जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
आयुष्याचा यज्ञ मांडला आहुती क्षणा क्षणांची
पाहते शबरी वाट कुणाची ll
मुक्या जीवांचा भोग न रुचला
बालपणी गृह त्याग सोसला
आश्रमात मुनी मतंग आश्रय कन्या घेई वनाची …… पाहते शबरी वाट कुणाची
अनुष्ठान जणू व्रत सेवेचे
छत्र लाभले ऋषीं कृपेचे
भिल्लीण तरीही मुनी जाणती खाणच सत्व गुणांची……. पाहते शबरी वाट कुणाची
भगवंताचा संकेतच जर
मुनी चालले हिमालयावर
उरे एकटी विजनवासी जणु तपस्विनी योगाची…… पाहते शबरी वाट कुणाची
नेत्र पुसुनी मुनी मतंग वदती
नको साधना तुला कोणती
उद्धारास्तव तुझ्या पाऊले वळतील प्रभू रामांची….. पाहते शबरी वाट कुणाची
पूजा साधण्या सजवी आसन
फुला फळांची रोज साठवण
नेत्र निरांजन श्वास आरती श्री राघव चरणांची….. पाहते शबरी वाट कुणाची
काळ लोटला थकली काया
परी श्रद्धेची आरास न वाया
सवे चालता भ्रांत लक्ष्मणा पाहुनी ओढ प्रभूंची…. पाहते शबरी वाट कुणाची
कोसळली शबरी चरणांवर
अश्रु उभयतांच्या गालावर
प्रभू चाखता गोड जाहली अमर कथा बोरांची…… पाहते शबरी वाट कुणाची
ही कथा आगळी उद्धाराची
वनवासातील दिव्य क्षणांची
मन माझे मागतसे भिक्षा तिथल्या धूली कणांची….. पाहते शबरी वाट कुणाची
आयुष्याचा यज्ञ मांडला आहुती क्षणा क्षणांची
पाहते शबरी वाट कुणाची
अरविंद
9960267354
6/9/20