You are currently viewing अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

सिंधुदुर्गनगरी

गाबीत समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी जात पडताळणी समिती कडून अडवणूक केली जात आहे. प्रस्ताव फेटाळला जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे

जिल्ह्यातील गाबीत समाजाला जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मिळावे ,यासाठी जात पडताळणी समिती ओरोस व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून होत असलेली अडवणूक थांबवावी .या मागणीसाठी अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष शंकर पोसम, सरचिटणीस सुरेश बापर्डेकर, संघटक विजय राऊळ, विश्वस्त सखाराम मालाडकर, प्रकाश बापर्डेकर, दत्ताराम कोयंडे, तानाजी कांदळगावकर, नरहरी परब, रत्नाकर प्रभू ,उल्हास मंचेकर, अन्वेशा आचरेकर, अक्षता परब, आरती खडपकर, स्वप्नाली तारी, विजय राऊळ, आदी गाबीत बांधव या उपोषणात सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यातील गाबीत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करून आपल्या समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.गाबित समाजाला जात पडताळणी व जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त संस्था यांनी दिलेला जात पुरावा दाखला, पोलीस पाटील दाखला,ग्राह्य धरावा, सक्षम अधिकारी यांनी तसेच महसूल यंत्रणेमार्फत चौकशी करून तहसीलदार यांनी जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी मार्फत द्यावे. ते जात पडताळणी समितीने ग्राह्य मानुन जात पड़ताळनी प्रमाणपत्र द्यावे. खरेदीखत, महसुली नोंद ,सर्विस पुस्तक ,यावरील जात नोंदणी ग्राह्य धरुन जात प्रमाणपत्र ,जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने गाबीत समाज सवलतीपासून वंचित राहत राहत आहे. अशावेळी महसूल यंत्रणेमार्फत चौकशी करून विद्यार्थ्यांना व इतरांना जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे. उपविभागीय अधिकारी मालवण -कुडाळ यांची त्वरित बदली करावी. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर महसुली नोंदीत मराठा ,हिंदू मराठा, मराठा गाबित, मच्छीमार गाबीत, हिंदू गाबित कोळी, हिंदू बिगर मागास अशा नोंदी त्यावेळी जन्म नोंद अगर काही जणांच्या शाळांच्या दाखल्यावर निदर्शनात येत आहे. हे दाखले प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राह्य धरावे. या मागण्यां कडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने मच्छीमार गाबीत समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.

अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी उपोषण करणाऱ्या गाबित बांधवाना लेखी पत्राद्वारे चर्चेसाठी बोलावले. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होऊन यापुढे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यासाठी कोणत्याही अधिकार्‍याकडून अडवणूक होणार नाही. जातीच्या दाखल्यासाठी सर्व तालुक्यात कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. असे लेखी आश्वासन दत्तात्रय भडकवाड यांनी यावेळी दिले. तसेच संबंधित प्रांताधिकार्‍यांना सूचना दिल्या . या बैठकीत कुडाळ, कणकवली व सावंतवाडी प्रांताधिकारी उपस्थित होते त्यानीही सहकार्य करण्याचे मान्य केल्याने जिल्ह्यातील गाबित समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आमरण उपोषण स्थगित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा