कर्नाटक राजधानीतील साहित्यिका लेखिका मेघा कुलकर्णी यांचा मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेला अप्रतिम लेख
‘आई’ या नात्याचा अभिमान प्रत्येकालाच असतो, पण ते नाते शब्दांत वर्णन करता येत नाही. तसेच माझ्या ‘मायबोली मराठीचे’ आहे. भाषेची श्रीमंती मराठी मनाच्या साधेपणाचे प्रतिक आहे. संत वाङ्मय – ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, नामदेवांची गाथा अशा अनेक संत साहित्यातून जीवनाचे सार बालपणापासूनच संस्काररूपाने घराघरांतून लाभले आहेत. साहित्यातील विविध प्रकारांनी वाचनसंस्कृती समृद्ध केली ती याच मराठी भाषेने. हे सर्व लिहिताना एका सुंदर गीतपंक्तीची आठवण झाली.
“आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे ‘अ’,‘आ’,’इ’ ”
जीवनप्रवासांत वेगवेगळ्या क्षणी आई मुलांना खूप काही शिकवण देत असते त्याचप्रमाणे मराठी भाषा जितकी मधाळ, रसाळ असते तितकीच काही ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढताना तिला तलवारीच्या पात्याचीही धार असते. विचारांच्या सुसंगती सोबत शौर्यगाथेचे बळ मराठी भाषेच्या शब्दाशब्दांतून ओतप्रोत भरलेले दिसते. परदेशांत, परप्रांतात मराठी भाषेचा सन्मान मातृभाषा म्हणून होतोच आहे. कर्तुत्वाच्या भरारीत ती कधीच लांब जाऊ शकत नाही. कार्यालयीन संपर्क भाषेत विविधता असली तरी महाराष्ट्राबाहेर दोन मराठी माणसे समोरासमोर आली आणि मराठीतून संभाषण सुरू झाले चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. अशावेळी शहरांच्या/गावांच्या सीमारेषा धूसर होतात. ही मात्र कमाल असते ती आपल्या भाषेची, मराठमोळेपणाची.
वृत्त,अलंकारांचा साज ल्यालेली, वाक्प्रचार – म्हणींद्वारे वैविध्य जपणारी, नागरी – ग्रामीणतेचे अस्तित्व दर्शवणारी, अशा माझ्या मराठी भाषेला ‘मराठी राजभाषा दिनानिमित्त शत-शत प्रणाम. *”साहित्य – संगीताचा सन्मान होतो, सदैव माझ्या घरी
कर्नाटकच्या राजधानीत साकारली, इये मराठीचिये नगरी”.*
– मेघा कुलकर्णी