स्त्री म्हणजे घराचं मांगल्य, अशी धारणा पूर्वापार चालत आली आहे. पण, मध्यंतरीच्या काळात हीच स्त्री चूल अन् मूल किंवा रांधा, वाढा अन् उष्टी काढा, या पुरतीच मर्यादित राहून तिचे समाज व्यवस्थेतील अस्तित्व व महत्व अगदीच कस्पटासमान समजले जायला लागते. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेमुळे तिच्या वाट्याला दु:ख, असह्य वेदना, अन्याय, अत्याचार अशा गोष्टी येवून ब-याचदा ती हुंड्याची देखील बळी ठरु लागली. आताच्या आधुनिक काळात तर तिचे अस्तित्वच नाकारण्यासाठी तिला जन्माला येण्यापूर्वीच आईच्या कुशीत मारुन टाकण्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठणा-या घटना आपल्या अवतीभवती घडू लागल्या आहेत. एकंदरीत, स्त्रीचे समाज व्यवस्थेतील महत्व हे दुय्यम दर्जाचेच असल्याचे अधोरेखित करण्याचा काहींचा विविध माध्यमातून सुरु असलेला प्रयत्न हा स्त्री – पुरुष यातील भेद स्पष्ट करतानाच पुरुषप्रधान संस्कृतीची मक्तेदारी सिध्द करण्याचा हा सारा खटाटोप म्हणावा लागेल. यातूनच आधुनिकतेचा मुखवटा पांघरलेल्या या क्रूर मानवी मनात पैसा, संपत्तीच्या हव्यासापोटी स्त्रीयांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांनी उद्रेक केला. ब-याचदा पुरुषांच्या क्षणिक सुखाच्या हव्यासात ती नात्याला काळीमा फासणा-या क्रूर अत्याचाराच्या घटनांना बळी पडली. यामध्ये स्त्री म्हणजे आई – वडीलांच्या डोक्यावरील ओझे ही मानसिकता स्वतःला सुशिक्षित व आधुनिक म्हणवून घेणाऱ्यांमध्ये देखील खूपदा दिसून येवू लागली. त्यामुळे आजच्या शिक्षण व्यवस्थेमुळे समाज सुसंस्कारित होतो का, असा प्रश्न कुणालाही पडावा, इतकी गंभीर परिस्थिती अवतीभवतीची स्त्री – पुरुष यातील भेदाची दरी पाहिली की जाणवत राहते. याचाच परिणाम, म्हणजे आज स्त्रीचे अस्तित्वच नाकारण्यासाठी तिला जन्माला येण्यापूर्वीच आईच्या गर्भात मारुन टाकण्याचा क्रुतघ्नपणा दाखवला जातो. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्या यासारख्या वाढणा-या घटना समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेचा बुरखा फाडणा-या आहेत. म्हणून, तर आजही मुलगी म्हणजे आई – वडीलांच्या अन् संपूर्ण कुटूंबाच्या डोक्यावरील आयुष्यभराचं ओझं अशी मानसिकता आजही समाजात बघायला मिळते. परंतू, अशा परिस्थितीत देखील मुलगी म्हणजेच कुटूंबाचं मांगल्य जपणारी खरी लक्ष्मी व वंशाचा दिवा अशी मनोभावे श्रध्दा ठेवून कबनूरमधील भाऊसाहेब चव्हाण यांच्या कुटूंबाने नुकताच जन्मलेल्या शिवन्या या लेकीचे अगदी उत्साही वातावरणात अनोख्या पध्दतीने स्वागत करुन स्त्री – पुरुष समानतेच्या विचाराला प्रत्यक्ष कार्यातून बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.
कबनूर गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जोपासणारे भाऊसाहेब चव्हाण हे आपल्या योगेश मेडिकल्स दुकानाच्या माध्यमातून सर्वस्तरातील गरजू रुग्णांना वेळेत व माफक दरामध्ये औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी कायम तत्पर असतात. तर त्यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्या सौ. संगिता चव्हाण या शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सुसंस्कारित पिढी घडवणे, समाज प्रबोधन करण्यासाठी अगदी व्रतस्थपणे कार्यरत आहेत.सामाजिक भान जपत सदैव कार्यरत असलेल्या चव्हाण दाम्पत्याने आपल्या मुलांना देखील उच्च वैद्यकीय शिक्षण देवून यातून आपल्या सामाजिक कार्याचा वसा व वारसा चालवण्याची धडपड सुरु ठेवली आहे. त्यांची सौरभ व तेजस्विनी ही दोन्ही मुले आणि सून श्वेता असे तिघेही वैद्यकीय पदवीधर शिक्षण घेवून सर्वसामान्य जनतेच्या चांगल्या आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. नुकताच त्यांच्या कुटूंबात शिवन्या हिच्या रुपाने लेक जन्माला आली. तिच्या येण्याने चव्हाण कुटूंबात ख-या अर्थाने लक्ष्मी व वंशाच्या दिव्याचे आगमन झाल्याची भावना त्यांच्यामध्ये अक्षरशः आनंदाला उधाण आणणारी ठरली आहे.म्हणूनच चव्हाण कुटूंबाने आपल्या घरात आलेल्या लेकरुपी या नव्या पाहुणीचे अगदी उत्साहात स्वागत करण्यासाठी छोटेखानी कौटुंबिक सोहळा आयोजित केला होता.
यावेळी शिवन्या या लेकीसह तिची आई म्हणजे सूनबाई डॉक्टर श्वेता या दोघींचे फुलांच्या पायघड्या, फुलांची उधळण, कोवळ्या पायांचे वस्त्रावर उमटवलेले ठसे, संगीताच्या तालामध्ये अन् सुंदर सजावटीच्या आनंदी, उत्साही वातावरणात आजोबा भाऊसाहेब, आजी संगिता, बाबा सौरभ, आत्या तेजस्विनी यांच्यासह संपूर्ण चव्हाण कुटूंबाने औक्षण करत आपल्या कुटूंबामध्ये स्वागत केले. यावेळी प्रवेशव्दावरील कुटूंबातील सर्व सदस्यांच्या नावाच्या प्लेटचे अनावरण करण्यात आले. तसेच एका चिमुकलीने मेरे घर आयी, एक नन्हीं परी यासह काही गीतांवर दिलखुलास न्रुत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तर नात्याने आजी असलेल्या संगिता यांनी आपल्या शिवण्या या नातीवर रचलेली कविता उत्कृष्टरित्या सादर करत अगदी ओघवत्या, आशयपूर्ण मनोगतातून मुलगा – मुलगी असा भेद मानला तर समाजातील समानता कधीच दिसणार नाही. तसेच मुलगा – मुलगी ही समाज विकासाच्या रथाची दोन चाके असून यातील एक चाक नसेल तर हा रथ कसा पुढे सरकणार, चालणार या संदर्भात विविध उदाहरणांव्दारे स्पष्टीकरण देत मुलगी हीच आमच्या चव्हाण कुटूंबाची खरी लक्ष्मी व वंशाचा दिवा असल्याचे सांगितले.
यावेळी चव्हाण कुटूंबाने शिवन्या या लेकीचे अगदी उत्साही वातावरणात स्वागत करत समस्त महिला वर्गाचा सन्मान हा केवळ महिला दिनापुरताच न करता ती कायमस्वरूपी पुज्यनीय असून तिच्याशिवाय समाजाचे अस्तित्व हे केवळ शून्यच आहे, हे दाखवून देतानाच मुलगा – मुलगी नको भेद, देवू त्याला आनंदाने छेद, असा संदेश देत समाजासमोर चांगल्या कार्याचा आदर्श ठेवला आहे. वरकरणी छोटा वाटणारा लेकीच्या स्वागताचा हा कौटुंबिक सोहळा मुलगा – मुलगी हा भेद संपवून समाजातील समानतेचा व विकासाचा धागा अधिक घट्ट करण्यासाठी समाजाचे डोळे उघडत मौलिक संदेश देणारा ठरला आहे. म्हणूनच हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्याची भावना यावेळी संपूर्ण चव्हाण कुटूंबासह नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या चेहऱ्यावरील अमाप उत्साह व आनंदातून दिसून आली. या अनोख्या कार्याचे सर्वस्तरातून मोठे कौतुक होत आहे.
– सागर बाणदार