*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका उज्वला सहस्त्रबुद्धे यांची अप्रतिम काव्यरचना*
*ऋतूंची फुलमाला..*
वसंत येईल राजा बनुनी,
चैतन्याने भरली अवनी !
नवसृजनाचे दालन उघडुनी,
नवल उमटले माझिया मनी!
ग्रीष्म झळा त्या येता भुवनी,
तगमग होई सजिव जीवनी!
शोधित जाई गारवाही मनी,
चाहुल घेई वर्षे ची आंतुनी!
वर्षेचा पहिला शिडकावा,
चराचराला देई गारवा !
वाट पहातो ऋतू हिरवा,
दिसेल तेव्हा बदल नवा!
शरदाचे दिसताच चांदणे,
आनंदाला काय उणे !
चंद्रचकोरी नभात बघणे,
धरतीवर स्वप्नात रंगणे!
हेमंता ची लागताच चाहुल,
पडे थंडीचे घरात पाऊल!
दाट धुक्याची घेऊन शाल,
निद्रिस्त राही निसर्ग विशाल!
शिशिराची ती थंडी बोचरी,
पान फुलां ना निद्रिस्त करी!
जोजवते आपल्या अंकावरी,
शांत मनोरम सृष्टी साजरी !
सहा ऋतूंची ही फुलमाला,
निसर्ग वेढितो ती सृष्टीला!
प्रत्येक ऋतू बहरून आला,
अस्तित्वाने मनात फुलला!
उज्वला सहस्रबुद्धे.वारजे.