You are currently viewing माझी माय… मराठी

माझी माय… मराठी

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अरुणा महेश जाजू यांचा मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून लिहिलेला अप्रतिम लेख

आजचा दिवस खऱ्या अर्थाने माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे .आज मायबोली मातृभाषेच्या सोहळ्याचा दिवस . मराठी भाषा माझी खुप आवडती भाषा , अगदी त्याला माझं पाहिलं प्रेम म्हणले तरी त्यात काही वावगे नाही . याच भाषेने मला माझी ओळख एक साहित्यिक म्हणून करून दिली . माझ्या कविता , गझला , ललित लेख विविध शब्दांनी शृंगारून वाचकांच्या मनापर्यंत पोहचवले .
आई सारखेच जपले मला माझ्या मराठीने . आनंदात , दुःखात , अपयशात , यशाच्या शिखरावर मिरवताना दिमाखाने डोलणारी आणि मलाही डोलवणारी ही माझी सखी . माझ्या भावनांना शब्दात मांडताना असंख्य अलंकार दिले मला या मायबोलीने .

मी मारवाडी , आणि बोली भाषा हिंदी पण प्रेम मराठीवर . या प्रेमापोटी मी मराठीतच लिखाण चालू ठेवलं . हिंदी मावस भाषा म्हणली तर हरकत नाही कारण ती राष्ट्र भाषा आणि तिलाही जपणं तेवढच गरजेचं कारण म्हणतात ना ‘माय मरो आणि मावशी जगो ‘ . लग्न करून सासरी आल्यावर मात्र माझ्या या प्रेमाची खरी परीक्षा .मी आले निज़ामाबाद , तेलंगाना राज्यात ,आणि घरात ही मराठीचा कुठेच लवलेश नाही . ते दिवस नवीन नवीन मला अगदी विरहाच्या यातनेत काढावे लागले माझ्या मराठी भाषेच्या .
आपल्या घरातून परक्याच्या घरात कशी भावना येते तशी यायची सगळी कडे हिंदी नाहीतर तेलगू . तेलगू तर अगदी डोक्यावरून काय कुठून जायचे तेही नाही कळायचं .
खरं सांगू असा मनातून त्रागा वाटायचं माझी भाषा माझा महाराष्ट्र ! अहो , कितीही केलं तरी माहेरची ओढ जाते थोडी ..या तगमगीने मला स्वस्थ बसू नाही दिलं . मग मी परत मराठीत लिहू लागले . आनंदाचे डोही आनंद तरंग अश्या पुलकित मन रंगात मी मराठीत जगू लागले .

किती गोड ही भाषा . एक एक शब्दातून प्रकटनारे भाव अहहा! अप्रतिम . साहित्याचे किती प्रकार मराठी भाषेने सर्वांपर्यंत पोहचवले . प्रत्येक प्रकारात व्यक्त होण्यासाठी किती शब्द साठा . मराठी ही एकच भाषा खरचं आई आहे कारण आईच्या पदरात कधीच कुणाला पोरक नाही वाटत आणि या पदरात प्रत्येकाला सामावून घ्यायची किती उदारता . या भाषेने दुसऱ्या भाषेला ही आपल्यात सामावून घेतले मग ती इंग्लिश असो की हिंदी अथवा संस्कृत किंवा मग उर्दू सगळ्यांना आपलंसं केलं .

माझ्या मनामनात रुजलेल्या या भाषेला मी कधीच अंतर नाही दिलं . तेनलांगणात राहून ही मी या भाषेची महिमा , थोरवी जपली आहे आणि कधीच मी मराठी विसरू देणार नाही ही शपथ मी घेतली . ज्या भाषेने मला माझी ओळख दिली त्या भाषेचा गोडवा मी येथे ही पसरवत आहे आणि ती अखंड ज्योत मराठीची मी इथे जागवली .

एका दिवसासाठी नाही तर मराठीचा सोहळा दररोज करा . या भाषेचे संवर्धन करून आणि दररोज मराठी मध्ये काहीतरी साहित्य वाचून किंवा लिहून . आपली भाषा आपली शान बनवा आणि मराठी बोलण्याचा आणि जपण्याचा सार्थ अभिमान वाटावा ..

शब्द भांडार अनोखा
माय मराठी तुझा
जागर मांडला साहित्याचा
मी मागते तुझा जोगवा

अमृताचे बोल तुझे
देई गोडवा शहाळी
अंगी मराठीचा बाणा
कुंकू टिळा तिचाच भाळी

काय सांगू थोरवी मी
माय मराठीची माझ्या
परक्यात राहूनही
पदरात आहे तुझ्या

कोणतीही भावना ती
मराठीत मांडली मी
फुलं अक्षराची लोभस
ओंजळीत भरली मी

कुठे फेडू पांग माई
सखी माझी सोबतीन
मराठीची मनामनात
ज्योत अखंड जागवेन

आस माझी मराठी
ध्यास माझा मराठी
शेवटी सरणावरही उरेल
तो श्वास ही मराठी….

अरुणा महेश जाजू
नीज़माबाद
तेलंगाना
9491746456

प्रतिक्रिया व्यक्त करा