जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ८ मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पणदूर क्र. २ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमास पणदूर सरपंच दादा साईल, सौ. स्मिता वाळके मॅडम, पत्रकार सौ. विभावरी परब मॅडम, मुख्याध्यापक कदम मॅडम, तेरेसे मॅडम, शा.व्य.समिती सदस्य व सर्व मान्यवर पालक तसेच अंगणवाडी बाई, सहकारी शिक्षक,स्वयंपाकी काकी इ. सर्व उपस्थित होते.
कार्यक्रमात सरपंच साईल यांनी मुलांना आजच्या दिनाचे महत्व सांगताना, “छ.शिवरायांना मातोश्री जिजाऊंनी घडवलं व हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. ज्यांनी लोकशाहीचा पाया रोवला. तसेच क्रांतिज्योती सावित्री बाईंनी मुलींना शिक्षणाची वाट दाखवून सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तबगारी बजावताना स्त्रिया कोठेही कमी नाहीत हे समाजात दाखवलं. अंतराळवीर कल्पना चावला यांनी क्षितीजापलीकडेही जग असतं याची जाणीव दिली. या सर्व कर्तबगार महिलांचा आदर्श सर्व माता भगिनींनी नजरेसमोर ठेवून आपल्या मुला मुलींना सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे.” अशी बोधपर माहिती दिली.
कार्यक्रमात लहान मुलांकरिता खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांकरिता संगीत खुर्ची, चमचा गोटि, बकेट बॉल इत्यादी खेळ घेण्यात आले.