सा. बां.कार्यकारी अभियंता शेवाळे यांना आ. वैभव नाईक यांनी सुनावले खडेबोल
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये उपलब्ध करून देऊनही अद्याप काम सुरू होत नाही. त्याचबरोबर स्वतःच्या कार्यालयाचे बाथरूम गेली तीन वर्ष आपण पूर्ण करू शकत नसाल तर तालुक्यातील पुल, साकव, रस्त्यांची कामे काय करणार? यातून तुमची अकार्यक्षमता सिद्ध होते. तुमच्यासारखा दिरंगाई करणारा अधिकारी बघितला नाही,अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. शेवाळे यांना खडेबोल सुनावले.
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाकडून सुरू न झालेल्या व अपूर्ण असलेल्या बजेटमधील व एफडीआर मधील कामांचा आढावा आज आमदार वैभव नाईक यांनी घेतला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले,वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर व इतर उपस्थित होते. वागदे – डंगळवाडी साकवाला मंजुरी मिळाली व वर्क ऑर्डर मिळाली पण काम सुरु का होत नाही. सोमवारपर्यंत हे काम सुरू न झाल्यास तुमच्या कार्यालयासमोरच येऊन भूमिपूजन करू, असा इशाराही यावेळी आ. वैभव नाईक यांनी दिला.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, हळवल रेल्वे उड्डाण पुलासाठी कन्सल्टन्सी नेमन्याकरिता 40 लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यानुसार कन्सल्टन्सीचा अहवाल आला. मात्र वर्ष होत आले तरी आपल्याकडून पुढील कोणतीच कार्यवाही होत नाही. पणदूर घोडगे पूल, बोर्डवे रस्ता, कुंदे रस्ता, आचरा कालावल रस्ता, अणाव पणदूर पुल अशी अनेक कामे सुरू झालेली नाहीत किंवा अपूर्णावस्थेत आहेत. या कामांबाबत आपण कोणताही आढावा घेतलेला नाही. कुडाळ तालुक्यात नव्वद कोटीची कामे सुरू झालीत. आपल्याकडे 26 कोटी एमडीआर मधून मिळाले पण अजून पंधरा कोटीचीही कामे सुरू झालेली नाहीत. बजेटमधील व एमडीआर मधील किती कामे अपूर्ण व सुरू झालेली नाहीत, याची लिस्ट दाखवा. आम्ही सोमवारी पुन्हा येऊ असे आ. वैभव नाईक म्हणाले. ठेकेदारांची बिल्ड कॅपॅसिटी बघूनच त्यांना कामे द्या. कामे अर्धवट ठेवलेल्या ठेकेदारांना परत परत कशी काय कामे देतात? कामे पूर्ण होण्यावर भर द्या अशा कडक शब्दात सूचना आ. वैभव नाईक यांनी कार्यकारी अभियंता एस. ए. शेवाळे यांना दिल्या आहेत.