जागतिक महिला दिनानिमित्त…
प्रत्येकाला वाटत की,छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी जन्माला यावी पण ती स्वतः च्या घरात नाही तर दुसऱ्याच्या घरात…..मला वाटतं ‘अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो.’ आजकाल समाजात महिलांच्या बाबतीत जेव्हा चुकीच्या घटना घडल्या जातात,तेव्हा ती महिला कितीही सुशिक्षित असली तरी आपली इज्जत जाईल , केवळ या भीतीने गप्प बसते.तिच्या मनात झालेल्या अन्यायाविरुध्द चीड असते पण तिला आपला आतला आवाज आतच गिळून गप्प बसावं लागतं आणि घरातले,समाजातले लोक पण तिला याचीच भीती घालतात आणि वर हे लोक सांगणार पुरुषाची इज्जत जात नाही, बाईचीच जाते.म्हणजे याच समाजाच्या मानसिकतेमुळे, पुरुष कितीही गुन्हे करून पुन्हा ताठ मान करून दुसरी शिकार करायला मोकळा असतो. यात हे पुरुष पांढरपेशी व्यवसायातले,उच्चभ्रू समाजातले,समाजात स्वतःचे स्थान प्रस्थापित झालेले. खरतर यांची विचारसरणी अगदी खालच्या पातळीची असते.कधीकधी अशिक्षित लोक( शिक्षण कमी पण विचार उच्च पातळीचे,) माणसं समाजात चांगलं कार्य करून एक आदर्श ठेवून जातात. जेव्हा एखादी महिला याच प्रस्थापित लोकांविरुद्ध,अन्यायाविरुध्द, चुकीच्या गोष्टी बद्दल,वाईट प्रवृत्ती विरोधात आवाज उठविते तेव्हा समाजाने तिला पांठीबा देण्याची गरज असताना तिलाच नावे ठेवली जातात.तिलाच मागे खेचले जाते. म्हणून कितीही विरोध झाला तरी, तिने न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे.त्यासाठी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई,अशा इतिहासातील थोर स्त्रियांचा आदर्श महिलांनी ठेवला पाहिजे. त्यांच्या पावलावर पावून ठेवून समाजात थोर कार्य घडवलं पाहिजे. हे आजच्या स्त्रियांनी न विसरता स्वतःच्या अन्यायाविरुद्ध स्वतःच आवाज उठविला पाहिजे. समाजातील वाईट प्रव्रुत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. म्हणजे स्त्रियांची होणारी फसवणूक किंवा अत्त्याचार वेळीच थांबून अशा गोष्टी घडणार नाहीत. त्यासाठी महिलांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, भारताचे संविधान जरूर वाचावे.जेणेकरून त्यांना आपले मूलभूत आणि मानवी हक्क, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य,समता,न्याय डावलले गेल्यास कायद्यातील त्यासाठीची उपाययोजना,अशा गोष्टी कळतील. त्याचबरोबर आपले जीवन अधिक सुंदर, मनमोकळे पद्धतीने जगता येईल. या प्रस्थापित अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध , समाजाच्या मानसिकतेविरुद्ध आवाज उठवून,रुळलेली वाट चोखळण्यापेक्षा वेगळ्या वाटेवर चालून समाजात स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे.हे करण्यात निश्चितच आपली इज्जत आपण गमावत नसतो. जगण्यासाठी लागणारा पैसा म्हणजे सर्वकाही नसून, आपण आत घेणाऱ्या
प्रत्येक श्वासासोबतचे मिळणारे समाधान पण तेवढेच महत्वाचे असते आणि ज्याला हा पैशाचा माज चढेल त्याची नशा पण वेळीच उतरविणे तितकेच महत्वाचे असते.जेव्हा कोणी तिच्या आत्मसन्मानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करेल,तेव्हा त्याचा तिथेच नाश केला पाहिजे.. जेव्हा तुम्ही अशा खोट्या लोकांना या समाजात उघडे पाडून शिक्षा देण्यास भाग पाडता,तेव्हा शेवटी तुमचेच गोडवे गायले जातील…
……..तर चला मग माझ्या मैत्रिणींनो , आज महिला दिनाच्या निमित्ताने हा वेगळा विचार आत्मसात करून स्वतः मध्ये आणि पर्यायाने समाजामध्ये बदल घडवून नवनिर्माणाचे युग आणुयात ……..!
बिनधास्त,बेधडक बोल🖊️ -गितांजली नाईक.9404395439
प्रशासकीय अधिकारी,कुडाळ नगरपंचायत.