जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.रेखा कुलकर्णी यांची अप्रतिम अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला
प्राणाहुन असे प्रिय,
सौभाग्याचा अलंकार.
मंगळसूत्राच्या वाटित,
असे माहेर सासर.
कळ्या काचेच्या मण्यांना.
दोन सूत्रात ओवले.
मध्यभागी चार मणी,
दोन सुवर्ण डोरले.
चार सुवर्णाचे मणी,
धर्म-अर्थ-काम-मोक्ष.
दोन डोरले देतात,
शिव-शक्तीची ग साक्ष.
दोन सूत्रे शिकवती,
रहा समरसतेने.
पती प्रेम आदराचे,
असे सौभाग्याचे लेणे.
अनाहत चक्रावर,
जेव्हा रुळते गळ्यात.
मन, चित्त शांत होते,
सुख नांदे संसारात.
कुणी म्हणती गंठण,
कुणी म्हणती गाठले.
नानाविध प्रकारात,
याचे रूप पालटले.
नव वधूच्या गळ्यात,
अग्नि देवाच्या साक्षीने.
पती स्वहस्ते घालतो,
पत्नी हर्षते प्रेमाने.
भावबंध जोडलेले,
श्रद्धालंकार स्त्रियांचा.
जपे हृदयाजवळ,
भाव पतीपत्नी प्रेमाचा.
रेखा कुलकर्णी,©®
चिंचवड, पुणे
सर्व हक्क स्वाधीन
२३/९/२०