You are currently viewing ८ मार्च जागतिक महिला दिन

८ मार्च जागतिक महिला दिन

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल प्राविण्य, गझल मंथन ग्रुप सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेला अप्रतिम लेख

आज आपण सगळेजण महिला दिन साजरा करतो. सगळीकडे आज महिलांकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून नामांकित महिलांचा सत्कार करत असतो.
सगळीकडे शांत व प्रसन्न वातावरण दिसून येते.
घरातल्या स्त्रिलाही आज घरातले थोड्या फार सन्मानाने वागवतात. तिला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतात. फार छान वाटतं.
हा आपला महिला दिन आपल्याला सहजा सहजी नाही मिळाला. त्याकरिता मोठा लढा द्यावा लागला.

प्राचीन पूर्व वेद काळात स्त्रियांचा मान- सन्मान राखला जायचा, तसेच त्यांना शिक्षण ही घेता येत होते. त्यातल्या महान विदूषी म्हणजे गार्गी, मैत्रेयी इत्यादी. पण नंतरच्या वेद काळात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तिच्याकडे फक्त एक भोग वस्तू म्हणून पाहिले जाऊ लागले. चुल, मुल, संसार व सदैव पुरुषांना वर्चस्व देणे हेच तिचे काम ठरले. फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात स्त्रिला अशीच वागणूक मिळत होती. महिलांना कोणतेच अधिकार नव्हते. १९०७ मध्ये स्टुटगार्ड येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “क्लारा झेटकिन” ह्या कम्युनिष्ट कार्यकर्तीने ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करणे स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा केली. २८फेब्रुवारी १९०९ न्यूयॉर्क येथे, ‘टेरेसा मायकियल’ सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका, यांनी आयोजित केलेला “पहिला महिलादिन” मानला जातो. पण ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातिल हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली होती. दहा तासाचा दिवस आणि कामाची सुरक्षितता ह्या मागण्या केल्या होत्या व त्याच बरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता, शिक्षण आणि मतदान हक्क या ही मागण्या जोरकसपणे केल्या होत्या. ह्या त्यांच्या
व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली व तिने १९१० ला कोपनहेगन येथे भरलेलया दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ च्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ “८ मार्च हा जागतिक महिला दिन” म्हणून स्वीकारावा अशी मागणी केली व तो ठराव पास ही झाला.

ज्यावेळी स्त्रीवादींनी जोर धरला होता त्यावेळी आपल्या देशातील अनेक समाज सुधारकांनी ही
स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यात राजा राम मोहन रॉय, महर्षि कर्वे, महात्मा ज्योतीबा फुले, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे इत्यादी होते
बाल विवाह, सती प्रथा, केशवपन ह्या आपल्या रुढी बंद करण्याचे प्रयत्न झाले व स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, प्रौढ विवाह ची सुरुवात केली. फुले व सावित्रीबाईंचे योगदान फारच मोठे म्हणायला हवे. समाजाचा प्रखर विरोध व अंनत अडचणीवर मात करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा घाट महाराष्ट्रात घातला.
१९०२ मध्ये रमाबाई रानडे यांनी “Hindu ladies Social and literary club” ची स्थापना केली. तर १९०४ मध्ये “भारत महिला परिषद ‘” ची स्थापना झाली व त्यातून मतदानाचा अधिकार व नंतर निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार १९३५ पर्यंत मिळत गेला.
आपल्या देशात पहिला महिला दिन झाला तो मुंबईत १९४३ साली व १९५० पासून राज्य घटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.
१९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. ह्या नंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजा समोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
१९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता ह्या हेतूने साजरा करावा असे आवाहन केले.
नंतर हळूहळू ८ मार्चला जागतिक महिला दिन म्हणून लोक आपल्या कार्यालयात, बँकात व वेगवेगळ्या संस्थेत स्त्रियांचा सन्मान करू लागले. स्त्रियांना शिक्षणाचा, संपत्तीचा, मतदानाचा, निवडणुकीत उभे राहण्याचा असे अधिकार मिळत गेले. आज स्त्रिया सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत हे चित्र दिसून येत आहे, पण वास्तव खरंच तसे आहे कां?
आज जगातल्या सगळ्या स्त्रियांना मानाने सन्मानाने वागवतात कां? आपण एका कु़टुंबातलंच उदाहरण घेऊ. आज सगळे नवरे घरातली कामे स्वतः करतील. बायकोला सिनेमा हॉटेल मधे घेऊन जातील. काही नवरे तर भांडी सुध्दा घासतील. पण एका दिवसापुरतं! उद्या परत “येरे माझ्या मागल्या.” आता तुम्ही म्हणाल “नवऱ्यांनी काय रोजच हॉटेल मधे जेवायला न्यायचं व भांडी घासायची का?” तर तसं मुळीच नाही. अरे आज तू काम केलं ते कुणासाठी? बायको साठीच का? तू ही जेवलास, सिनेमा पाहिलास, तू ही घरचाच आहेस ना! तुझी बायको रोज करते त्यातलं फक्त थोडं आज तू केलंस, त्याचा एवढा बाऊ करू नकोस.
आज तिच्याशी मानाने व सन्मानाने वागलास तसा नेहमी तिला सन्मानाने वागव. तिचे सर्व अधिकार तिलाही मिळू दे. तेव्हाच खरा महिला दिन होईल. तसेच सासू सासरे ही असतात. सासू सुनेची भांडणे सरसकट सगळीकडेच असतात. जर दोघींनी एकमेकांचा मान सन्मान राखला, आई /मुलगी समजून नव्हे तर आई/ मुलगी म्हणून प्रेमाची, मायेची एकमेकींना उब दिली तर घर एक स्वर्ग व्हायला वेळ लागेल काय? प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा. आजच्या समाजात स्त्रियांच स्त्रियांच्या शत्रू आहेत. उणंधुणं काढणं, टोमणे मारणं, घालुन पाडून बोलंण, बंद करा सगळं. दोघी शिकलेल्या आहांत. तुमच्या वागणूकीत दिसू दे ते शिक्षण. तुमचं अनुकरण घरातली मुलं करतात. आज घरात एकोप्याने राहिलात तर वृध्दाश्रम चुकेल. सून म्हणून आलेली मुलगी आई वडिलां सारखी वागवेल. घरात नंदनवन फुलेल.
स्त्री, मग ती कोणीही असू दे, आई, बहीण, बायको, वहिनी, काकू काम करतो तेथील सहकारी, घरकाम करणारी बाई, जेथे जेथे बायकांशी बोलतो वागतो तेथे त्याना सन्मानाने वागवा. तरच आपला महिला दिन सफल होईल. आपली भारतीय संस्कृती जपा.
आज स्त्रिया बऱ्याच क्षेत्रात पुरूषांपेक्षा आघाडीवर आहेत. घर- दार – संसार सांभाळतात. उच्च शिक्षित असून सुध्दा कधी कधी जीवनाला वैतागून आत्महत्या करायला प्रवृत्त होतात, तर काही करतात सुद्धा. अशा वेळेला वाटतं कुठे गेले अधिकार? कसला महिला दिन? खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करायचा असेल तर रोजच स्त्रीदाक्षिण्य दाखवा. रोजचाच त्यांचा दिवस खास होऊ द्या!
आजचा महिला दिन सर्व स्त्री जातीला सुखाचा, आनंदाचा व भरभराटीचा जावो व त्यांच्या आयुष्यात असे दिवस पुन्हा पुन्हा येवो ही हार्दिक शुभेच्छा.

**समाप्त**

शोभा वागळे
मुंबई
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा