोष्ट नव्हे काय ? अशा कितीतरी जाणिवेपलीकडील गोष्टी नजरेसमोर नेहमीच साकार होत असतात नाही का? आणि आपण त्यात अगदी हरवून जातो
हे ही तितकेच खरे आहे .आणि मग प्रत्यक्ष “मेरा साया”
पाहिल्या नंतर ते लहानपणीच् जाणिवे पलीकडील जग
प्रत्याक्षात आल्यानंतरही तेवढाच आनंद झाला .
मी अगदी सहा सात वर्षांची असेन तेव्हा माझ्या वडिलांनी
आमच्या घरी प्रथमच “ग्रामोफोन “ (हो, ती गोल तबकडी
ठेवून त्यावर ते सुईचे हॅन्डल ठेवायचे तोच)आणला. हॅन्डलने
हवा भरून तो सुरू करायचा व त्या तबकडीवर हॅन्डल ठेवायचे
की गाणे वाजायचे . माझ्या आईसह गल्लीतील सारी बायामाणसे त्या ग्रामोफोनच्या आजूबाजुला बसून त्या
वेळची राजकुमारी , सैगल यांची गाणी ऐकत कुठल्या तरी
अद् भूत अशा जाणिवेच्या पलीकडील प्रदेशात फिरत
आनंद घेत असत.”मारी कटारी मर जाना” हे राजकुमारीने
गाईलेले गाणे माझ्या आईला फार आवडत असे व ती ते
मनलावून ऐकत कुठल्यातरी अज्ञात दुनियेतून फिरून येत
असे.
मग , आहे ना मस्त ही जाणिवेच्या पल्याड असलेली दुनिया !
अर्थात, नेहमी प्रमाणे ही माझी मते आहेत.
धन्यवाद ….!
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १० मार्च २०२२
वेळ : रात्री ८ : ३३