You are currently viewing शालेय परीक्षा

शालेय परीक्षा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक विनय सौदागर यांचा शालेय परिक्षांवर भाष्य करणारा अप्रतिम लेख.

जीवनात वेगवेगळ्या परीक्षांना आपण सामोरे जात असतो. पण परीक्षा म्हटलं की, शाळेतील परीक्षाच आठवते. त्यातही दहावीची.. जी आता सुरू होईल आणि बारावीची.. जी सुरू झालीय.
पूर्वी फायनल म्हणून एक सातवीची परीक्षा होती आणि अकरावीची मॅट्रिक ची परीक्षा होती. आता पॅटर्न बदललाय. जरी बारावीचं प्रस्थ थोडं कमी असलं, तरी दहावीची क्रेझ मात्र आहेच.
मूळात ‘परीक्षाच नको’ पासून ‘परीक्षेमुळेच मुलांचा अभ्यास होतो’ असे वेगवेगळे विचार प्रवाह आपल्या आजुबाजूला वहात असतात. त्यांचे वेगवेगळे समर्थनीय मुद्देही असतात. त्या त्या ठिकाणी ते योग्यही असतात. पण त्यात कधी सखोलता दिसते, तर कधी कधी खूप उथळपणाही असतो.
आमच्या शेजारी एक मुलगा चौथीत शिकत होता. मला संदर्भासाठी म्हणून स्कॉलरशीपचे पुस्तक हवे होते. मी त्याला विचारले. तो ‘आपल्या जवळ नाही’ म्हणाला. मी म्हटलं , “बसला नाही का स्कॉलरशीप परीक्षेला? ” तर ‘बसलो’ म्हणाला. बाप जवळच होता. काही तत्वज्ञान सांगण्याच्या आविर्भावात तो मला म्हणाला, ” आमी परीक्षेक हेंका बसयतो, म्हणजे काय; तर त्येंचो अभ्यास जावचो म्हणान.” पण असे करताना ‘अभ्यासासाठी पुस्तक हवे’, असे त्याचे एकंदरीत मत नव्हते.
या परीक्षेचे सुरुवातीच्या काळात एवढे टेन्शन नव्हते. कारण पास होणे किंवा वर्ष फुकट न घालवणे, एवढीच माफक इच्छा पालकांची होती. आता त्याचे जीवघेण्या स्पर्धेत रुपांतर झालेय. महत्वाचे म्हणजे यात बहुधा पालक स्वतःहूनच फसलेत. त्यांना सांगण्यासाठी, मिरवण्यासाठी कदाचित याची गरज भासत असेलही, पण यात मुलं गुदमरताहेत.
परीक्षाच रद्द होऊन त्याला पर्याय सापडे पर्यंत तरी आपल्याला यातूनच जायला लागेल, हे खरे. पण फक्त मुलाना यात भरडू न देता त्यांना सोप्या पद्धतीने या परीक्षेकडे नेता येईल का? या कडे बघायला हवं,असं मला वाटतं. खूप गरीब, कष्टकरी पालकांचं सोडा ,पण निदान शिकलेल्या पालकानी तरी यात लक्ष घालायला हवं. केवळ उपयुक्त साहित्य गोळा करून मुलांना देणं आणि क्लास लावणं, याच्या पुढे जाऊन आपण मुलांसोबत सोबत रमलं पाहिजे; तर तेही अधिक चांगल्या रितीने अभ्यासात रमतील, असं वाटतं.
याचं एक उत्कृष्ट उदाहरण मी वाचलंय. ते म्हणजे वालचंदनगरच्या डाॅक्टर अरुण हतवळणे यांचं. त्यांची दोन्ही मुलं दहावी, बारावी बोर्डात पहिली आलेली. विशेष म्हणजे मुलगी विनया दहावी व बारावीत दोन्ही वेळेस बोर्डात प्रथम आलेली,तर आनंद दहावीत. डाॅ. हतवळणेनी पुढे अनेक मुलाना मार्गदर्शन केलं. १९८९ ते १९९८ या काळात त्या वालचंदनगरची अडतीस मुलं गुणवत्ता यादीत चमकली. डाॅक्टरनी मग एक सुरेख पुस्तक लिहलं,’यशवंत व्हा’. या पुस्तकात त्यानी केलेले अनेक चांगले प्रयोग आहेत. परीक्षेकडे सकारात्मकतेने सामोरे जाण्याचा त्यांचा प्रयत्न मला खूप भावला.
‘यशवंत व्हा’ हे पुस्तक मला माझी धाकटी मुलगी ‘मुग्धा’ चौथीत असताना सापडलं. त्यात त्यानी लिहिलं होतं की, सरावासाठी आपण मुलांकडून जे पेपर सोडवून घेतो, ते मुख्य परीक्षेची जी वेळ असेल (म्हणजे जसे ११ते२), त्याचवेळी सोडवून घेणं योग्य. मग मी हा प्रयोग करून बघायचं ठरवलं. मुग्धा चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेला बसलेली. मी परीक्षे अगोदर एक महिना रजा घेतली. शिक्षकांची परवानगी घेऊन तिलाही घरी ठेवली. या महिन्याभरात ती रोज पेपर सोडवायची. अर्थातच शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळे नुसार (११ते १२, १ते२ आणि ३ते४ ) मी लगेच ते तपासायचो. चुका दुरुस्त करीत पुढे जायचो. तिसाव्या दिवशी ती परीक्षेला गेली .तिला ताण नव्हताच, पण मलाही नव्हता. मग सुखावणारा निकाल हाती आला. तिला शिष्यवृत्ती मिळालीच, पण ती शहरी विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पहिली आली.
डाॅक्टर हतवळणेनी पुस्तकात सांगितलेले अनेक प्रयोग मी करून बघितले. आपल्यालाही ते करून बघता येण्यासारखे आहेत.
या मधून मला एवढंच सांगायचं आहे की, ही परीक्षा पद्धती काही आपल्याला टाळता येण्यासारखी नाही .मग आपण पालकानी त्यात स्वतःला समावून घेण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? मुलांचं यश जर आपलं यश, तर आपलं योगदानही तसंच हवं. शिक्षक, क्लास, ही वेगळी गोष्ट आहे. निदान बारावी पर्यंत तरी आपण मुलांचे सोबती असणे, ही खरी गरज आहे. त्यामुळे मुलं तणावमुक्त रहातील,आपलीच मुले पुढे जातील आणि आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या यशाचे भागीदार होऊ. आपल्या जवळ वेळ असतो हां, फक्त काढायला पाहिजे. या आपल्या योगदानामुळे परीक्षा हा दडपणाचा विषय न रहाता, तो एक जगण्याचा भाग होईल. जीवनाचा एक प्रवाह बनून जाईल. बर्‍याच पालकांनी असं केलेलं मी पाह्यलंय.
परीक्षेला पर्याय सापडे पर्यंत तरी, आपल्याजवळ अन्य पर्याय दिसत नाही. परीक्षार्थींना शुभेच्छा.

*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802………..२२

प्रतिक्रिया व्यक्त करा