You are currently viewing वऱ्हाड निघालं दुबई ला..

वऱ्हाड निघालं दुबई ला..

*डॉक्टर फॉर बेगर्स..(भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर) डॉ.अभिजित सोनवणे यांचा “गल्फ महाराष्ट्र बिजनेस फोरम”(GMBF ग्लोबल), दुबई संस्थेकडून दुबई येथे झाला सन्मान.*

 

*डॉ.अभिजित यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात*

 

*वऱ्हाड निघालं दुबई ला….*

 

@doctorforbeggars

 

 

GMBF Global अर्थात् Gulf Maharashtra Business Forum…. या संस्थेविषयी थोडसं….

 

भारता बाहेरील, आखाती देशात, आपली मराठी माणसं गेली, तिथे आपापला व्यवसाय घट्ट रुजवला…. स्वतःचं अढळ स्थान परदेशात निर्माण केलं….

 

यानंतर आपल्या मागे असणाऱ्या आपल्या इतर मराठी बांधवांना आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा, त्यांचाही व्यवसाय वाढावा, परदेशा बाहेर व्यवसाय कसा वाढवता येईल याची मराठी माणसाला माहिती द्यावी, आम्ही ज्या ठेचा खाल्ल्या त्या तुम्ही खाऊ नयेत हे सांगून सावध करण्यासाठी, एकमेकांना अडचणीत मदत करण्यासाठी, दुबईमधील आपल्या मराठी उद्योजकांनी या संस्थेची स्थापना केली.

 

थोडक्यात काय तर, भारताबाहेरील मराठी मंडळींनी, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे GMBF Global !

 

संस्थेचे कार्य दुबई येथून नियंत्रित होते.

 

डॉ. सुनील मांजरेकर हे विस्तारित दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व संस्थेचे अध्यक्ष पद भूषवित आहेत तर, संस्थेचे महासचिव म्हणून श्री विवेक कोल्हटकर त्यांना भक्कम साथ देत आहेत.

 

श्री राहुल तुळपुळे तसेच श्री चिरंतन जोशी संस्थेच्या उपाध्यक्षपदी राहून संस्थेचा वटवृक्ष आणखी मोठा कसा करता येईल यासाठी झटत आहेत.

 

यांना साथ देण्यासाठी श्री दिलीप खेडेकर, श्री अशोक सावंत, श्री दिलावर दलवाई, श्री विष्णु राऊत, श्री महेश शुक्ला आणि माझे बंधुतुल्य परम मित्र श्री प्रसाद दातार वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत.

 

Covid काळात माणसं नोकरी गमावून अक्षरशः रस्त्यावर भुकेली फिरत होती…. आपल्या तर्फे आपण अशा लोकांना जेवण दिलं…. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्यांच्याकडून आपण जेवणाचे डबे बनवून घेतले, त्यांना व्यवसाय दिला…. या काळात अक्षरशः रोज एक हजार लोकांना आपण जवळपास दीड वर्षे जेवण देत होतो….

 

हे सहस्त्र भोजन रोज घालायला आपल्याला मदत करणारा भक्कम मराठी हात म्हणजे GMBF Global !

 

त्या काळात अत्यंत प्रतिकूल अवस्थेत मी काम करत असताना तुम्हा सर्वाबरोबरच आणखी एक आवाज एकजुटीने मला मागून ऐकू येत होता…. “अभिजीत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है….” हा मराठी माणसाच्या एकजुटीचा आवाज म्हणजे GMBF Global !

 

मी या सर्वांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही… मलाही त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल.

 

याच संस्थेचा आणखी एक समाज उपयोगी उपक्रम म्हणजे दरवर्षी आयोजित केला जाणारा महाबिझ (Mahabiz) हा उपक्रम!

 

थोडक्यात व्यापारी परिषद…. यात जगातील जवळपास १५ देशातील उद्योजक सहभागी होतात. ज्या मराठी माणसाला व्यवसायात उतरून मोठी झेप घ्यायची आहे अशा मराठी माणसांसाठी ही एक खूप मोठी संधी असते.

 

या परिषदेमध्ये फक्त बिजनेस बिजनेस न खेळता इथे जमलेली सर्व मंडळी सहृदय पणे माणसांच्या हितासाठी आणखी समाज उपयोगी काय काम करता येईल याचा सुद्धा विचार करत असतात …. वर्षभरात त्याप्रमाणे नियोजन करून ही संस्था अनेक समाज उपयोगी काम करत असते.

 

देशातील ज्या मराठी माणसांनी समाजाच्या हितासाठी काही काम केलं असेल… त्यांना स्वखर्चाने दुबईमध्ये Mahabiz या परिषदेमध्ये बोलावून संस्था त्यांचा सन्मान करते… पुरस्कार देते…. पाठीवर हात ठेवते.

 

तर, ऑक्टोबर 2021 या महिन्यातील, एका वारी श्री प्रसाद दातार हे माझे स्नेही, दुबईहून प्रत्यक्ष भारतात येऊन भेटले आणि म्हणाले महाबिझ 2022 ला होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी, तिथल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी आम्ही तुमचे नाव निश्चित केले आहे.

 

सर्व खर्च आमचा …. तुम्ही आणि डॉ. मनीषा, दोघांनी फक्त 16 ते 21 फेब्रुवारी वेळ काढायचा… ते हक्काने हसत म्हणाले.

 

काम सुरू केल्यापासून मागील सात वर्षात सलग दोन दिवस सुद्धा आम्ही कधी सुट्टी घेतल्याचं मला आठवत नाही, अशा परिस्थितीत सलग सहा दिवस म्हणजे माझ्यासाठी जरा जास्तच होतं…

 

परंतु इतक्या मोठ्या स्वरूपात असणारा, दहा-पंधरा देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम !

 

त्यात दुबईहून खास निमंत्रण घेऊन येणाऱ्या, गोबर्‍या गालाच्या, प्रसन्नचित्त, हसतमुख , गोऱ्या गोमट्या प्रसाद दातार या माणसाला नकार देणं शक्यच नव्हतं… !

 

श्री प्रसाद दातार…. एक हरहुन्नरी मराठी व्यक्तिमत्व !

 

स्वतःच्या व्यवसायात दुबईमध्ये ध्रुवासारख अढळ स्थान यांनी निर्माण केलं आहे. बोलण्यात इतका गोडवा की एखादा टक्कल असलेला माणूस यांच्याकडून तेल आणि कंगवा सुद्धा विकत घेईल !

 

तर ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळी आम्ही पोहोचलो दुबईमध्ये….

 

श्री. राजेश भाई बाहेती…. !

 

भारतातून दुबई येथे जाऊन यांनी आपला व्यवसाय विस्तार केला आहे. चॉकलेट इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री यामध्ये परदेशात त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे.

 

सच्चा दिलदार माणूस…. ! आपल्या मिळकतीतला खूप मोठ्या रकमेचा वाटा, भारतातील आणि भारताबाहेरील गोर-गरीब आणि तळागाळातल्या लोकांसाठी ते वापरतात….

 

Hotel Smana, Al Ruffa, Bur Dubai, दुबई मधील सर्वोत्तम हॉटेल…. हे सुद्धा बाहेती सरांचच….

 

आमची राहण्याची संपूर्ण व्यवस्था या भल्या माणसाने इथेच केली होती …

 

दुबईत बसून, ते करत असलेल्या सामाजिक कार्याचा आलेख पाहून थक्क झालो…

 

पहिले दोन दिवस स्वतंत्र कार आणि शोफर देऊन श्री प्रसाद दातार यांच्या माध्यमातून संपूर्ण दुबई पहिली….

 

समुद्रात स्वतंत्र क्रूझ ( Cruize ) आम्हाला फिरण्यासाठी दिले होते, इथली चमक दमक पाहून डोळे दिपून गेले….

 

परंतु त्याहीपेक्षा डोळे दिपले ते इथल्या GMBF Global च्या मराठी माणसांच्या प्रेमळ, अगत्यशील, आदरातिथ्ययामुळे…

 

दुबईमधील चमक दमक पाहून मनात सतत एकच विचार येत होता…. मी ज्या लोकांसाठी काम करत आहे, त्या माझ्या याचक वर्गाच्या आयुष्यात कधी ही भरभराट येईल का ? त्यासाठी मला आणखी काय करता येऊ शकेल ?

 

हा विचार करत असतानाच पुरस्काराचा दिवस उजाडला…. दिनांक 19 फेब्रुवारी 2022.

 

मराठी माणसाच्या मनातला सुवर्णदिन….!

 

आदरणीय छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती…!

 

ज्या महाराजांनी तळागाळातल्या पीडितांचे दुःख आधी जाणले त्यांच्याच जयंती दिवशी, त्यांच्याच महाराष्ट्रातल्या एका सामान्य मावळ्याचा, परदेशात आंतरराष्ट्रीय सन्मान व्हावा, हा निव्वळ योगायोग असेलही, मी त्याला महाराजांचा आशीर्वाद समजतो !

 

कार्यक्रम ठरला होता Hotel Grand Hayatt या सप्त तारांकित हॉटेलमध्ये…. सप्ततारांकित हॉटेल… ते ही दुबई मधलं …. म्हणजे त्याचा थाट काय असेल…. हे ज्याने त्याने जाणून घ्यावे….

 

आम्हाला आमच्या खुर्च्यांवर सन्मानाने बसवण्यात आलं…

 

अलिशान स्टेजवर दुबईमधील राजेशाही घराण्यातील मंडळी आणि तिथले मंत्री उपस्थित होते…. यांच्याच हस्ते आज आम्हाला पुरस्कार मिळणार होता.

 

ज्यांना आपण अरब म्हणतो तीच ही मंडळी…!

 

अंगावर पायघोळ पांढरा शुभ्र झगा….याला ते थोब किंवा कांदोरा असं म्हणतात…. कडक उन्हापासून संरक्षण देणारं डोक्यावर पांढर उपरणं …. आणि हे उपरणं पडू नये म्हणून त्या भोवती गुंडाळलेली काळी रिंग….

 

हा पांढरा झगा इतका पांढरा असतो की पांढऱ्या रंगाने लाजावे…. उष्णता बाहेर फेकून देणारा हा पांढरा झगा त्यांना उन्हापासून निश्चित आराम देत असेल…

 

मी संपूर्ण स्टेज न्याहाळत होतो…. एकेकाळच्या मिस इंडिया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होत्या… कार्यक्रमाला देश-विदेशातले अनेक प्रतिनिधी आले होते…. माझी नजर भिरभिरत होती….

 

जागोजागी मोठमोठ्या स्क्रीन्स लावल्या होत्या…. देश-विदेशातील खाण्यापिण्याची चहल पहल होती….

 

कार्यक्रमाला ईशा फाउंडेशन चे श्री सद्गुरू येणार होते, भारतातील सर्व अक्षरधाम मंदिरांचे प्रमुख श्री ब्रह्म विहारी स्वामी येणार होते, भारतातून नितीन गडकरी खासदार, श्री विश्वजीत कदम खासदार , याव्यतिरिक्त दुबई आणि संयुक्त अरब अमिराती मधील इतर अनेक राजे, मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तसेच अनेक देशातील मोठी मोठी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

 

इतकी मोठी मंडळी GMBF Global च्या निमंत्रणावरून जगभरातून आली होती…. यात आमच्यासारख्या भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करणाऱ्या, ऑफ बीट माणसाला निमंत्रण मिळावे, याचं मला आश्चर्य वाटलं ….आणि त्यांचं कौतुक सुद्धा…. !

 

माझी भिरभिरती नजर, मनात हे सर्व साठवून घेत असताना एका जागी थबकली… चमकली …. थिजली…

 

स्टेजवर एका उच्च स्थानी, अतिशय सुंदर सजावट केलेल्या टेबलवर आदरणीय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा फोटो होता….

 

आणि इतक्यात मिस इंडिया सूत्रसंचालक यांनी घोषणा केली …..”आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला हार घालून केले जाईल….”

 

पांढऱ्या झग्यातील हे अरब लोक मग समोर आले, त्यांनी महाराजांना हार घातला आणि ते नतमस्तक झाले….

 

अरबांच्याच देशात जाऊन…. अरब लोकांच्याच हॉटेलमध्ये ….त्यांच्याच स्टेजवर…. या अरब लोकांना आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकायला लावणारं हे GMBF Global नावाचं मराठी वादळ… !

 

हा फोटो बंदिस्त करण्यासाठी मी माझ्या जागेवरून स्टेजकडे अक्षरशः पळत सुटलो…. तिथल्या प्रोटोकॉल च्या विरुद्ध होतं हे…. लोक वेड्यासारखे माझ्याकडे पहात होते… मला पर्वा नव्हती…. !

 

फोटो काढून मी माझ्या जागेवर येऊन बसलो. पण काय बावळट माणूस आहे हा ….अशीच तिथल्या प्रत्येकाची नजर होती… !

 

आता राष्ट्रगीतासाठी उठून उभे राहा असा सूत्रसंचालिकेचा प्रेमळ आदेश आला….

 

दुबई दर्शन करून, रात्री उशिरा झोपून थकलेला मी…. गुडघ्यावर हात धरून, कसा बसा उठत खुर्चीवर हात ठेवून, खुर्चीच्याच आधाराने टेकून, हाताची घडी घालून, जांभई देत उभा राहिलो…. म्हटलं चला दुबईचे राष्ट्रगीत तरी ऐकू…..

 

आणि स्पीकरवर आवाज आला ….”जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता…. ”

 

राष्ट्र गीताच्या पहिल्या चारच शब्दांनी “खुर्चीचा” आधार सुटला…. मान ताठ झाली ….कणा ताठ झाला…. हाताच्या मुठी वळल्या गेल्या…. पावलं आपोआप सावधान झाली…. नजर आकाशात गेली आणि जीवाच्या आकांताने ओरडलो “भारत माता की जय” !

 

मराठी माणसाची…. एका भारतीयाची अस्मिता परदेशातही उंचावणाऱ्या GMBF Global ला माझा मानाचा मुजरा !

 

यानंतर अरब देशाच्या राज्यकर्त्यांकडून पुरस्कार घेतला…. महाराजांच्या एका मावळ्याने …. !

 

20 तारखेला परतीच्या प्रवासासाठी शारजाह येथे विमानतळावर आलो…

 

सर्व formalities पूर्ण झाल्या….

 

विमान तळावर एक ड्रायफ्रूटचे शॉप होते….

मी आपला सहज फेरफटका मारायचा म्हणून त्या दुकानात गेलो…. !

 

दुबई मध्ये साधारण आपले वीस रुपये म्हणजे त्यांचा एक दिरहम…. !

 

पाण्याची एक बाटली 15 दिरहम म्हणजे तीनशे रुपये….

एक चपाती 10 दिरहम म्हणजे दोनशे रुपये….

भाजीची एक प्लेट 40 दिरहम म्हणजे आठशे रुपये…

चहा 10 दिरहम म्हणजे दोनशे रुपये….

 

आमची सर्व सोय GMBF Global ने केलेली असली तरीही, इतर वेळी काही लागलं तरीही आम्हाला आमचेच पैसे खर्च करायचे होते….

 

आपल्याकडे असावेत म्हणून आम्ही काही न काही खटपटी करून इथून 1000 दिरहम घेऊन गेलो होतो….

 

परंतु वरील खर्चाच्या हिशोबाने परतीच्या प्रवासापर्यंत माझ्याकडे 1000 पैकी एकूण साठ दिरहम राहिले होते…..

 

शारजाह च्या विमानतळावर मी मोठ्या दिमाखात फिरत होतो…. पण तिथली साध्यातली साधी गोष्टसुद्धा 50 दिरहम च्या वर होती….

 

60 दिरहम पैकी दहा दिरहम चा चहा मी आणि मनीषाने वन बाय टू पीला…..

 

उरलेले 50 दिरहम घेवून मी आपला श्रीमंत व्यक्तीप्रमाणे, पाठीमागे हात बांधून, श्रीमंत असल्याचा आव आणून, विमानतळावरील सर्व शॉप मध्ये जाऊन आलो….

 

काहीच न घेता शॉप मधून बाहेर पडल्यावर तिथले सेल्समॅन विचारायचे…. काय झालं सर …. आपल्याला आवडलं नाही का…. ?

 

मी शेवटचे फक्त 50 दिरहम खिशात घेऊन त्यांना झोकात उत्तर द्यायचो…. ‘ No my brand is not available here…sorry ‘ (ज्यांनी माझं पुस्तक वाचलंय, त्यांना हे वाचून काही वेगळं वाटणार नाही )

 

आयला…. फक्त 50 दिरहम खिशात घेवून हे असलं ब्रँडेड उत्तर, परदेशातल्या विमान तळावर द्यायला लई कॉन्फिडन्स लागतो बरं का…. !

 

हे शिकलो मी माझ्या याचक / भीक मागणाऱ्या वर्गाकडून….

 

खिशात कवडी सुद्धा नसताना ते जगत असतात, येणाऱ्या प्रत्येक अडचणीला लाथ मारून…. Confidentally….. !!!

 

अर्थात माझ्या खिशात फक्त 50 दिरहम आहेत याची जाणीव फक्त मला आणि मनीषाला होती ….

 

तर असाच शारजाह विमानतळावर फिरत फिरत एका ड्रायफ्रूट च्या दुकानात गेलो…. बहुदा तिथला लंच टाईम झाला असावा…. याशिवाय पॅसेंजर सुद्धा अगदी कमी होते…. दुकानात कोणीच नव्हतं.

 

घ्यायचं काहीही नसताना सुद्धा मी आपली पाकिटे वरखाली करून बघत होतो….

 

काजू 50 दिरहम ला 100 gm म्हणजे 1000 रू ला 100 gm म्हणजेच 10000 रू किलो

 

खजूर 50 दिरहम ला 100 gm म्हणजे 1000 रू ला 100 gm म्हणजेच 10000 रू किलो

 

मनुका 40 दिरहम ला 100 gm म्हणजे 800 रू ला 100 gm म्हणजेच 8000 रू किलो

 

माझी छाती दडपली…. आम्ही शेजारच्या किराणा दुकानातून दहा रुपये अर्धा पावशेर खजूर आणतो उपवासाला आणि चार जण खातो…. लईच खावुशी वाटलं तर पाचेक रुपयाचे मनुके सुद्धा आनतो, शीर्‍या वर टाकायला…. आमची चैन इथपर्यंतच….. !

 

हे सर्व सुरू असताना, त्याच शॉप मध्ये एक मळकट झब्बा कुर्ता घातलेले, दाढी वाढलेले एक गृहस्थ आत आले…. आणि मला म्हणाले ‘मिया ड्रायफ्रूट क्या रेट है ?’

 

मी गोंधळलो….

 

ते मला म्हणाले, ‘मीया ऐसे देखते क्या हो…. ड्रायफ्रूट का रेट बताओ भाई….!’

 

ते बहुतेक मला सेल्समॅन समजत होते…..

 

मलाही भरपूर वेळ होता…. गंमत करायची लहर आली…. आधीच पाहून ठेवलेल्या पाकिटांचे रेट मी त्यांना सांगितले.

 

‘अजी इतना मेहंगा क्यू है…. ?’

 

मलाही त्यांना हेच सांगायचं होतं…. (बहुतीच मेहंगा हैं रे बाबा ! मैं भी कबसे खडेलाच है इदर….. अब किसकू बोलनेका रे बाबा… राजू… ए राजू….) परेश रावल style मनातल्या मनात मी हिंदी बोलून घेतलं….!

 

‘कुछ दस पंधरा दिऱ्हाम वाला बताओ जी….’ ते म्हणाले.

 

खरंतर मी सुद्धा दस पंधरा दिरहम मध्ये काही मिळते का तेच बघायला आलो होतो….. मी दुकानातली पाकिटे वरखाली करून दहा-पंधरा दिरहमला काही सापडते का ते बघायला लागलो …..पण मला काही सापडेना !

 

‘नया जॉब मिला है क्या मिया… ?’ ते म्हणाले.

 

कसनुसा हसत मी ‘हो’ म्हणालो….

 

‘इंडियन लगते हो….’ ते म्हणाले

 

‘जी आपको कैसे पता चला…. ?’ मी बावचळून विचारलं

 

‘मिया दुबई मे नौकरी जो कर रहे हो …. ‘ ते उद्गारले….

 

‘मै कुछ समझा नही भाई साब…. ‘ मी बोललो

 

‘अजी अब कैसे समझाऊ मिया, तुम हिंदुस्तानीयोको तो नौकरी झट से मिल जाती है…. हम पाकिस्तानी… हमको तो जल्दी से नौकरी कही नही मिलती….’

 

मतलब…. ? मी वेड्यागत तोंड करून विचारलं…

 

‘अरे भाई हम पाकिस्तान से है …..हमारी मुल्क में कुछ लोग ऐसे है जो कुछ गैर कानुनी काम करते है, इस वजह से पुरे पाकिस्तान की तरफ गलत नजर से देखा जाता है, लेकिन यकिन मानो मीया, हर पाकिस्तानी ऐसा नही है…. ‘

 

प्रत्यक्ष पाकिस्तानी बंदा माझ्यासमोर होता…. मी बरा त्याला असा जावू देईन ? सवयीप्रमाणे मी त्याला छेडत गेलो….

 

पेशावर, पाकिस्तान मध्ये तो छोटं मोठं काम करायचा…. घरात वृद्ध आई वडील, बायको आणि तीन लहान मुलं होती. Covid काळात नोकरी गेली…. घरादाराला जगवण्यासाठी जमीन विकली….

 

एकाने त्याला सांगितलं, दुबईमध्ये नोकरी देतो, इतके इतके पैसे लागतील ,याने राहतं घर विकून पैसे जमवले,विमानाने दुबईला आला, इथे आल्यानंतर तो फसवला गेला…. परत जाण्यासाठी सुद्धा पैसे उरले नाहीत …. विसा संपत चालला….आता अटक !

 

दुबईत एका गृहस्थांच्या तो पाया पडला ….. त्यांना झालेली हकीकत सांगितली …..दुबईच्या त्या गृहस्थांनी याचे विमानाचे तिकीट काढून वर 20 दिरहम खर्चासाठी दिले…. !

 

याने मला खाल मानेने सांगितले, जीसने फसाया वो हमारा पाकिस्तानी था….

 

पण वर मान करून म्हणाला….. लेकीन दुबई मे जीस खुदा के बंदे ने, बिना जान पहचान हमारी मदद की वो तो हिंदुस्थानी था….!

 

आप लोग ऐसे हो…. इस लिये आपको हर जगह सम्मान मिलता है….. लेकीन हमारे कौम मे ही कुछ लोग ऐसे काम करते है…. जो असली पाकिस्तानीयोको नीचा दिखाते हैं…. लेकीन मैं कहना चाहुंगा….. आप जैसे समजते हो हर पाकिस्तानी ऐसा नही होता….. बिल्कुल नही होता…. तो जीव तोडून सांगत होता…….

 

ऐकून मी अवाक झालो…. मी त्याच्याकडे पाहत राहिलो….

 

पुढे तो म्हणाला, ‘आपके देश का राजा तो सिवाजी था…. कल उनका जन्म दिन था… हमारे पाकिस्तान के व्हाट्सअप पे भी उनकी सम्मान में बहुत सारी चीजे आई थी…. हमने वो पढी… आपको ऐसा राजा मिला इसलिये शायद हर हिंदुस्तानी इमानदार होता है…. ‘

 

हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला….. !

 

वर मिळालेल्या वीस दिरहम मध्ये तो त्याच्या मुलाबाळांसाठी काहीतरी घेऊन जाण्याच्या विचारात होता ,…….परंतु इथलं एअरपोर्ट 15 आणि 20 दिऱ्हाम मध्ये काहीही देऊ शकत नव्हतं …..

 

आता माझ्याकडे उरलेल्या पन्नास दिऱ्हाम चा योग्य तो वापर होणार होता….

 

त्यांच्या वीस दिऱ्हाम मध्ये काहीही येणार नव्हतं आणि माझ्या पन्नास दिऱ्हाम चा मला सुद्धा काही उपयोग नव्हता….

 

एक 50 दिऱ्हाम चा काजू चा पुडा मी उचलला …. ‘ये लो भाईसाब…. कल सिवाजी महाराज की जयंती थी इसलिये हम इंडियन लोग फ्री मे सबको गिफ्ट दे रहे है….’ मी बोललो.

 

त्यांचा चेहरा खरंच खुलला….. ते हे गिफ्ट घ्यायला मनापासून पुढे आले…..

 

आणि तितक्यात या दुकानातली सेल्स गर्ल आली…. How may I help you sir …. ?

 

या बाईने आमच्या या संवादाला कात्री लावली….

 

पाकिस्तानी बंधूचा आणि माझा हा सर्व संवाद 5-7 मिनिटांचा …. पण असं वाटलं युगा युगाचा ….

 

सेल्स गर्लला पाहून हे पाकिस्तानी गृहस्थ थोडे गोंधळले मला म्हणाले, ‘ मीया आप यहा के सेल्समॅन नही हो ?’

 

आता मी ओशाळलो…. माझी ओळख सांगितली आणि त्यांच्या हातात तो काजूचा पुडा ठेवला….. यावर त्यांनी तोबा तोबा म्हणत तो काजूचा पुडा जिथे होता तिथे ठेवला….. !

 

आणि ते निघाले….

 

क्या हुआ भाई साहब….? त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहून मी विचारलं …

 

सेल्समॅन समजून त्या गृहस्थाने माझ्या बरोबर मन मोकळ केलं होतं, परंतु आता मी डॉक्टर आहे असं सांगितल्यानंतर आपोआप एक दरी निर्माण झाली…

 

अरे नही साहब कुछ नही, असं म्हणत ते पुढे चालायला लागले…. माझ्या हातातला काजुचा पुडा घ्यायला नम्रपणे त्यांनी नकार दिला….

 

नकळतपणे मी त्यांचा स्वाभिमान दुखावला होता….

 

तरीही जाता जाता त्यांना म्हणालो मीया रुको…. अब इस बात को तो इन्कार मत करो, म्हणत मी माझे दोन्ही हात त्यांच्याकडे पाहून फैलावले….

 

प्रसन्न चित्ताने या पाकिस्तानी माणसाने मला मिठी मारली….

 

मस्जिद मध्ये घंटा वाजली आणि मंदिरामध्ये कोणीतरी चादर चढवली असा मला यावेळी आभास झाला….. !

 

आज पाकिस्तान भारताला भेटत होता !

 

सर्वस्व हरलेल्या एका बापाला मला ते काजू द्यायचे होते…. गेल्यावर त्याला पोरं विचारतील अब्बाजान दुबई से हमारे लिये क्या लाये…? तेव्हा या बापाची नजर खाली झुकू द्यायची नव्हती मला….

 

पण हा बाप तेव्हा पोरांना सांगणार होता…. मैं लाया तो कुछ नही… मगर बहुत कुछ देके आया हुं ….

 

उरलेले 50 दिरहम मी एका माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून जपून ठेवणार आहे आता ….. !

 

दुबईत जाण्याअगोदर बुर्ज खलिफा नावाची इमारत जगातली सर्वात उंच इमारत आहे असा माझा गैरसमज होता…..

 

दुबईला जाऊन आल्यानंतर हा गैरसमज पूर्णपणे कोसळला.

 

“हिंदुस्थानी” माणसाच्या माने इतकं या जगात उंच काहीच नाही….. !

 

21 February 2022

 

 

*डाॕ. अभिजीत सोनवणे*

*डाॕक्टर फाॕर बेगर्स*

*सोहम ट्रस्ट, पुणे*

*9822267357*

*abhisoham17@gmail.com*

*www.sohamtrust.com*

*Facebook : SOHAM TRUST*

प्रतिक्रिया व्यक्त करा